एका जहाजावर एक खलाशी ट्रेनी म्हणून पहिल्यांदाच आला होता. त्याने सोबत देवाची फोटो फ्रेम आणली होती. संध्याकाळी आंघोळ वगैरे आटोपल्यावर त्याने भक्तिभावाने देवपूजा करताना घरून आणलेली अगरबत्ती पेटवली आणि त्याला काही समजायच्या आत काही क्षणातच फायर अलार्म वाजला. टँव टँव करत कानठळ्या बसवणारा फायर अलार्म वाजला रे वाजला की सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. पहिला दिवस असल्याने अलार्म च्या आवाजाने तो गोंधळून गेला. जहाजावर सुट्टी झाल्यानंतर फायर अलार्म वाजल्याने प्रत्येक जण वैतागून लाईफ जॅकेट घेऊन मस्टर स्टेशन ला पोचले होते. सगळ्यांची धावाधाव बघून हा ट्रेनी पण मस्टर स्टेशन वर आला होता. फायर डिटेक्शन सिस्टिम पॅनल वर अकॉमोडेशन मध्ये एका केबिन चा स्मोक सेन्सर ऍक्टिव्हेट झालेला दाखवत होता. सगळे जण आग विझवण्याच्या तयारीत त्या केबिनचा दरवाजा उघडून बघतात तर आत देवाच्या समोर लावलेल्या अगरबत्तीचा सुगंध दरवळत असल्याचे जाणवले आणि त्या अगरबत्तीच्या धुराने स्मोक सेन्सर ऍक्टिव्हेट झाल्याचं पाहून ट्रेनी कडे बघून कोपरापासून नमस्कार करू लागले होते. सगळा प्रकार लक्षात आल्यावर कॅप्टन आणि चीफ इंजिनियरला हसावे की रडावे ते कळत नव्हते. या घटनेचा मोठा रिपोर्ट बनवला गेला आणि सगळ्या जहाजांवर प्रथम वेळेस जहाज जॉईन करणाऱ्यांना अगरबत्ती आणि सिगारेट बद्दल सूचना देण्यास सांगितले गेले. तेलवाहू जहाजावर अकोमोडेशन वर मोठ्या अक्षरांत नो स्मोकिंग आणि सेफ्टी फर्स्ट लिहलेले असते ते सगळ्यांना लक्षात राहावे म्हणूनच. जहाजावर सिगारेट ओढण्यासाठी स्वतंत्र खोली असते. क्रृ स्मोक आणि ऑफीसर्स स्मोक रूम अशा नावाने खलाशी आणि अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या असतात.
जहाजावर या खोल्यांव्यतिरिक्त अन्य कुठेही सिगारेट ओढण्यास परवानगी नसते. तसं पाहिलं तर हे नियम फारसे कोणी पाळताना दिसत नाही. कार्गो कंट्रोल रूम, इंजिन कंट्रोल रूम, ब्रिज, शिप्स ऑफिस आणि इव्हन केबिन मध्ये सुद्धा सिगारेट ओढली जाते. सिगारेट चे ऍश ट्रे सुद्धा खास पद्धतीचे असतात. जहाजावर केवळ माचीस वापरली जाते तीसुद्धा स्मोक रूम मध्येच गॅस लायटर वर पूर्णपणे बंदी असते. तेलवाहू जहाजावर आग लागण्याचा खूप मोठा धोका असतो. अत्यंत ज्वलनशील गॅसेस जहाजाच्या टाक्यांमधून सतत बाहेर पडत असतात ज्यामुळे एखादी ठिणगी सुद्धा संपूर्ण जहाजाला अणुबॉम्ब सारख्या भयानक स्फोटात रूपांतरित करू शकते. जहाजाच्या प्रत्येक भागात फायर डिटेक्शन सिस्टीम कार्यान्वयीत असते. स्मोक सेन्सर्स आणि फायर डिटेक्टर जरा कुठे धूर निघाला की फायर अलार्म ऍक्टिव्हेट करतात. एकदा का फायर अलार्म वाजला की सगळ्यांची धांदल उडते. अलार्म खरोखर आग लागून वाजलाय की फॉल्स अलार्म वाजलाय हे नक्की नक्की करेपर्यंत सगळेच जण काम किंवा आराम सोडून मस्टर स्टेशन वर पोहचतात. फॉल्स अलार्म असेल तर पब्लिक अड्रेस सिस्टिम म्हणजेच लॉउडस्पिकर वर लगेच अनाऊन्समेन्ट केली जाते. मग ज्याचा तो आपापली कामे करायला किंवा केबिन मध्ये परत जातात. जर एखाद्या खलाशाच्या किंवा अधिकाऱ्याच्या चुकीने अलार्म वाजला असेल तर जहाजावरील प्रत्येकजण त्याच्या नावाने मनातल्या मनात शिव्या देत असतो. फायर अलार्म हा खूप मोठ्याने वाजतो तसेच काही भागातील दरवाजे अलार्म ऍक्टिवेट झाल्याझाल्या ऑटोमॅटिकली बंद होतात. मानवी चुकांमुळे फायर अलार्म वाजू नये म्हणूनच जहाजावर स्मोक रूम बनवण्यात येतात. पण स्मोक रूम म्हणजे केवळ सिगारेट ओढण्याची खोली नसून तिथे एक मोठा TV सेट आणि म्युझिक सिस्टिम सुद्धा असते. जहाजावरील कॅप्टन, चीफ इंजिनियर, सेकंड इंजिनियर आणि चीफ ऑफिसर ज्यांना टॉप फोर असे पण बोलले जाते, यांच्या केबिन मध्ये प्रत्येकाला स्वतंत्र tv सेट आणि म्युझिक सिस्टिम असते. सर्व खलाशी आणि जुनियर अधिकाऱ्यांसाठी tv सेट आणि म्युझिक सिस्टीम या सार्वजनिक स्वरूपात स्मोक रूम मध्ये लावलेले असतात.
संध्याकाळी सहा ते सात दरम्यान डिनर झाले की अधिकारी आणि खलाशी अनुक्रमे ऑफिसर्स स्मोक रूम आणि क्रृ स्मोक रूम मध्ये मनोरंजनासाठी एकत्र येतात. कोणी जुने नवे पिक्चर लावतात तर कोणी गाणी लावतात. कोणी एकमेकांशी गप्पा मारत कित्येक तास घालवतात. जे सिगारेट ओढत नाहीत ते सुद्धा मनोरंजासाठी सिगारेट ओढणाऱ्यांचा धूर सहन करतात. पण पूर्वी लॅपटॉप आणि आता स्मार्टफोन आल्याने प्रत्येक जण केबिनमध्येच स्वतःचे मनोरंजन करत बसतात. जेवणाच्या वेळेला काय ते एकमेकांशी कामाव्यतिरिक्त बोलत असतील तेवढेच. जहाजावर मोबाईल फोन सुरु झाले, इंटरनेट आणि वायफाय आले त्यामुळे स्मोक रूममध्ये जास्त कोणी फिरकत नसल्याने आता त्या फक्त नावापुरत्याच उरल्या आहेत. पण काही काही हौशी खलाशी व अधिकारी या स्मोक रूम मध्ये मोठ्या आवाजात पिक्चरची गाणी लावून स्मोक रूम दणाणून सोडतात. क्रृ स्मोक रूम मध्ये प्रत्येक जहाजावर शोले किंवा हम आपके है कोन हे दोन पिक्चर एकदा तरी सुरु असल्याच हमखास बघायला मिळते. रामायण आणि महाभारत या सिरीयलच्या सिरीज सुद्धा एका जहाजावर बघायला मिळालेल्या पण त्या फक्त खलाशांच्या स्मोक रूम मध्येच. ऑफिसर्स स्मोक रूम मध्ये पिक्चर किंवा गाणी न बघता मुव्हीज आणि सॉंग्स लावले जातात. एखाद्या कारखान्यात मॅनेजमेंट आणि कामगार यामध्ये जशी दरी असते तशीच दरी जहाजावर अधिकारी आणि खलाशांमध्ये असते. काही काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांचे जुनियर अधिकारी क्रृ स्मोक रूम मध्ये गेलेले खपतसुद्धा नाही. कंपनीला टीम वर्क पाहिजे असते टीम वर्क शिवाय कोणतेच काम पूर्ण होत नाही. कामाच्या वेळेला टीम वर्क आणि सुट्टीच्या वेळेला अधिकारी आणि कामगार असे भाग पडतात.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर,
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply