( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दत्ता हिंदळेकर यांच्या निधनाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने स्मरणांजली )
क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा खेळ. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी हा खेळ भारतात रुजवल्यानंतर इथल्या स्थानिकांनी त्याला चांगलेच आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मोठ्या महानगरांतून या खेळाचा जास्त प्रसार झाला. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांमधूनही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. या खेळासाठी फार साधनसामुग्री लागत नसल्याने एखादी लाकडी फळी आणि रबरी चेंडू घेऊन मुले मिळेल त्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळू लागत. यातूनच पुढे राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होत. मुंबईतील गल्ली क्रिकेटची अशीच एक भारताीय संघाला देणगी म्हणजे अस्सल मराठी मातीतले ‘दत्ताराम धर्माजी हिंदळेकर’.
प्रसिद्ध क्रिकेटपटू ‘विजय मांजरेकर’ यांचे मामा लागणाऱ्या हिंदळेकर यांचं मूळ गांव कोकणातील. त्यांचे वडील रत्नागिरीमधील गरीब शेतकरी. त्या काळातील अनेक चाकरमान्यांप्रमाणे तेही मुंबईत नशीब काढायला आलेले. अश्या घरातल्या दत्तांना लहानपणीच क्रिकेटची गोडी लागली. फलंदाजीबरोबरच ते यष्टिरक्षणात चमक दाखवू लागले. गल्लीत खेळता खेळता चांगल्या खेळाने सर्वत्र नाव झाल्याने एका क्लबकडून खेळायची संधी मिळाली. तिथेही खेळाची छाप सोडल्याने १९३४-३५ साली पहिल्याच रणजी मोसमात मुंबईच्या संघात दत्ताना स्थान मिळाले.
दत्ता यष्टिरक्षणाएवढेच फलंदाजीतही दमदार होते. मधल्या फळीबरोबरच सलामीलाही फलंदाजी करू शकत. तासनतास यष्टिरक्षण केल्यानंतर लगेच फलंदाजीला उतरण्यास अजिबात कुरकुर करत नसत. खेळातील प्राविण्याबरोबरच त्यांची ही खेळाप्रती निष्ठा कर्णधाराला व संघ व्यवस्थापनाला प्रभावित करत असे. पहिल्याच दोन रणजी मोसमात मुंबईने रणजी करंडक जिंकला आणि त्यात दत्तानी चमकदार कामगिरी केली. या कालावधीत त्यांना विजय मर्चंट, एल.जय, वाजिफदार, जमशेदजी अश्या मोठ्या खेळाडूंबरोबर खेळायची संधी मिळाली, ज्याचा त्यांना खेळात सुधारणा करण्यासाठी फार फायदा झाला. दत्तांच्या या सातत्यपूर्ण खेळामुळे त्यांची १९३६ सालच्या भारताच्या पहिल्याच इंग्लंड दौऱ्यासाठी पहिल्या पसंतीचे यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली.
या सामन्यात इंग्लंडने नवोदित भारताचा अपेक्षेप्रमाणे दारुण पराभव केला. नऊ गड्यांनी हरलेल्या या सामन्यात यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून दत्तांची कामगिरी मात्र समाधानकारक राहिली. पहिल्या डावात विजय मर्चंट यांच्याबरोबर सलामीला येत त्यांनी २६ धावा केल्या आणि ६२ धावांची भागीदारी केली, जी भारतीय डावात सर्वोत्तम होती. तसेच दुसऱ्या डावात (सर्वबाद ९३) १७ धावा केल्या ज्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक होत्या. पण दुर्दैवाने यष्टिरक्षण व फलंदाजीवेळी या कसोटीत त्यांना काही दुखापती झाल्या ज्यामुळे त्यांचे बोटाचे हाड तुटले आणि दृष्टी काही काळासाठी अधू झाली. यामुळे पुढील दोन्ही कसोटींना त्यांना मुकावे लागले.
यानंतर १९३९ ते १९४५ हा दुसऱ्या महायुद्धाचा काळ. त्यामुळे इतरांप्रमाणे त्यांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागले आणि ऐन उमेदीची वर्षे वाया गेली. मात्र त्यांनी हिम्मत न हारता क्रिकेटच्या मैदानावर मेहनत चालू ठेवली. चौरंगी, पंचरंगी आणि रणजी स्पर्धांमधून सातत्यपूर्ण कामगिरी करत राहिले. १९४५-४६ च्या ‘बॉम्बे पेंटॅग्युलर’ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्यांच्या फॉर्मने सारेच प्रभावित झाले. यामुळेच इंग्लंडच्या १९४६ च्या दौऱ्यासाठी त्यांची ३७ व्या वर्षी भारतीय संघात पहिल्या पसंतीचे यष्टिरक्षक म्हणून निवड झाली.
या मालिकेत ते तिन्ही कसोटी खेळले असले तरी त्यांना सतत पाठदुखीने सतावले. त्यामुळे दौऱ्यावरचे अनेक सराव सामने ते खेळू शकले नाहीत. यष्टिरक्षण चांगले झाले असले तरी पूर्ण फिट नसल्यामुळे फलंदाजीत ते चमक दाखवू शकले नाहीत. मात्र मँचेस्टर येथील दुसऱ्या कसोटीत त्यांनी आपल्या जिद्दी खेळाचे प्रदर्शन घडवले. दुखापतग्रस्त असूनही दोन्ही डावांत पूर्ण वेळ यष्टिरक्षण केलेच शिवाय दोन्ही डावांत अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला आधार दिला. भारताच्या दुसऱ्या आणि सामन्याच्या चौथ्या डावात सामना वाचवण्यासाठी, नवव्या क्रमांकाच्या रंगा सोहोनींबरोबर अखेरच्या गड्यासाठी जिद्दीने लढत दिली. प्रतिस्पर्धी गोलंदाजांबरोबरच तेरा मिनिटे आपल्या वेदनांशी लढा देत आपली विकेट वाचवली आणि देशासाठी कसोटीही वाचवली. विशेष म्हणजे कसोटी कारकिर्दीत सलामीला आणि अकराव्या क्रमांकावर खेळण्याची अनोखी नोंद त्यांच्या नावावर लागली.
सततच्या दुखापतींमुळे ह्या इंग्लंड दौऱ्याबरोबरच त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चार सामन्यातच संपुष्टात आली. मात्र १९३४ ते १९४७ या काळात ९६ प्रथमश्रेणी सामने खेळताना त्यांनी एका शतकासह २,४३९ धावा केल्या आणि यष्टीमागे १८७ बळी टिपले. या दरम्यान चार वेळा रणजी चषक विजेत्या मुंबई संघाचे ते महत्त्वपूर्ण सदस्य राहिले. खूप गरीबीतून आले असले तरी दत्ता खूप हसतमुख व्यक्ती होते आणि भारतीय संघाचे लोकप्रिय सदस्य होते. काहीशी तिरकी टोपी घालणे आणि फलंदाजीचा पवित्रा घेताना दोन पायांमध्ये जवळपास ४५ अंशाचा कोन ठेवणे, यामुळे सर्व खेळाडूंमध्ये ते उठून दिसत. गरीबीमुळे चांगले हातमोजे (ग्लोव्हज्) विकत घेण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसत आणि बऱ्याचदा ‘खेरशेद मेहेरहोमजी’ या आपल्या मुंबईकर यष्टीरक्षक सहकाऱ्याकडून ते हातमोजे उसने घेत. कायम निकृष्ट दर्जाचे हातमोजे वापरल्यामुळे त्यांच्या बोटांना नेहमी दुखापत होत असे. तरीही मोहम्मद निसार, अमरसिंग आणि जहांगीर खान यांच्यासारख्या दर्जेदार वेगवान गोलंदाजांसाठी ते सुरेख यष्टीरक्षण करीत.
भारताचे एक तज्ज्ञ यष्टीरक्षक माधव मंत्री सांगत की, १९३६ आणि १९४६ च्या दौऱ्यांमुळे ब्रिटिश समीक्षकांनी हिंदळेकरांना कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंड दौऱ्यावर येणारा सर्वोत्तम भारतीय यष्टीरक्षक मानले. मंत्री असेही म्हणत की, हिंदळेकर क्रिकेट खेळाचे उत्तम प्रकारे निरीक्षण करायचे आणि त्यांचे डोके या खेळात खूप चांगले चालत असे. विस्डेननेही त्यांना भारतातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक म्हणून गणले. पण क्रिकेटमधील प्राविण्याने आणि समीक्षकांच्या कौतुकाने हिंदळेकरांचे दारिद्रयाचे दशावतार काही संपले नाहीत. पत्नी आणि सात मुले अश्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये काम करीत. पण तेव्हा तेथे आजच्यासारखा पगार नव्हता. त्यांना महिन्याला फक्त ८० रुपये मिळत. त्यातच ते सारखे आजारी पडू लागले. जेव्हा ते आजारी पडायचे तेव्हा जे काही वाचवलेले थोडे पैसे असत ते खर्च करावे लागायचे.
असे सांगतात की १९४९ च्या मार्च मध्ये ते जास्त आजारी पडले तेव्हा पैशांची एव्हढी चणचण होती की, कुटुंबिय त्यांना वेळेवर रुग्णालयातही नेऊ शकले नाहीत. जेव्हा मुंबईच्या आर्थर रोड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा फार उशीर झाला होता. दरम्यान मुंबई आणि भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांच्या मदतीसाठी वृत्तपत्रांतून आवाहन केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. ३० मार्च १९४९ रोजी या महाराष्ट्राच्या लढवय्या, गुणी क्रिकेटवीराने पैशांच्या कमतरतेमुळे योग्य उपचारांभावी अवघ्या ४० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मात्र एक ‘न भूतो’ अशी एक घटना घडली. ती म्हणजे ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ने त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी ऑगस्ट १९४९ मध्ये एक ‘कॅब्रे शो’ आयोजित केला. या ‘शो’च्या तिकिटविक्रीतून जमा झालेला सुमारे ७ हजार रुपयांचा नफा त्यांच्या कुटुंबाला देण्यात आला.
१९८३ च्या एकदिवसीय विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट मंडळामध्ये आणि खेळाडूंमध्ये आर्थिक सुबत्ता येऊ लागली. १९९१ च्या भारताच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर ही श्रीमंती आणखी वाढली. २००८ नंतर ‘आय.पी.एल’च्या आगमनाने तर भारतीय क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू करोडोंच्या राशीत खेळू लागले. अश्या या आजच्या ऐश्वर्यसंपन्न जमान्यात दारिद्र्याने व वैद्यकीय सुविधांअभावी मृत्यू पावलेल्या भारतीय क्रिकेटपटूची कहाणी ‘कपोलकल्पित दंतकथा’ वाटावी अशीच. यावर्षी हिंदळेकरांच्या दुर्दैवी अकाली निधनाला ७५ वर्षे पुरी झाली. त्यानिमिताने भारताच्या या गुणी, झुंझार मराठमोळ्या क्रिकेटपटूला विनम्र आदरांजली !!
– गुरुप्रसाद दि पणदूरकर,
(माहीम, मुंबई)
Leave a Reply