रशियाच्या नॉर्वोसिस्क या पोर्ट मध्ये शोअर लिव्ह च्या वेळेस शहरात पायी पायी निघाल्यावर एका बंगल्याच्या कंपाउंड मधून बाहेर लोंबणाऱ्या फांदीवर पीच लगडलेले दिसत होते. त्याखाली फुटपाथवर गळून पडलेले खूप सारे पीच होते. माझ्या सोबत एक चेन्नईचा ट्रेनी सी मन होता, त्याने सांगितले झाडावरचे पीच तोडून खाऊ या आपण, गेल्यावेळेस इथून रस्त्यात पडलेले पीच उचलत असलेले पाहून कंपाउंड मधून एका वृद्धेने सांगितले, की खाली पडलेले नका खाऊ झाडावरचे तोडून न्या लागतील तेवढे.
यूक्रेन मध्ये सुद्धा फुटपाथवर ब्लु बेरीची झाडे आढळून यायची. त्याच्यावर पिकलेल्या बेरी मनसोक्त खायला मिळायच्या. पहिल्याच जहाजावर जेव्हा ब्राझील मध्ये होतो तेव्हा तर तिथली भरपूर फळे खायला मिळायची, जहाज अमेझॉन नदीतून जात असताना लहान लहान होड्यातून नदी किनाऱ्यावर असलेले शेतकरी अननस, कलिंगड, केळी आणि नारळ होड्या भर भरून शहराकडे घेऊन निघालेले असायचे. जहाजाचा स्पीड कमी करून, डिझेल, लुब ऑइल किंवा सरळ पैसे देऊन त्यांच्याकडून भरपूर फळे विकत घेतली जायची. त्या जहाजावर असताना खूप फळे खायला मिळाली. ब्राझील मध्ये पोर्ट असलेल्या शहरात फिरताना आंब्याची झाडे खूप दिसायची. आंबे सुद्धा लाल चुटूक सालीचे असायचे पण चवीला एवढे काही विशेष नसायचे.
पहिल्या जहाजावर जेवढी ताजी फळे खायला मिळाली तेवढी नंतर कुठल्याच जहाजावर नाही. प्रत्येक वेळेस महिन्या दोन महिन्यातून एकदाच जहाजावर ड्राय प्रोव्हिजन आणि फळे व भाजीपाला येत असे. दिवसातून एक वेळा एखाद फळं मिळायचे. कलिंगड, अननस, सफरचंद, संत्र किंवा मोसंबी हेच जास्त करून ठरलेले. केळी आणि द्राक्ष पहिल्या आठवड्यात एखाद दोन दिवस मिळायची पण तीसुद्धा एखाद दुसरं केळ किंवा पंधरा वीस द्राक्ष याच प्रमाणात. फ्रिज रूम मध्ये ठेवलेली सगळी ताजी फळे महिनाभरात संपली की मग कॅन्ड फ्रुट म्हणजे डबाबंद असलेल्या बेचव फळांचे तुकडे मिळायचे.
इंडोनेशियात आल्यापासून जहाजावर प्रत्येक सात दिवसांनी प्रोव्हिजन बोट येत असल्याने रोजच्या रोज ताजी फळे मिळू लागली. व्हीकच्युलिंग अलाऊन्स प्रति व्यक्ती प्रतिदिन 15 डॉलर्स म्हणजे एका दिवसाला जवळपास एक हजार रुपये असल्याने फळे खाण्यावर बंधन नसतं. शिवाय व्हीकच्युलिंग मध्ये कॅटरिंग आणि रूम सर्व्हिस असल्याने मेस रूम सह दिवसातून दोन वेळा प्रत्येक अधिकाऱ्याच्या रूम मध्ये फळे व्यवस्थित कापून आणि प्लेट मध्ये सजवून प्लास्टिक रॅप करून पोचवली जातात.
इंडोनेशियात जहाजावर जाताना आणि जहाजावरून परतताना एखाद दोन दिवस जकार्ताला हॉटेल मध्ये राहावे लागते. मेडिकल क्लिअरन्स मुळे तर कधी कधीआठवडाभर सुद्धा हॉटेल मध्ये राहायची वेळ आलेली आहे. जकार्ता शहरात एका मॉल मध्ये बिग बझार सारखे मोठे कॅरेफोर आहे. तिथे इंडोनेशियातील सगळ्या प्रकारची फळं मिळतात. भारतात मिळणारे जवळपास सगळीच फळं इथं दिसून येतात. परंतु इथं मिळणारा फणस आणि अननस याची चव भारतीय अननस आणि फणसा पेक्षा अप्रतिम आहे. खूपच गोड आणि स्वादिष्ट. आंबा, संत्री आणि द्राक्षे यांची चव मात्र एकदम साधारण त्याबाबतीत आपल्या भारतातील संत्री, आंबे आणि द्राक्षे जगात निश्चितच सर्वोत्तम.
इंडोनेशियात ड्रॅगन फ्रुट आणि मोठ मोठाले पेरू मिळतात. थायलंड सारखेच आकाराने मोठे आणि कमी बिया असलेले पेरू मिळतात.
फणसासारखे काटेरी पण आकाराने थोडे लहान असे डुरियन नावाचे फळ आहे ज्यात दोन किंवा तीन मोठे गरे असतात, फणसासारखे असले तरी त्याची चव खूप वेगळी आहे, काहीशी लसणासारखी.
मंगीस नावाचे एक कवठा सारखे फळं आहे बाहेरून मरून रंगाचे पण आतून त्याला लसणाच्या पाकळ्यांसारखे पांढरे शुभ्र गरे असतात. मंगीसच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या जिभेवर विरघळतात आणि त्याची चव तर एवढी अप्रतिम आहे की एक किलोभर मंगीस दिले तरी कोणीही ते सहज संपवेल.
रांबूतान नावाचे बाहेरून काटेरी पण हाताला मऊ लागणारे लालसर रंगाचे लिची सारखे फळ आहे. त्याची चव सुद्धा लिची सारखीच लागते, पण चवीपेक्षा ते दिसायलाच जास्त सुंदर आहे.
रस्त्या रस्त्यावर ताड गोळे प्लास्टिकच्या पिशवीत बांधून विकणारे फेरीवाले दिसतात. ताडगोळ्या सह पांढरी शुभ्र ताडीसुद्धा पिशवीत बांधलेली दिसते. अवोकाडो ची जहाजावर भाजी बनवली जाते.
जिबुड किंवा मस्क मेलन यासारखे इथे रॉक मेलन नावाचे फळ आहे, खूपच गोड आणि रंगाने केशरी असलेल.
सापाच्या स्किन सारखीच साल असणारे स्नेक फ्रुट मोठ्या प्रमाणावर मिळते. स्नेक फ्रुट ची साल काढल्यावर आत दोन गरे असतात. फणसासारखे दिसणारे गरे खाताना नारळाच्या तुकड्यासारखे लागतात पण चव काहीशी संमिश्र अशी असते, काहीशी गोड काहीशी तुरट पण पूर्णतः वेगळी.
इंडोनेशियात लोकल फूड काही आवडले नाही पण लोकल फ्रुट्स खूप आवडतात.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply