नवीन लेखन...

इजिप्तमधले साप

या पुस्तिकेत ३७ विषारी सापांच्या माहितीचा समावेश केला असल्याचं, त्यांतील इतर माहितीवरून दिसून येतं. मात्र यांतील तेरा जातींच्या नोंदींची पानं गहाळ झाली आहेत. त्यामुळे या तेरा जातींची माहिती अर्थातच उपलब्ध नाही. किंबहुना उर्वरित जातींपैकीसुद्धा, खुद्द इजिप्तमध्ये आज यांपैकी फारशा जाती आढळत नाहीत. उदाहरणार्थ, पपायरसमध्ये उल्लेख केलेल्या अ‍ॅपोफिसच्या सापाशी साम्य असणारा कोणताच साप आज इजिप्तमध्ये अस्तित्वात नाही. पपायरसमध्ये केलेल्या वर्णनानुसार, या अ‍ॅपोफिसच्या सापाला चार सुळे आहेत. मात्र इजिप्तमध्ये आज सापडणाऱ्या कोणत्याच सापाला चार सुळे नाहीत. अ‍ॅपोफिस सापाशी काहीसं साधर्म्य असणारा, चार सुळ्यांचा अतिविषारी साप म्हणजे आफ्रिकेतील सहारा वाळवंटाला लागून असणाऱ्या गवताळ प्रदेशात आढळणारा, बूमस्लँग हा साप. मात्र हा साप इजिप्तच्या जवळ तर नाहीच, परंतु इजिप्तपासून सुमारे साडेसहाशे किलोमीटर अंतरावरच्या दक्षिणेकडील प्रदेशात आढळतो.

इजिप्तमधील प्राचीन काळच्या या सर्व सापांनी आजच्या संशोधकांत कुतूहल निर्माण केलं आहे. साहजिकच संशोधकांकडून, पपायरसमध्ये उल्लेख केलेले साप म्हणजे आजच्या सापांच्या कोणत्या जाती, हे शोधून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र सापांच्या ब्रूकलिन पपायरसमधील वर्णनात बरीच संदिग्धता असल्यानं, संशोधकांतही याबाबतीत मोठी मतभिन्नता आढळते. ब्रूकलिन पपायरसमध्ये उल्लेख केलेल्या एकेका सापासाठी, वेगवेगळ्या संशोधकांकडून वेगवेगळ्या जातींची नावं सुचवली गेली आहेत. त्यामुळे या सापांची ओळख पटवण्यात अडचण निर्माण झाली आहे. मात्र इंग्लंडमधील बँगॉर विद्यापीठातील एलिशा मॅकब्राइड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आता, हा तिढा सोडवण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. या संशोधकांनी, या सापांच्या जाती जाणून घेण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबला. एलिशा मॅकब्राइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी, आज अस्तित्वात असलेले कोणते साप त्याकाळी अस्तित्वात होते, हे त्याकाळच्या हवामानाच्या आधारे जाणून घ्यायचं ठरवलं. या संशोधकांनी, प्राचीन इजिप्तमधील पूर्वीच्या काळातील हवामानाबद्दल, आतापर्यंत झालेल्या संशोधनाचा आढावा घेतला. त्यानंतर, आज आढळणारे कोणते साप त्या काळच्या हवामानात अस्तित्वात असू शकतात, याचा एका संख्याशास्त्रीय प्रारूपाद्वारे शोध घेतला. हे प्रारूप एखाद्या सजीवाच्या जाती जगात कुठे कुठे अस्तित्वात आहेत, हे लक्षात घेऊन त्यांच्या वैपुल्याची तिथल्या हवामान व तत्सम परिस्थितीशी सांगड घालतं. एकदा या प्रारूपाला अशा ठिकाणांची ओळख करून दिली, की एखाद्या विशिष्ट हवामानात हे सजीव कुठे आणि किती प्रमाणात अस्तित्वात असू शकतात, हे समजू शकतं.

इजिप्तमधील हवामानात गेल्या काही हजार वर्षांत मोठे बदल झाले असल्याचं दिसून येतं. एकेकाळी इजिप्त हा आजच्यासारखाच, अत्यंत रुक्ष प्रदेश होता. परंतु इ.स.पूर्व ८,५०० वर्षांपूर्वी इजिप्तमधल्या हवामानाचं रुक्ष स्वरूप बदलून तिथल्या हवामानाला दमटपणा प्राप्त झाला. त्यामुळे इजिप्तचं रूपांतर गवताळ प्रदेशात झालं. या गवताळ प्रदेशात, शहामृगापासून ते हत्ती, जिराफ, यासारखे मोठे प्राणीही वावरले आहेत. काही प्रकारचे उभयचर तसंच कासवंही त्या प्रदेशात अस्तित्वात असल्याचं, दिसून आलं आहे. यावरून या गवताळ प्रदेशात पूर्वी दलदलही असल्याचं, दिसून येतं. या ओल्या हवामानामुळे त्याकाळी, हा प्रदेश सापासारख्या सरीसृपांचंही निवासस्थान असण्याची खूपच शक्यता आहे. इजिप्तमधील पुरातन काळातली ही परिस्थिती लक्षात घेऊन, या संशोधकांनी आपल्या संशोधनासाठी, आज अस्तित्वात असलेल्या एकूण दहा जातींच्या सापांची निवड केली. ही निवड करताना, त्यांनी विविध निकष वापरले. त्यातले काही निकष म्हणजे, ती जाती आज त्याकाळच्या इजिप्तसारखं हवामान असणाऱ्या प्रदेशात आढळायला हवी, ती जाती पूर्वीच्या इजिप्तच्या साम्राज्याच्या लगतच्या प्रदेशात आज आढळायला हवी, तसंच ती जाती सहजपणे ओळखता येणाऱ्या जातींपैकी असायला हवी, इत्यादी. या संशोधकांनी निवडलेल्या दहा जातींत बूमस्लँग, पफ अ‍ॅडर आणि ब्लॅक मांबा या अतिविषारी सापांच्या जातींचा समावेश होता.

इजिप्तमधील पूर्वीचं हवामान लक्षात घेऊन, त्याकाळी या सापांचं वैपुल्य कोणत्या प्रदेशात किती होतं, हे या संशोधकांनी आपण वापरलेल्या संख्याशास्त्रीय प्रारूपावरून जाणून घेतलं. या प्रारूपानं, संशोधनासाठी निवडलेल्या सापाच्या दहा जातींपैकी, नऊ जाती प्राचीन इजिप्तमध्ये वास्तव्याला असल्याचं, दाखवून दिलं. या जाती मुख्यतः, त्या काळच्या दक्षिण आणि आग्नेय इजिप्तमध्ये म्हणजे आजच्या सुदान आणि तांबड्या समुद्राच्या काठावरच्या प्रदेशात अस्तित्वात होत्या. तसंच काही जातींचं वास्तव्य हे नाईल नदीच्या सुपीक खोऱ्यात किंवा इजिप्तच्या उत्तरेकडील (भूमध्य सागराजवळील) किनाऱ्याजवळही होतं. हे सर्वच प्रदेश त्याकाळच्या इजिप्तच्या साम्राज्याचा भाग होते. अभ्यासलेल्या दहा जातींपैकी, चार सुळे असणारा ब्लूमरँग हा साप तांबड्या समुद्राच्या किनाऱ्याजवळ राहात होता. ब्रूकलिन पपायरसमध्ये, क्वेल या पक्षासारखा दिसणारा आणि लोहाराच्या भात्यातून येणाऱ्या आवाजासारखा आवाज काढणारा, असं एका सापाचं वर्णन आहे. हे वर्णन पफ अ‍ॅडर या सापाशी जुळतं. हा साप आता फक्त सुदानमधील खार्टूम आणि उत्तर एरिट्रिआ इथे सापडतो. मात्र एके काळी या सापाची व्याप्ती बऱ्याच उत्तरेपर्यंत, म्हणजे आजच्या इजिप्तमध्येही असल्याचं संख्याशास्त्रीय प्रारूपावरून दिसून आलं. याचबरोबर ब्लॅक मांबा हा विषारी साप सुदानच्या मध्यभागापर्यंत तसंच आजच्या इजिप्तच्या आग्नेय टोकापर्यंत वावरत होता.

इजिप्तमधील हा दमट कालखंड कालांतरानं, सुमारे इ.स.पूर्व ५,३०० वर्षांपूर्वी संपुष्टात आला आणि इजिप्त पुनः रुक्ष होऊ लागलं. फेरोंच्या (तिथले राजे) काळापर्यंत इजिप्त जरी पुनः रुक्ष झालं असलं तरी, सर्व इजिप्त काही एकाच टप्प्यात रुक्ष झालं नाही. इजिप्तचं हे रुक्ष होणं, हळूहळू घडून येत होतं. इजिप्तचा मोठा भाग रुक्ष झाल्यानंतरही, नाईलच्या खोऱ्यात दमटपणा टिकून राहिला होता. त्यामुळे या नंतरच्या काळातही या सापांनी, आपलं तिथलं अस्तित्व काही काळासाठी टिकवून ठेवलं असावं. या काळात इजिप्तमध्ये सर्पदंश ही नित्याचीच बाब असावी. ब्रूकलिन पपायरससारखं लिखाण हे याचंच द्योतक आहे. पपायरसमध्ये वर्णन केलेल्या सापांशी साधर्म्य दाखवणारे, अनेक जातींचे साप तेव्हा आणि आजही अस्तित्वात असल्याचं, एलिशा मॅकब्राइड आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या संशोधनातून दिसून येतं. ‘एन्व्हिरॉनमेंटल आर्किऑलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानं, प्राचीन इजिप्तमधील सापांची ओळख पटवून देऊन, मोठी कामगिरी पार पाडली आहे.

(छायाचित्र सौजन्य : (Image Credit: kairoinfo4u / Brooklyn Museum / William Warby/Wikimedia)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..