नवीन लेखन...

सोंग

पिंट्या अन बाळ्या दोघं लय जिगरी दोस्त व्हते.दोघबी शेजारी शेजारीच राहायचे.एकाच वयाचे आसल्यानं ते शाळत बी संगमंगच व्हते.जिवणातल्या जवळपास सगळ्याच उन्हाळ्या पावसाळ्यात ते साथीलं व्हते.नेहमी एकमेकांचे सुख दुख वाटुन घेयाचे.तेह्यचे लग्न बी दहा पंधरा दिवसांच्या अंतरानच झाले व्हते.दोघायच्या बायका बी सुशील व्हत्या.या दोघांसारखीच तेह्यची बी लवकरच घट्ट मैत्री झाली व्हती.संसारातले सुठ दुःख वाटचन घेतांनीच एकमेकीच्या अडीअडचणीलं त्या तत्पर धावुन जायच्या.लग्नानंतर पिंट्याच्या संसारवेलीवर एक मुलगा अन एक मुलगी असे दोन फुलं फुलले व्हते.बाळ्याच्या बायकोची कुस अजुनमात्र उजवली नवती.बाळ्या अन बाळ्याच्या बायकोलं तेह्यच्या संसारात नेहमीच लेकरायची उणीव जानवायची.पिंट्या अन बाळ्याची मैत्री जरी घट्ट आसली तरी बी एकमेकाची खोडी काढण्याची तेह्यलं लय आदत व्हती.

एकदा अस झालं की पोळ्याचा सन व्हता.पोळ्याच्या दुसर्‍या दिशी गावात कर आसायची.करीलं गावात सोंग व्हयाचे.सोंगं मंजे काही पुरानातले संदर्भ घेऊन नाय तं प्राण्यांच्या वेशभूषा करून गावातले लोकं झाक्या करायचे.तं आसच एका पोळ्यालं एकदा करीचा कार्यक्रम व्हता.कर आसल्यानं सगळं गावं धोंडुपाटलाच्या गावखरी जमलं व्हतं.आंदल्या दिशीच पोळा धुमधडाक्यात साजरा झाला होता.आज कर होती.रिवाजानुसार सगळ्या लोकायनं आपापले बैलं ग्रामदैवत कानुबाच्या पाया पडायलं नेऊन आनले व्हते.आत्ता सगळ्यायच्या नजरा करीच्या सोंगायवर लागल्या व्हत्या.गावातले हवसे नवसे कलाकार पोरं वेगवेगळ्या झाक्या बसवत आसतं.यंदा आम्ही बी रामायणातल्या लंकादहनावर झाकी बसवली व्हती.आमच्या टिममध्ये गावातला सगळ्यातं ईपितर आन खोडकर पिंट्या व्हता.झाकीत त्यो हनुमंताचा रोलं करणार व्हता.तसं पाह्यल तं पिंट्या लयच हौशी होता.पिंट्या आन बाळ्या जिगरी दोस्त व्हते पण एकमेकावर कुरघोडी करायची एक बी संधी ते सोडत नसत. आज पिंट्याची मजा घेयाच बाळ्यानं ठरवलं व्हतं.आम्ही गावच्या सोंगात लंका दहनाची झाकी करायचं ठरवलं व्हतं.त्यात लंका दहणाचा सिन दाखवायसाटी शेपटीलं बारकाले एल.ई.डी लाईट लावले व्हते… आग दाखवायसाठी…! नाटक रंगात आलं होतं. मग हळूच बाळ्यानं हानुमान बनलेल्या पिंट्याच्या शेपुटालं डब्बीची काडी लावली.पिंट्याच्या शेपटालं आग लागली हे त्याच्या ध्यानातच आलं नाही.ते आपलं जिवतोडुन अभिनय करत व्हता.आग पाहुन लोकायलं वाटलं कि लंकादहनाचा सिन हुबेहुब वाटावा मनुन पिंट्यानं शेपुटालं आग लावुन घेतली काय की.लोकं पिंट्याच्या या धाडसावर टाळ्या वाजवु लागले.पिंट्यालं वाटलं आपला अभिनय लय चोख व्हयाला मनुनच लोक टाळ्या वाजवायलेत कानु.ते आंजुकच जोमानं उड्या मारत मारत “जय श्री राम” मनु लागला.लोकं तो तो टाळ्या वाजवु लागले.शेपटालं आग लागली हे आंजुकबी पिंट्याच्या ध्यानी मनीबी नवतं.म्या वरडुन त्यालं सांगायचा परयत्न केला पण पिंट्यानं मह्या आवाजाकडं काना डोळा केला.ते आपल्याच मस्तीत उड्या मारू लागला.त्यालं वाटलं आपल्या शेपटावरचे लाईटच लागलेत मनुन.जव्हा तिथं बसलेल्या दोन-चार लोकांच्या धोतरायलं आग लागली तव्हा पिंट्याच्या ध्यानात आलं,की बाबा आग लागली म्हणून….मंग पिंट्या जीवाच्या आकांताने पळू लागला …त्यानं पळत जाऊन धोंडु पाटलाच्या आखाड्यावरच्या ईहरीत उडी मारली.ईकडं धोतरायलं आग लागल्यान मानसायत पळापळ झाली.दोन चार धाडसी पोरांनी काळ्या धारचे बोंदरं वल्ले करून त्या लोकांच्या धोतरालं लगलेली आग ईझवली.नाटकाचा तं फियास्को झालता.सगळं गाव आमच्यावर खो खो हासु लागलं.आम्हालं लय शर्मिंद वाटु लागलं.ह्या घटनेचा करता करविता बांगा बाळ्या मात्र आमच्या फजितीवर भलताच खुश दिसु लागला.एव्हाना बाळ्याची करतुतं पिंट्याच्या ध्यानातं आलती त्यामुळं पिंट्या बाळ्यावर दात व्हट खाऊ पिंट्याबी सगळ्या गावाम्होरं पिंट्यालं,“शेपुटालं आग लागली कुकुडऽऽ कुऽऽ…” आस मनुन खिजवु लागला.पिंट्या मनातुन बाळ्यावर लय रागावायचा.मंग त्यानं बाळ्याचीबी एकदिवस आशीच सगळ्या गावाम्होरं फजीती करीन आसा पणच केला.

दिवसा माघं दिवस जात व्हते.बाळ्या आत्ता बी पिंट्यालं चार चौघात पाह्यलं कि हमखास खिजवत मनायचा कि,“शेपुटालं आग लागली कुकुडऽऽ कुऽऽ….”आन दात ईचकत हासायचा.मंग संगचे लोकबी खो खो हासायचे.आजकाल बाळ्याचं पिंट्यालं चिडवणं जरा जास्तच झालतं.पिट्यालं चार चौघात बसनं बी मुश्कील झालतं.पिंट्या जाईल तिथं बाळ्या टपकायचाच.आन त्याचं शेपुटपुरानं सुरू व्हयाचं.पिंट्यालं हे नको झालतं.बाळ्यालं चांगली अद्दल घडवायची व्हती पण ते बेणं काय गावत नवतं.पिंट्या रातंदिस ईचार करू लागला.घरीबी रूंगुन रूंगुन राहु लागला.हि गोष्ट त्याच्या बायकोच्या ध्यानात आली.तिनं खोदु खोदु ईचारल्यावर पिंट्यान सगळी हकीकत बायकोलं सांगीतली.थोडा वेळ नवरा बायकोनं ईचार केला.मंग पिंट्याच्या बायकोनं पिंट्याच्या कानात एक प्लॅन सांगला.

एकादिशी पिंट्याच्या बायकोनं बाळ्याच्या बायकोलं घरी बलवलं.बोलता बोलता तिनं लेकरायचा ईषय केला.लगन व्हवुन पाच सहा वरसं झाले तरी लेकरूबाळ व्हईनं काही देवा धरमाच कर मनली.तिच्या वळखीचा एक महाराज आसुन त्यानं सांगलेला उपाय केला की लेकरूबाळ व्हते आसं तिनं बाळ्याच्या बायकोलं सांगलं.तिच्या नात्यातल्याबी एका बाईलं लग्नानंतर सात आठ वरसं लेकरूबाळ नवतं.पण महाराजानं उपाय सांगला अन तिलं लवकरच लेकरू झालं आस मनली.कोणालबी न सांगता उद्याच जाऊ आसं तिनं बाळ्याच्या बायकोलं मनलं.ती तय्यार झाली.ईकडं पिंट्यानं महाराजालं आंधीच पटवुन ठेवलं व्हतं.त्याची सायसोय केल्यानं महाराजबी लगेच तय्यार झालता.दुसर्‍यादिशी बाळ्याची बायको घरी कोणालं काही नं सांगता पिंट्याच्या बायकोसंगं महाराजाकडं गेली.महाराजाच्या दरबारात आंधीपसूनच लय गर्दी होती.पिंट्याच्या बायकोनं महाराजालं सगळी हकीकत सांगतली. महाराजांनं डोळे बंद केले आण ईचार करू लागला. दोन-तीन मिनिटानंतर महाराजांना डोळे उघडले आन घोरपड घोरपड असं म्हणू लागला की,“लय दिसांपुर्वी तुमच्या कुळात एक जणांनं गर्भातच लेकरालन मारलं व्हतं.आत्ता तेव न जलमलेला गर्भ तुमच्यावर सुड उगवुन तुमचा वंश वाढू देत नाही” तसं बाळाचे बायकोने याच्यावर काही उपाय आसल नं आस महाराजालं ईचारलं. तसं महाराजानं पुन्हा एकदा डोळे बंद केले.दोन तीनं मिनटानं त्यानं डोळं उघडुन त्यांना सांगतलं की,“उपाय आहे….आवसच्या आंधार्‍या राती करावं लागल.कुणी पाहता कामा नयं” तसं बाळ्याची बायको,“व्हय महाराज व्हयं,लेकरासाठी आम्ही कायबी करायलं तय्यार हेत” असं मनली. मंग महाराज मनला की,“येत्या आवसलं राती बारा वाजता तुह्या नवर्‍यानं आंघुळ करून ढवळ्या गाईचं शेन आणायचं.त्यालं आगदा कुंकु वाह्याच्या.आन दोन हातात ते शेन घेऊन हुंगत हुंगत ईहीर नाय तं नदित टाकायचं,पण ध्यानात ठुवा कि हे करतांनी कोणाच्या नजरत येवु नको मनावं.” झालं महाराजांनं सांगतलेला उपाय ऐकून बाळ्याची बायको लय खुश झाली.ती आनंदान घरी आली. तिनं बाळ्यालं सगळी हकीकत सांगतली.तसा बाळ्या या गोष्टीला तयार होईनं गेला.“असं कुठं असते का,आसं काय बी नसते.मव्हा भरूसा नाही महाराजा फियराजायवर” आसं त्यानं बायकोलं मनल. पण त्याची बायको ऐकायलच तयार नवती.पण बायकोच्या हट्टापुढं शेवटी बाळ्यालं हार मानाव लागली.अन तेव हा उपाय करायलं तयार झाला.

ठरल्याप्रमाणं औसच्या राती बाळ्यानं आंघुळ करून ढवळ्या गाईचं शेन आनलं.त्यावर आगदा अन कुखु वाहुन ते शेन हातात घेतलं अन कोण पहात नाही नं याची खातरजमा करून ते शेन हुंगत हुंगत ईहीरीकडं निंघाला.आन ईहरीत टाकुन घरी आला.आपल्यालं कोणी पाह्यलं नाही याच त्यालं समाधान वाटलं.
दुसऱ्या दिवशी आसच पिंट्या गावातल्या लोकायसंग पारावर गप्पा मारत बसला व्हता.तेव्हड्यात बाळ्या तिथं आला.मंग सवयीप्रमाणं पिंट्यालं खिजवत बाळ्या मनु लागला, “शेपुटालं आग लागली कुकुडऽऽ कुऽऽ….”आन फिदीफिदी हासु लागला.संगचे लोकबी हासु लागले.मंग पिंट्यानंबी बाळ्यालं उत्तर दिलं की,“चुप बस शेनहुंग्या वासाड्या तुऽऽ“ आस पिंट्यानं मनल्या मनल्या खाडकण बाळ्याचा चेहरा पडला.त्यालं लयच खजिलवाणी वाटलं.पारावर बसलेले सगळे जनं खो खो करून बाळ्यालं हासु लागले.बाळ्या अपमाण्यावणी तिथुन निंघुन गेला.त्यालं आत्ता कायमची अद्दल घडली होती.पिंट्याबी आत्ता चारचौघात भिड न बाळगता बसु लागला.

©गोडाती बबनराव काळे
,हाताळा,हिंगोली.
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..