साबण म्हणजे मेद (चरबी) व सोडियम किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे मिश्रण. ८० ते १०० अंश तापमानाला गरम करून सॅपोनिफिकेशन प्रक्रियेने मिळवलेले मेदाम्लाचे सोडियम किंवा पोटॅशियम क्षार असतात. ती एक प्रकारे मेदाच्या हायड्रॉलिसिसची प्रक्रिया असते, त्यात ग्लिसरॉलही तयार होत असते.
यात आम्ल व अल्क म्हणजे अॅसिड आणि बेस (मेद व सोडियम हायड्रॉक्साईड) यांच्यात अभिक्रिया होत असते. त्यात ट्रायग्लिसराईडपासून मेदाम्ले वेगळी होऊन हायड्रॉक्साईड आयनात मिसळतात, त्यामुळे बनलेला क्षार म्हणजे साबण असतो. साबणाच्या प्रत्येक रेणूत हायड्रोकार्बनची साखळी असते. निसर्गतः पाणी व तेल एकत्र होत नाही पण साबणामुळे तेलाचे किंवा कपड्यावरील घाणीचे रेणू हे निघून येतील अशा पद्धतीने इमल्सिफायरचे काम करतो.
साबणामुळे दोन उद्देश साध्य होतात; एक म्हणजे पाण्याचा पृष्ठीय ताण कमी होतो व दुसरे म्हणजे कपडे किंवा अंगावरील मळ निघून जातो. हे कसे घडते, तर साबणाच्या रेणूचा एक भाग जलस्नेही तर दुसरा असतो. जलद्वेषी जलस्नेही भाग जलद्वेषी मेदाम्लांना पृष्ठभागावरील जलद्वेषी पदार्थांच्या संपर्कात आणतो. त्यामुळे ती घाण साबणातील मेदाम्लांना चिकटते व पाण्याच्या थेंबामध्ये बांधली जाते. त्यामुळे ती निघून येण्याचे काम सोपे होते. घाण, तेल, जीवाणू अशा अवस्थेत सहज निघतात.
त्यामुळे साधा साबणही जीवाणूंपासून आपला बचाव करतो. साबणात जीवाणूरोधक म्हणून ट्रायक्लोसान व ट्रायक्लोकार्बन मिसळले जातात. पण आपण जेव्हा हात धुतो तेव्हा साबण लावून फेस करून लगेच धुवून टाकतो त्यामुळे ही रसायने हातावर राहण्यास वेळही मिळत नाही. त्यामुळे या घटकांचा व्हायचा तो उपयोग होत नाही.
अशा साबणांना अँटीमायक्रोबियल साबण म्हणतात. शिवाय त्यामुळे घाम शोषून घेणारे तसेच इतर घातक जीवाणूंपासून बचाव करणारे जीवाणूही निघून जाऊ शकतात. माणसाला होणारे अनेक रोग हे विषाणूंमुळे होतात, त्यामुळे अँटीमायक्रोबियल साबणाने ते थांबत नाहीत. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ निकोलस लेब्लान्क याने पहिल्यांदा कॉस्टिक सोडा तयार केला.
ती साबण बनवण्याची पहिली पायरी होती. नंतर फ्रान्समध्ये साबणाचे उत्पादन सुरू झाले. लंडनमध्ये अँड्र्यू पिअर्स यांनी पहिला पारदर्शक साबण बनवला, त्यानंतर विल्यम हेस्केथ लिव्हर यांनीही साबण उत्पादनात बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. धुण्याच्या साबणात सरफॅक्टंट, प्लास्टिसायझर, बाइंडर, लॅथर एनहान्सर (फेसकारक), सुवासिक द्रव्ये, रंग, पाणी हे घटक असतात. अंग धुण्याच्या साबणात सोडियम लॉरथ सल्फेट, सोडियम पामिटेट, सोडियम इसथिओनेट, सोडियम ऑलिव्हिएट, सोडियम कोकोएट वापरतात.
Leave a Reply