आजकाल कुणाशीही बोलावसं वाटत नाही. खूप खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहरे. ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना की नको वाटतं …
इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात? ह्यात आपले लोक पण असतात हे विशेष!
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला एडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका नकाराने बदललेले बघितले आणि वाटलं, ‘आपण एकटे असतो तेच बरं असतं.’
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदामध्ये रमावं, मन प्रसन्न राहतं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता…
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूड्स संभाळण, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो. सतत दुसऱ्यांचा विचार करताना आपल्याला “स्वतःला काय हवं आहे” हा प्रश्न कधी मागे राहतो हे काळतच नाहि. आपण इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.
मग अशा वेळी प्रश्न पडतो “हे सगळं कशासाठी?”
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचे एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे – “आपण एकटेपणाला घाबरतो.”
सुरक्षतेसाठी कळपात राहिलं पाहिजे हि एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. एकटे पडू या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण “सोबत”, “मैत्री” ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.
लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला “सोबत” असं गोंडस नाव देतो. आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोस होतो.
मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो. जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.
‘मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन’ असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. मोजकीच पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी –
“सोबत…!”
माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायच
— सुमंत आचार्य
Leave a Reply