वृत्तपत्र, प्रकाशक, थिएटर, डायस, सगळ्यांचीच भूमिका एकाचवेळी निभावू शकणारी सोशल मिडिया सध्या जगामध्ये अवतरली आहे. लिहून वाचून मोठी झालेली आमची शेवटची पिढी जोपर्यंत जगात आहे तोवर या सगळ्यांचे अस्तित्व टिकून राहणार आहे. त्यानंतर मात्र अवघड आहे.
कुठल्या बातम्या मिडियामध्ये पेरायच्या, कुणाच्या बाजूने मिडीयाने झुकतं रहायचं, कुठल्या कलावंताला प्रोजेक्ट करायचं, कुणाचे लेख छापायचे कुणाचे केराच्या टोपलीत टाकायचे या सगळ्याची मनमानी आता संपुष्टात आली आहे.
अनेक प्रथितयश लेखकांचे किस्से आपण ऐकतो, पंचवीस प्रकाशकांनी नाकारलेली कादंबरी कशीबशी प्रकाशित झाली आणि हिट झाली.
अनेक प्रॉडक्शन युनिट्सनी नाकारलेला कलाकार कुठल्यातरी नवोदित प्रॉडक्शन कंपनीच्या आर्ट मधून झळकला आणि सुपरस्टार झाला.
थोडक्यात काय तर सोशल मिडीयाने कलेच्या क्षेत्रातली, राजकारणातली, लेखनात असलेली एकाधिकारशाही संपवून टाकली. इतकंच नाही तर या सोशल मिडियाने शिक्षणक्षेत्रात असणारी एकाधिकारशाही सुद्धा मोडीत काढण्याचा चंग बांधलेला आहे. अत्यंत कुशल शिक्षक हे विशिष्ठ एज्युकेशन इन्स्टिट्यूटची किंवा विशिष्ठ खासगी ट्युशन्सची मालमत्ता राहिलेले नाहीत. कुशल शिक्षक त्यांचे लेक्चर्स सोशल मिडियावरती प्रकाशित करून मुलांमध्ये त्यांची असणारी लोकप्रियता आजमावून पाहू लागलेले आहेत. कुशल शिक्षकांच्या या शैक्षणिक चॅनल्समुळे मोठमोठ्या शैक्षणिक संस्था आणि खासगी ट्युशन्स मोडीत निघण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. ज्याच्या अंगी खरोखरीच कला आहे हुशारी आहे कौशल्य आहे त्याला आता कुणाच्याही मध्यस्थाची आवश्यकता राहिलेली नाही.
- शैक्षणिक संस्था मोडीत निघू लागल्या तर कदाचित आरक्षणाच्या मागण्या सुद्धा मोडीत निघू शकतील.
- शैक्षणिक चॅनल्सवरती लेक्चर्स अटेंड करून अगदी मॅनेजमेंट सारखे कोर्सेस सुद्धा करता येऊ शकतील.
- विद्यापीठांनी फक्त परीक्षा घेण्याचं काम करायचं, ऍडमिशन लेक्चर्स क्लासरूम्स सगळं मोडीत निघू शकतं.
- जो परीक्षा देईल आणि त्यामध्ये उत्तीर्ण होईल त्याला डिग्री मिळेल.
विद्यापीठ फारफार तर प्रत्येक विषयाच्या त्यांच्या प्रोफेसर्सना रेकमेंड करू शकेल, हे प्रोफेसर्स आमच्या सिलॅबस प्रमाणे त्यांची लेक्चर्स व्हायरल करतील, अशा प्रोफेसर्सची नांवे विद्यार्थ्यांमध्ये पब्लिश करू शकेल.
मेडिकल इंजिनिअरिंग सारख्या प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्सेस साठी थेट इंडस्ट्रीज बरोबर आणि मोठं मोठ्या हॉस्पिटल्स बरोबर विद्यापीठं टाय अप करू शकतील.
एखाद्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेले क्रिटिकल ऑपरेशन युनिव्हर्सिटीच्या विशिष्ठ विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या चॅनल साठी लाईव्ह दाखवता येऊ शकेल.
आयटीआय किंवा पॅरामेडिकल आणि नर्सिंगच्या कोर्सेसला मात्र कॉलेजेसची आवश्यकता नक्कीच भासेल यात शंकाच नाही.
उद्या कदाचित त्यालाही इंडस्ट्रीज मदत करू शकतील.
विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थी दशेत अत्यंत कुशल प्रॅक्टिशनर्सच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची निर्विवाद संधी या बदलत्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मिळू शकेल.
इतकंच नाही तर सोशल मिडिया हे मुल्ला मौलवींना पाद्री लोकांना आणि भटजी लोकांना सुद्धा एक चॅलेंज म्हणून उभे रहात आहे.
ज्या निर्माते दिग्दर्शक कलावंतांना टीव्हीवर आणि थिएटरवरती संधी मिळत नाही, असे कलावंत सोशल मिडियावरून आपल्या कला सादर करताना दिसतात.
लोकप्रियतेच्या प्रेशर खाली असेल पण कधी ग्रामीण भाषा म्हणून किंवा अति परखडपणा दाखवायचा म्हणून ही मंडळी अश्लील झालेली दिसतात.
यांना भवितव्य नाही, हे पैसे भरून स्वतःला व्हायरल करतात. म्हणजे प्रेक्षक नसले तरी बळंनेच नाटकाचे दहा वीस प्रयोग पैसे खर्चून करून बघतात, पण त्याने लोकप्रियता वाढू शकत नाही.
आता फक्त टॅलेंटच टिकू शकते.
आपले सगळे संत कवि लोकाश्रयानेच मोठे झालेले दिसून येतात, त्यांना राजाश्रय कधीच मिळाला नव्हता. संत मंडळींना त्यांचा लोकाश्रय सिद्ध करण्यासाठी जी अथक यातायात करायला लागली ती सोशल मिडीयाने संपवून टाकली आहे.
लोकांच्या प्रवृत्तीमधला दोष सोशल मिडिया मध्येही अगदी जसा अन तसा प्रतिबिंबित होताना दिसतो.
सवंगतेला किंवा दिखाऊपणाला ताबडतोब प्रतिसाद मिळतो आणि वैचारीक गोष्टींना किंवा परीवर्तनशील विचारांना तसे विचार मांडणाऱ्या कलेला अतिशय मोजका आणि संथ प्रतिसाद मिळतो.
माझा अनुभव असा आहे की थेट प्रतिसाद मिळाला नाही तरी वैचारीक गोष्टी माणसांच्या मनामध्ये रुतून बसतात, जेव्हा कधी भेट होईल तेव्हा त्या व्यक्ती त्या त्या विषयांवर आवर्जून चर्चा करतात आणि ऍपरिशिएट सुद्धा करतात, पण सोशल मिडियावर जाहिर प्रतिसाद देताना बिचकतात.
आपली मतं आणि आपली बाजू परखडपणे आणि निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी समाज मानसिक दृष्ट्या आणखी प्रगल्भ होणे आवश्यक आहे असे मला वाटते.
प्रकाशन संस्था, थिएटर्स, वृत्तपत्रे, यांना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर स्वतःचे वेगळेपण शोधावे लागेल, ते लोकांच्यासमोर मांडावे लागेल.
वृत्तपत्रांनी एकाच भांडवलदारकडून पैसे घेऊन एकांगी विचाराने चालण्याच्या ऐवजी, सर्वांगीण विचाराने पुढे जाणे त्यांच्या भल्याचे ठरू शकते.
आता आयुष्य कधी नव्हे इतके बदलत चालले आहे.
‘जो माझा आहे तोच लायक आहे’ चा जमाना काळाच्या पडद्याआड जाऊन ‘जो लायक आहे तोच माझा आहे’ चा जमाना अवतरला आहे.
सोशलमीडिया मुळे भगवद्गीता खरोखरच अवतरताना दिसते आहे.
— विनय भालेराव.
Leave a Reply