अनुताई वाघ यांचा जन्म १७ मार्च १९१० रोजी मोरगाव येथे झाला. पुण्यामधील मोरगाव येथील धूंडिराज वाघ हे त्यांच्या वडिलांचे नाव असून आईचे नाव यमुनाबाई असे होते. त्या सोनोरी येथील पानसे राजघराण्यातील होत्या. त्यांचे वडील सुधारकी आणि उदारमतवादी होते. त्याचप्रमाणे ते अत्यंत बुद्धिमान आणि प्रेमळ होते. अनुताईंचे शिक्षण तसे सरळ झाले नाही. त्यामध्ये भर की काय म्हणून की काय लग्न १९२३ साली तेराव्या वर्षी शंकर वामन जातेगावकर यांच्याशी झाले. परंतु त्यांना सासरचे दर्शन फक्त वरातीमध्येच झाले कारण लग्नात त्यांचे वय लहान असल्यामुळे त्या लग्नानंतर आपल्या वडिलांकडेच होत्या. त्यांचे पती मनमाड रेल्वे लाईनवर फिरत असतांचाच त्यांच्या पतीचे म्हणजे जातेगावकर यांचे अपघाती निधन झाले.
त्यानंतर १९२५ मध्ये इगतपुरीमध्ये व्हरर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास होऊन त्यात त्या पहिल्या आल्या. पुढे त्यानंतरची तीन वर्षे झाल्यानंतर त्यांना पुण्याच्या ‘ वुमेन्स ट्रेनिग्ज कॉलेज ‘ मधून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आणि त्यामध्ये त्या पहिल्या आल्या. त्या शिवणकामात आणि मोडी लिपीमध्ये अव्वल झाल्या. १९२९ मध्ये प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या चांदवडच्या शाळेत मुख्याध्यापिका म्ह्णून नोकरी करू लागल्या. पुढे १९३३ मध्ये त्या हुजुरपागेमधील शाळेत शिकवायला गेल्या तेथे त्यांनी तेरा वर्षे शिकवले. हुजुरपागेत त्यांच्या विद्यार्थिनी होत्या शिरीष पै, डॉ. तारा बनारसे, सिंधू परांजपे, डॉ. सुशीला आगा, मृणालिनी देसाई आणि अन्य विद्यार्थिनींबद्दल त्यांना खूप अभिमान होता.
अनुताई ह्या स्वातंत्र्यानंतर ‘ सुराज्य ‘ निर्माण करण्याच्या ध्येयामुळे प्रेरित होऊन त्यांनी हुजूरपागा शाळेमधील नोकरी सोडली आणि कस्तुरबा ट्रस्टच्या आयोजित केलेल्या मुंबईमधील शिक्षक शिबीरात गेल्या तेथे त्यांची ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. अनुताई म्हणतात ताराबाईबद्दल म्हणतात त्या नसत्या तर त्यांचे आयुष्य आज आहे त्यापेक्षा वेगळे झाले असते म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. १९४५ मध्ये ताराबाई यांनी अनुताई यांना ‘ आघाडीचा सैनिक ‘ म्ह्णून बोर्डी येथे पाठवले आणि तेथेच अनुताई वाघ यांना ‘ आयुष्याचा सूर ‘ सापडला असेच म्हणावे लागेल. खेडेगावातील बालवाड्या शास्त्रीय रितीने पण कमी खर्चात कशा चालवाव्यात हा प्रयोग करायचा होता. १९४५ पासून बोर्डीला १२ वर्षे आणि १९५७ पासून आदिवासी वस्तीमधील कोसबाड या भागात ताराबाई आणि अनुताई या दोघीनी भारतातील ग्रामीण बालशिक्षणाच्या इतिहासात कुणी कधी केले नाही असे प्रयोग त्यांनी केले. ताराबाईंच्या मार्गदर्शनाखाली अनुताईंनी मुंबईजवळ कोसबाड येथील आदिवासी वस्तीत पहिल्या बालवाडीची सुरूवात केली. त्याच ठिकाणी आता बालवाड्या, पाळणाघर, प्राथमिक व माध्यमिक शाळा, बालसेविका वर्ग, किसान शाळा, रात्र शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग इत्यादि गोषवारा उभा आहे.
स्वाभिमानी, कष्टाळू, प्रामाणिक असणारा बरेच दिवस डोंगराळ भागात राहिल्याने शहरी सुधारणांपासून वंचित असलेला, शहरी संस्कृतीला काहीसा घाबरलेला, व्यसनी असलेला आदिवासी सुधारणे हे काही सोप काम नव्हते. पण अनुताईंनी ते मोठ्या जिद्दीने,चिकाटीने केले. आणि त्यांच्या अथक परिश्रमाने कोसबाड भागातील आदिवासी पुरता बदलून गेला. अनुताईंनी तेथे एक नविन सृष्टी निर्माण केली. अनुताईंचं कार्य फक्त शिक्षण विषयाशीच निगडीत नव्हतं. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाळणाघरं काढली. दारुबंदी, विधवाविवाह अशा अनेक सामाजिक प्रश्र्नांबद्दल जवळच्या पाड्यांवर जाऊन तेथील लोकांचं प्रबोधन केलं. आदिवासी जोडप्यांची सामुदायिक लग्ने लावून दिली. केवळ कोसबाडच्या आदिवासी भागात काम करणं त्यांना मान्य नव्हतं. म्हणून डहाणूला एक मूक-बधीर विद्यालय सुरू केलं. तिथे गरीब मुलांची राहण्याची, जेवणाची सोय केली, स्वावलंबी व्हावे म्हणून उद्योगाचे शिक्षण दिले. कोसबाडला शिक्षक महाविद्यालय, प्राथमिक शाळा, छापखाना, उद्योगवर्ग सुरू करण्यासाठी अनुताईंनी अथक परिश्रम घेतले. शिक्षणपत्रिका व सावित्री ही मासिके, तसेच बालवाडी कशी चालवावी, विकासाच्या मार्गावर, कुरणशाळा, सहज शिक्षण ही पुस्तके यांच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या शैक्षणिक विचारांचा प्रसार केला. कोसबाडच्या टेकडीवरून हे त्यांचे आत्मवृत्त प्रसिद्ध आहे.
या भागातल खर शिक्षण म्हणजे मुलांना माणसात आणणे. ते काम अनुताईंनी अगदी नाक न मुरडता हौसेने केले. त्यांना स्वतःला मूल नव्हतेच पण या आदिवासी मुलांच्या त्या आई बनल्या. केवळ अक्षर ओळख न शिकवता त्यांना न्हाऊ माखू घालणे,त्यांच्या डोक्यातील उवा काढणे, त्यांच्या खरजेला औषध लावणे,त्यांना संडास मुतार्यांचा वापर कसा करायचा ते दाखवणे, इत्यादि अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्यासाठी केल्या बालशिक्षणाचा संदेश ज्या ज्या मार्गानने पोहचवता येईल तो तो मार्ग त्यांनी अवलंबिला. विशेष म्हणजे हे सारे शिक्षण देत असताना त्यांनी एकही शहरी वस्तू वापरली नाही. तेथील परिस्थितीत जे जे मिळेल त्याचा उपयोग त्यांनी शिक्षणासाठी केला. भिंती म्हणजे फळा, कोळसा म्हणजे खडू. तेथे मिळणारे शंखशिंपले,पानेफुले, यांच्या सहाय्याने हसतखेळत गाणी, गोष्टी, सहली यातून शिक्षण देण्याची अभिनव पद्धत त्यांनी सुरू केली. अशा रितीने स्वतंत्र बुद्धिमत्ता, समर्पित वृत्ती, स्त्रीचा भावूकपणा, पुरूषाचा कणखरपणा,अशा विविध स्वभाव पैलूंच्या सहाय्याने अनुताईंनी निराकार अशा आदिवासी समाजाला आकार देण्याचे मौलिक कार्य केले. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर कोसबाडच्या टेकडीवरून, कुरणशाळा, टिल्लूची करामत, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले. अनुताई ७० व्या वर्षीही त्या तरुणाईच्या उमेदीने काम करत होत्या. या वयात त्यांनी दुर्गम आदिवासी भागात काम करण्याची जबाबदारी अंगावर घेतली आणि ग्राममंगल चे रोपटे लावले. दुर्गम भागात शिक्षणाचे आणि सांस्कृतिक विकासाचे काम अंगावर घेतले आणि सहज शिक्षणाचा एक नवाच प्रयोग केला. अनुताई स्वत: प्रसिद्धीपराङमुख असल्या, तरी त्यांच्या कार्याची कीर्ती सर्वदूर गेली.
अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या. पद्मश्री, महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र पदवी, तसेच आंतरराष्ट्रीय बालकल्याण पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ती अशा अनुताई वाघ यांचे १७ सप्टेंबर १९९२ रोजी कोसबाड येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply