कोणतेही सोडायुक्त सॉफ्ट ड्रिंक फसफसते, ते का? कार्बन डाय ऑक्साइड वायू पाण्यात विरघळतो, तेव्हा त्या द्रावणाला कार्बोनिक आम्ल म्हणतात. खरं तर अशा द्रावणात कार्बोनिक आम्ल थोड्याच प्रमाणात असते. आपल्या उच्छ्वासावाटे कार्बन डाय ऑक्साइड वायू शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेतही कार्बोनिक आम्ल तयार होते. अंतराळात घन स्वरूपातील पाणी आणि कार्बन डाय ऑक्साइड यांच्यावर वैश्विक आणि अतिनील किरणांच्या प्रभावामुळे कार्बोनिक आम्ल तयार होऊ शकते, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. पावसाच्या पाण्यात वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड वायू विरघळून हे आम्ल तयार होते. यामुळे पावसाच्या पाण्याची एक विशिष्ट आम्लता असते. आम्लपर्जन्याशी त्याचा संबंध नसतो. पाण्याचे तापमान गोठणबिंदूच्या जवळपास असते, तेव्हा त्यात जास्तीत जास्त कार्बन डाय ऑक्साइड वायू विरघळू शकतो. जास्त दाबाखाली यापेक्षा जास्त वायू विरघळतो. सोडायुक्त सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीमध्ये अशा पद्धतीने जास्तीत जास्त कार्बन डाय ऑक्साईड वायू सॉफ्ट ड्रिंकमध्ये विरघळलेला असतो. यातील बराचसा वायू कार्बोनिक आम्लाच्या स्वरूपात बंदिस्त झालेला असतो. जेव्हा तापमान वाढते आणि दाब कमी होतो. तेव्हा साहजिकच कार्बोनिक आम्लामधून त्वरेने कार्बन डाय ऑक्साइड वायुमुक्त होतो. सॉफ्ट ड्रिंकच्या बाटलीचे झाकण उघडल्यावर नेमके हेच घडते. या मुक्त झालेल्या कार्बन डाय ऑक्साइड वायूमुळे आतील द्रावणात वायूचे प्रमाण वाढते आणि त्याचे बुडबुडे तयार होतात. वायू वेगाने बुडबुडाच्या रूपात वर येत असल्याने द्रावण फसफसते.
बेकिंग सोड्यामध्ये अॅसेटिक आम्ला मिसळल्यावर कार्बोनिक आम्ल तयार होते व कार्बन वेगाने त्यातून ऑक्साइड वायू फसफसत बाहेर पडतो. वातावरणात कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढते, तेव्हा त्यातील काही वायू समुद्राच्या पाण्यात विरघळतो. यामुळे समुद्राच्या पाण्यात कार्बोनिक आम्लाचे प्रमाण वाढते आणि पाण्याची आम्लता वाढते. असे पाणी समुद्रातील जीवांना अपायकारक ठरते. साहजिकच सागरी पर्यावरणास धोका पोहोचतो.
आपल्या शरीरातील रक्ताची विशिष्ट आम्लता कमी-जास्त झाल्यास शरीराचे कार्य के बिघडते, परंतु रक्तातील कार्बोनिक आम्ल रक्ताची आम्लता नियमित पातळीवर ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
सुशील चव्हाण (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply