भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. त्यांच्यासाठी मी अनेक कार्यक्रम केले होते. एक दिवस प्रकाशमामा धामणकरांचा फोन आला. त्यांचे वडील भिवंडीचे माजी खासदार कै. भाऊसाहेब धामणकर याच्या पुतळ्याचे अनावरण करायचे होते. त्यासाठी एका समारंभाचे आयोजन ते करीत होते. माननीय नेते शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होणार होते. अनेक मंत्र्यांची उपस्थितीदेखील असणार होती. या समारंभाच्या सुरवातीला माझे गाणे व्हावे अशी प्रकाशमामांची इच्छा होती. मला ते धामणकर कुटुंबातीलच एक मानत असल्याने हे मानाचे काम त्यांनी दिले होते. गाण्यामुळे अशा किती जणांनी माझ्यावर अलोट प्रेम केले म्हणून सांगू? मला सख्खा भाऊ किंवा बहीण नाही. पण गाण्याने माझा परिवार आधी काही हजारांचा झाला आणि आता तर लाखोंचा झाला आहे. कार्यक्रमासाठी विमानातून जाताना काही लोक ओळखतात. जवळ येतात आणि ‘आपकी गज़ले हम हमेशा सुनते है,’ असे सांगतात तेव्हा मन समाधानाने भरून येते. असेच समाधान धामणकरांच्या समारंभाने लाभले. कार्यक्रम अत्यंत हृद्य असा झाला. पवारसाहेबांचे भाषण देखील परिणामकारक झाले.
श्री. राजन बांदलकर यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीजसाठी गझलचा कार्यक्रम आयोजित केला. माझा कॉलेजपासूनचा मित्र आणि आत्ताचे प्रभावी नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्याच्या पाचपाखाडी विभागात मोठ्या प्रमाणात नरवीर तानाजी गणेशोत्सव सुरू केला. या उत्सवात सलग दोन दिवस मी ‘गझलसंध्या’ आणि दुसऱ्या दिवशी ‘भजनसंध्या’ असे दोन कार्यक्रम सादर केले. पुढील पाच वर्षांसाठी जितेंद्र आव्हाडांनी सगळ्या संगीताच्या कार्यक्रमांचे आयोजनच माझ्याकडे सोपवले आणि दरवर्षी एकतरी माझा कार्यक्रम करण्याची अट घातली. आमच्या स्वर-मंच ॲकॅडमीचे अनेक विद्यार्थी आता छान गाऊ लागले होते. त्यांना मंच प्राप्त करून देणे ही मी स्वर-मंच ॲकॅडमीचीच जबाबदारी मानली आणि सलग दोन दिवस हितवर्धिनी सभागृहात कार्यक्रम आयोजित केले. पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते संगीतकार विश्वास पाटणकर, तर दुसऱ्या दिवशीच्या प्रमुख पाहुण्या होत्या गायिका रंजना जोगळेकर.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply