एकुणातच साहित्यिक,सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे आजकाल जिकिरीचे झालंय. त्यातून फारसे काही हाती लागत नाही,हेही एक प्रमुख कारण असावे. पण काही योग कोणीतरी आपल्या वाटेवर आणून ठेवले असतात आणि आपण ते जगायचे असतात.
२३ जुलै च्या सायंकाळी श्री नीतिन वैद्य यांच्या “जवळीकीची सरोवरे” (प्रज्ञावंत सखेसांगाती) या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आले. सांस्कृतिक सोलापूरची अलीकडची झलक मित्र विवेक नगरकर बरोबर २०२० साली आमचा हदे-७५ चा स्नेहमेळावा संपल्यावर हि.ने. मध्ये अनुभवली होती- वडीलधारे श्री शशिकांत लावणीस यांच्या सत्कारानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ! लावणीस सर सोलापुरातील “नाट्य”व्यवहाराचे आणि इतरही साहित्य उपक्रमांचे सक्रीय शिलेदार आहेत.
त्र्यं . वि . सरदेशमुख सरांच्या अपरिचित गुहेत शिरायचे तर हातात ज्ञानाचे दिवे घेऊन ठाकलेल्या सुधीर रसाळ, अभिराम भडकमकर, रणधीर शिंदे या वाटाड्यांचा हात धरावा लागणार हे निश्चित ! या वाटेवर थोडे आधी मार्गस्थ झालेले श्री नीतिन वैद्य त्यामानाने फेबु वर कधीकधी वाचनात यायचे. पण ते दिसणं अधिक असंतोष निर्माण करायचे.
त्या सायंकाळी अचानक प्रा. अविनाश सप्रे सर ऐकू आले. आजच्या भाषेत सांगायचं झाले तर वालचंदच्या दिवसांमध्ये ज्या पाच सांगलीकर शिक्षकांना आम्ही “फॉलो ” करीत असू ( प्राचार्य म.द. हातकणंगलेकर, प्रा दिलीप परदेशी, डॉ तारा भवाळकर, प्रा वैजनाथ महाजन आणि प्रा. अविनाश सप्रे) त्यापैकी सप्रे सर खूप वर्षांनी दिसले- तोच आब राखलेले ! (त्यांचे नांव निमंत्रण पत्रिकेवर नव्हते), पण पुस्तकाला प्रस्तावना लिहून सरांनी पुस्तकाचा मार्ग अधिक प्रशस्त केलाय.
सरदेशमुख सरांबद्दल फारसे माझ्या कानी आले नव्हते -माझ्या सोलापूरच्या वास्तव्यात (१९७५-१९७७). पण त्यांच्या कार्याचा परिचय श्री वैद्य यांनी सखोलपणे आणि मनोज्ञ करून दिलाय. वैद्यांचे लेखन जसे “युनिक “असते, तसेच “युनिक” मनोगत त्यांनी ऐकवले. त्यांना “एकलव्य “म्हणवत नाही, पण अलीकडच्या काळातील तपः साधनेचे ते एक उदाहरण आहेत. काही व्यक्तींशी ओळख असणं हे आपलं पूर्वकर्मातील संचित असतं. लेखनाचा विषय असलेले आदरार्थी व्यक्तित्व, त्यांचे अप्रकाशित लेखन आणि त्यांवर केलेल्या नोंदी हे सारे विलक्षण देखणे प्रयत्न आहेत.
अभिराम भडकमकरांनी त्यादिवशी सेहवाग च्या बॅटीचा आनंद दिला. तीन समीक्षक (रसाळ, सप्रे आणि शिंदे) यांच्या तोडीला एक नाटककर -लेखक-आस्वादक म्हणून ते शोभून दिसले आणि त्यांच्या वक्तृत्वाचा आनंद मनःपूत लुटता आला. रसाळ सर तसे सरदेशमुखांचे समकालीन ( किंचित वयामुळे आणि बाकीचे साहित्यिक कर्तृत्वामुळे) त्यांनी समारंभात पितामह भीष्मांची भूमिका समर्थ पार पाडली. सर शांत,संयत बोलले. विशेषतः भडकमकरांच्या भाषणानंतर अध्यक्ष काय बोलताहेत याची मला उत्सुकता होती. पण त्यांनी सरदेशमुखांच्या समीक्षेचे नवे पैलू उजेडात आणले.
सर्व वक्त्यांनी कॅलिडोस्कोपचे काम करीत वेगवेगळ्या अंगांनी भाष्य केले आणि वाचक म्हणून आमचे काम सुकर केले. आता “सरोवरे” च्या प्रवाहात उतरायचे धाडस होईल. सप्रे सरांनी सहज हाताला खाली लागतील अशा फुलांची ओंजळ भरून दिली आणि वैद्यांनी कठीण/उंचावरच्या फुलांनाही फांदयांसकट सुपूर्द केले आहे. गेल्या चार दिवसात फक्त प्रस्तावना वाचून झालीय. आता सलग पुस्तक वाचावे म्हणतोय.
नेहेमीचे यशवंत, मित्रवर्य शिरीष घाटे येथेही आहेत – त्यांच्या आगामी “चित्रवाटांमध्ये” ते “सरोवरे” च्या नेत्रसुखद मुखपृष्ठाबद्दल भाष्य करतीलच.
नीतिन वैद्यांनी,आपली कन्या -मानसीच्या हाती “बॅटन “दिलंय, हे तिच्या आभारप्रदर्शनानंतर जाणवलं.
आता वैद्यांनी ” नंदा खरे ” यांच्याबद्दल नोंदीवजा दस्तऐवज प्रकाशात आणावा ही अपेक्षाय.
अवघ्या ४१ तासांचे, यावेळचे माझे हे सोलापूर वास्तव्य खूप काही देऊन गेले- अगदी चार सलग दिवसांच्या फेबु पोस्टसहित!
अजून काय मागावे?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply