नुकतेच बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. उत्तम मार्क घेऊन यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. ज्यांना कमी मार्क पडले आहेत त्यांनी देखील अगदीच निराश होण्याचे काही कारण नाही कारण ही जीवनातील अंतिम परीक्षा न्हवे. बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने आज काही विचार मांडण्याची इच्छा व्यक्त होत आहे. बारावी म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे वळण ज्याला आपण टर्निंग पॉईंट म्हणू शकतो. आयुष्यातील महत्वाचे वळण यासाठी आहे कारण आपली शिक्षण पद्धती १०+२+पदवी या पद्धतीने आखल्या गेली आहे. पुढे कोणत्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा याचा निर्णय बारावीच्या मार्क वरूनच होतो. काही पदवी अभ्यासक्रमासाठी सामायिक परीक्षा अनिवार्य असल्या तरी बारावीचे मार्क देखील गृहीत धरल्या जातात. त्यामुळेच शैक्षणिक आयुष्यात बारावीची परीक्षा हा सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट मानला गेला आहे.
पण नेमके याच वर्षी आयुष्य अजून एक महत्वाचे वळण घेत असते. बारावीचे प्रवेश हे साधारणतः वयाच्या सोळाव्या किंवा सतराव्या वर्षी होतात. आणि सोळावे वर्ष हे असे वर्षे असते जिथे विद्यार्थ्यांच्या मन आणि शरीरात अमुलाग्र बदल होत असतात. सोळावे वर्ष हे आपण तारुण्याच्या पदार्पनाचे वर्ष मानतोत. शाळेच्या कडक शिस्ती मधून विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या मुक्त जीवनामध्ये प्रवेश केलेला असतो. जिथे बारावीला उत्तम मार्क घेऊन पुढील आयुष्याच्या दिशा ठरवायच्या असतात त्याच क्षणी या वयात विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी भुरळ घालण्याचा प्रयत्न करत असतात. तारुण्य सुलभ भावना, कॉलेजचा कट्टा, मित्रांची मैफिल, बाईक शिकण्याची आणि भरधाव पळवण्याची इच्छा, धुम्रपानास निमंत्रण, लैंगिक आकर्षण अशा अनेक गोष्टींकडे विद्यार्थी अभ्यासासोबत आकर्षित होण्याची शक्यता त्या वयात नाकारता येत नाही. आणि ते असे वय असते जिथे या सर्व गोष्टींचे भविष्याच्या दृष्टीने होणारे परिणाम त्या वयात लगेच लक्षात येत नाहीत. बिघडण्याचे पण एक वय असते असे म्हणतात ते हेच वय.
शालेय जीवनात बहुतांश विद्यार्थ्यांवर शिक्षकांचे वैयक्तिक देखील लक्ष असते पण कॉलेज जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांवर असे लक्ष ठेवणे शक्य होईलच असे नाही. तसेच कॉलेज जीवनात वयाच्या सोळाव्या – सतराव्या वर्षी शाळेसारखी शिस्त विद्यार्थ्यांवर लादणे योग्य मानल्या जात नाही. शाळा आणि कॉलेज जीवनातील वातावरणाचा हा फरक अनेक विद्यार्थ्यांच्या मनात एक द्वंद्व युद्ध निर्माण करते. हे युद्ध असते अभ्यासाचे आणि त्या तरुण वयाला आकर्षित करणाऱ्या गोष्टींना स्पर्श करण्याचे. त्या वयात आणि मुक्त वातावरणात जर चुकीची संगत लाभली तर अनेक विद्यार्थी आपली अभ्यासाची दिशा हरवून बसतात आणि बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात स्वतःचे नुकसान करून घेतात. दहावीपर्यंत सतत उत्तम मार्क घेणार्या विद्यार्थ्यांला जेव्हा बारावीला अचानक कमी मार्क पडतात तेव्हा बरेच वेळेस वर नमूद केलेले अदृश्य घटक त्यास कमी मार्कासाठी कारणीभूत ठरलेले असू शकतात. विद्यार्थी जाणून-बुजून अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात किंवा ठरवून चुका करतात असे नाही पण ते सोळा वर्षांचे वय कळत नकळत विद्यार्थ्यांना चुका करायला भाग पाडते.
मग बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात विद्यार्थी अभ्यासाची दिशा हरवू नये म्हणून पर्याय काय? शाळेसारखा छडीचा बडगा उगारून विद्यार्थ्यांना कडक बंधनात ठेवावे का तर अजिबात नाही. त्या वयाला बंधने मान्य नसतात. त्या वयात मित्र आणि मित्रत्वाची भावना हेच कळत नकळत एकमेकांचे मार्गदर्शक गुरु असतात. त्या वयात इतर कोणा पेक्षाही मित्रच सर्वात जवळचे वाटत असतात. त्यामुळे बारावी सारख्या महत्त्वाच्या वर्षात अभ्यासाचे महत्त्व समजून सांगणारी व्यक्ती एक तर समवयीन असावी लागते किंवा त्याच्या वयाला आणि तरुण मनाला पटेल अशा मित्रत्वाच्या भावनेने त्याच्या समोर उभी राहणारी असावी लागते. बारावी आणि सोळाव्या वर्षात एकसाथ होणारे प्रदार्पन हे एक असे दिव्य आहे जे आयुष्यात योग्य पद्धतीने हाताळले की मग सहसा मागे वळून बघण्याची गरज पडत नाही. आणि हे दिव्य योग्य पद्धतीने हाताळले जावे याची जिम्मेदारी जेवढी त्या विद्यार्थ्यावर आहे त्या पेक्षा जास्त जिम्मेदारी त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात त्या वेळी नियमित वावर असणाऱ्या सदस्यांवर देखील आहे.
लेखक : राहुल बोर्डे
ई-मेल : rahulgb009@gmail.com
Leave a Reply