नवीन लेखन...

सोल्वांग

एका शनिवारी आम्ही सोल्वांगला जायला निघालो. लॉस एंजलीसपासून उत्तरेला दीड-दोन तासांच्या अंतरावर समुद्रकिनारी सांता बार्बाराजवळ हे शहर आहे. आमचा रस्ता समुद्राला समांतर जाणारा. त्यामुळे समुद्राला आलेली भरती, फेसाळणाऱ्या लाटा, दूरवरच्या मोठमोठ्या आणि लहान लहान आगबोटी, वेडीवाकडे किनारे आणि पांढरीशुभ्र वाळू. रस्त्याच्या दुतर्फा रेडवूडसारखी उंच असणारी झाडे. सारेच विलोभनीय.

सोल्वांग जवळ येत चालले तसे लांबूनच भरतीच्यावेळी समुद्रात खोलवर आत घुसलेली जेटी दिसू लागली. काही मिनिटांपूर्वी दूरवर दिसलेल्या बोटी पाणी कापत जवळजवळ येताना मोठ्या होताना दिसू लागल्या. आम्ही जेटीवरच असलेल्या पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क केली. तेव्हा दुपारचे साडेबारा वाजले होते. भूकही खूप लागली होती. आम्ही जेटींवरील एका कॅफेटेरियात शिरलो. तिथे माशांचे – त्यातही चिंबो-यांपासून (crab) तयार केलेले- पदार्थ मिळत होते. त्यात माकलांचे तुकडेही होते. potato smash बरोबर ते अत्यंत रुचकर वाटत होते. सोबत कोक होताच. भरपेट जेवण घेतल्यानंतर आम्ही शहरात शिरलो. सोल्वांग हे डॅनीश जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे.

याचा अर्थ असा की, सुमारे तीनशे वर्षांपूर्वी इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मन, चायना या देशांमधून व्यापारी आणि पाद्रीमंडळी इकडे आली आणि त्यांनी आपल्या वसाहती वसवल्या. ज्या भागात ज्या देशातील लोकांचे वर्चस्व राहिले तिथे त्यांची संस्कृती, धर्मकल्पना, इतिहास, लोकाचार आणि भाषा यांना प्रधान्य मिळाले. म्हणूनच तिथल्या चर्च, इमारती यांच्या रचनांवर, आतल्या मांडणीवर त्यांची वैशिष्ट्यपूर्ण छाप दिसते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळेपण जाणवते. म्हणूनच सोल्वांग परिसरावर झेक संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.

इथे डॅनीश पद्धतीची शैली डोळ्यांत भरते. झेक इतिहास, कला, संस्कृती यांचे दर्शन घडवणारे म्युझियम्स आढळतात. इथले mission Santa Ine’s church हे अठराव्या शतकातील फ्रेंच चर्च प्रसिद्ध आहे, National Falls भागातला धबधबा पाहाण्यासारखा आहे. केवळ शहामृगांचे म्यूझियमही लक्षवेधक आहे. हँक्स ख्रिश्चन अंडरसन या त्यांच्या कवीच्या नावाने असलेला पार्कही प्रसिद्ध आहे. शिवाय सोल्वांग विडमीलही पाहाण्यासारखी आहे.

सोल्वांग हे गव्हाच्या पदार्थांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तिथल्या बेकरीजमधून केक आणि त्यासारखे अनेक पदार्थ विक्रीस असतात. इथल्या रेस्टराँमधून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. कॅलिफोर्नियाच्या याही भागात द्राक्षाचे मळे आहेत. स्वाभाविकच इथे wineries आहेत.

या शहरात जगभरातील मोटारसायकलींचे म्युझियम असून तिथे अमेरिका, जपान आणि युरोपमधील देशात तयार होणाऱ्या मोटरसायकली एकाच ठिकाणी पाहायला मिळतात.

शहराच्या फूटपाथनजीक मोकळ्या जागांवर बाके-टेबले होती आणि त्या उघड्या भागात बसून अनेक स्त्री–पुरुष कॉफी, ड्रिंक्स, स्नॅक्स घेऊन आरामात स्वाद घेत होते.

शहरदर्शनासाठी खास बससेवा होती. ती आम्ही घेतली. त्यामुळे काही प्रमाणात शहराची कल्पना येऊ शकली. इथल्या शोरूम्समधून त्यांच्या पद्धतीचे मोठमोठे फर्निचर विक्रीसाठी मांडलेले दिसत होते.

आम्ही पुन्हा जेटीवरील पार्किंग एरियात आलो आणि आम्हांला आश्चर्याचा धक्का बसला. सकाळपासून उधाणलेला समुद्र आम्ही पाहिला होता आणि आता तर ओहटी लागल्याने तो पार आत गेलेला होता. ते दृश्य काहीसे उदासवाणे होते.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..