(महादेवाच्या गाभाऱ्यातील खुलभर दुधाची कहाणी )
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं?
अशी त्याला चिंता पडली. प्रधानाने युक्ती सांगितली, दवंडी पिटली, “गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दुध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पुजेला यावं” सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही. मुलांना दिलं नाही. सगळं दूध देवळांत नेलं. गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही.
एक म्हातारी बाई तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. चार तांदुळाचे दाणे घेतले. दोन बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं; तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते.” असे म्हणून राहिलेले दूध गाभाऱ्यात टाकलं, ही म्हातारी पुन्हा परत निघाली तोच चमत्कार झाला. म्हातारी परतताच गाभारा भरला. हे गुरवाने (पुजारी) पाहिलं. राजाला कळवलं. पण गाभारा कसा भरला त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं देवळात शिपाई बसवला तरीही शोध लागला नाही. पुढे तिसऱ्या सोमवारी राजाच देवळात बसला. म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरू लागली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले. मोठ्या माणसांचे हालहाल झाले, ते देवाला आवडले नाही. म्हणून गाभारा भरला नाही.” याला युक्ती काय करावी? ‘मुल वासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे देवाचा गाभारा भरेल. देव संतुष्ट होईल’ त्याने म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटवली.
चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहताच देवाचा गाभारा भरून आला. राजाला आनंद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकीसुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण.
(पाऊस पडला नाही तर महादेवाचा गाभारा दुधाने भरावा, अशीही एक समजूत आहे. मुलाबाळांना दूध देऊन शिल्लक राहिलेलं दूध गाभाऱ्यात नेऊन टाकल्यावर गाभारा भरतो. वासरांचं, मुलांचं दूध तोडून गाभारा भरणं योग्य नाही, असंही काही लोककथांतून गोष्टीतून सूचित केलं गेलं आहे)
Leave a Reply