नवीन लेखन...

पुत्र कुपुत्र होईल पण माता कुमाता होणार नाही

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सौ आनंदीबेन पटेल यांच्या `ए मने हमेशा याद रहशे’ या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद (‘हे माझ्या सदैव लक्षात राहील’) केला आहे  सौ. वैजयंती गुप्ते यांनी.   या आगामी पुस्तकातील एक कथा.


आजकालची सामाजिक परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. वृद्धापकाळी आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्या मुलांना व्यवसायानिमित्त त्यांच्या पासून दूर राहण्याची गरज पडते. वृद्ध आईवडिलांची खरोखरीच मुलांनी काळजी घेतली तर “वृद्धाश्रम” चालवण्याची गरजच भासणार नाही. पण अशी मुले किती? स्वतःची मुले घरापासून दूर राहत असली की आईवडील त्यांची काळजी करत असतात, “काय करत असेल माझे मूल? अनोळखी गावी कुठे राहत असेल?” अशी चिंता आईवडील करतच असतात. परंतु मुले स्वतःच्या आईवडिलांची काळजी करतात का? संत पुनित महाराजांनी तर असे म्हटले आहे की, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना विसरू नका”.

शिक्षण मंत्री असतानाच्या माझ्या दहा वर्षाच्या कालावधीत मी अनेक वेगळे-वेगळे प्रसंग, घटना अनुभव, आशा-निराशा, सुख-दुःख अशा तऱ्हेतऱ्हेच्या मनोभावना अनुभवल्या आहेत. ह्या अनुभवांमधील हि एक अतिशय दुःखदायक घटना आहे जी मला सहजासहजी विसरणे शक्य नाही.

ही घटना उंझा तालुक्यातील “शिही” गावची आहे. ह्या गावामधील साधारणपणे सत्तरीचे असे एक वयोवृद्ध गृहस्थ काठीचा आधार घेत-घेत माझ्या ऑफिसमध्ये आले. मी थोडीशी आश्चर्यचकित झाले. ह्या गृहस्थांना इथे सरकारी ऑफिसमध्ये माझी काय गरज पडली असेल?

मी विचारले, “ काका कुठून आलात? काय काम घेऊन आलात?”

“ताई, आम्ही दोघे पती-पत्नी ह्या गावात राहतो. वय झाल्यामुळे थकून गेलो आहोत. शरीरिक कष्ट आता होत नाहीत. गावात आमची विचारपूस करणारे कोणी नाही. एक मुलगा आहे. पण मुलाला आणि सुनेला दोघांनाही थेट कच्छमध्ये नोकरी मिळाली आहे बघा ताई! तुम्ही त्यांची गावात बदली केली तर ते आमचा सांभाळ करतील.”

वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी मुलगा आणि सुनेची गावात बदली करायची होती, माझ्या मनाला रुचेल असे काम असताना देखील नकळत मी बोलून गेले,

“काका, तुम्हाला विश्वास आहे, की इथे आल्यावर ते दोघे तुमची सेवा करतील, तुमची काळजी घेतील?”

“हो ताई, माझा माझ्या मुलावर आणि सुनेवर पूर्ण विश्वास आहे. दिवसा तर ते शाळेत जातील आणि इतर वेळेस ते आमची काळजी घेतील.”

मी त्या वृद्ध गृहस्थांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलाची आणि सुनेची गावामध्ये बदली करून दिली. तीन एक महिन्यांनंतर हे गृहस्थ काठीच्या आधाराने पुन: माझ्या ऑफिसमध्ये हजर झाले. मी विचार केला बहुतेक माझे आभार मानायला ते आले असतील.

“या काका, कसे येणे केलेत? मुलगा आणि सून नीट सांभाळ करतात नां?” मी विचारले.

काही क्षण ते माझ्याकडे बघतच राहिले आणि स्वतःला सावरत-सावरत हलक्या आवाजात म्हणाले,

“ताई तुमचे म्हणणे अगदी खरे झाले, तुमची शंका खरी ठरली. ते दोघेजण पंधरा दिवस आमच्याजवळ राहिले आणि नंतर त्यांनी गावात दुसरे घर भाड्याने घेतले आणि निघून गेले, कुठली आई आणि कुठला बाप? आमची स्थिती तर जशी पहिली होती तशीच राहिली. शिवाय लोकांचे रोज टक्के-टोणपे ऐकण्याचा मानसिक त्रास वाढलाय. माझा तर विश्वासच उडून गेला आहे. मी तुम्हाला फक्त एवढेच सांगायला आलो आहे की तुमचे म्हणणे खरे ठरले आणि मी खोटा ठरलो.

त्यांच्या प्रत्येक शब्दाने हृदय व्याकूळ झाले होते. समाजातील अशा प्रसंगाने मनाला घोर वेदना होत असतात. मला अतिशय चीड आली होती. तरीही त्यांच्या त्या अंतर्गत कौटुंबिक वाद-विवादाला मध्ये न आणता मी म्हणाले, “तुमची इच्छा असेल तर मी त्यांना परत कच्छमध्ये पाठवते”.

माझ्या ह्या बोलण्याचा उद्देश फक्त त्यांच्या मनातील हेतू जाणून घेण्याचाच होता.

“नाही ताई, असे नका करू. ते त्यांचे सुखी राहोत. आम्ही आमचे आयुष्य कसेही जगू.” असे म्हणत माझ्याकडून कसलीही अपेक्षा न करता ते वृद्ध गृहस्थ माझ्या ऑफिस मधून निघून गेले.

आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, “कुपुत्रो जायते, क्वचिदपि कुमाता न भवति |” मुलाने आईवडीलांबरोबर कितीही वाईट वर्तन केले तरी ते आईवडील त्यांच्याबद्दल वाईट इच्छा करू शकत नाहीत.

स्वतःच्या मुलाबद्दलचे त्यांचे प्रेम मुलाच्या अशा वागण्यानंतर देखील त्यांच्या हृदयात तेवढेच अतूट आणि जिवंत होते. आईवडील आयुष्यभर कष्ट करून ज्या मुलांचे सुख प्रथम पाहतात, त्याच मुलांनी वृद्धापकाळी त्यांना सुख, शांती, आधार देण्याऐवजी जर सतत दुःख पोहचवले तर वृद्धापकाळी त्यांच्या मनाला किती यातना होत असतील? आपला समंजस व सभ्य समजला जाणारा समाज अशा रोज रोज घडणाऱ्या वाढत्या घटनांबद्दल किती जागृत आहे?

माझे उत्तर “नाही” असे आहे.

“वृद्धाश्रम” हा तर पाश्चिमात्य देशांमधून आलेला एक विकल्प आहे.

खरेतर, “बाकी सगळे विसरा, पण आईवडिलांना कधी विसरू नका.”, अशी शिकवण देणारी आपली संस्कृती आहे.

— सौ आनंदीबेन पटेल
माजी मुख्यमंत्री, गुजरात

— अनुवाद  – सौ. वैजयंती गुप्ते , गांधीनगर, गुजरात

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..