माउलींची अद्भूत शब्दकळा, उपमा लालित्य, यांमधील एक अकृत्रिम सहजता आणि त्यातून अखंड रुणझुणारी प्रासादिकता याबद्दल किती जणांनी लिहिलेलं आहे! कितीतरी तर्हांनी, दृष्टींनी आणि निरनिराळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. हौसेने, आस्थेने, अभ्यासाने, चिकित्सेने आणि आशीर्वादानेही उदंड लिहिलेलं आहे. सात शतकं लिहिलेलं आहे!! कारण माउलींबद्दल लिहिताना कितीही लिहिलं तरी मन थोडीच भरतं? कागद भरेल लगेच, पण मनातलं भारावलेपण, त्याच्या मूळाचा शोध आणि आनंदाच्या सुगंधाची अभिव्यक्ती ही पूर्णपणे थोडीच होते? म्हणूनच माउलींबद्दल लिहिताना लेखणी थकत नाही. लिहिणारा लिहीत जातो यथामती, कदाचित एखाद्या क्षणी अवाकही होऊन जातो. माउलींचं प्रेम मात्र शब्दांच्या समईतील ज्योतीप्रमाणे, चिरंतन आणि आपल्यालाच उजळवून टाकणारं असतं.
आपल्याकडे ‘शाखाचंद्र न्याय’ प्रसिद्ध आहे. शाखा म्हणजे फांदी. लहान मुलाला चंद्र दाखवायचा तो थेट नाही. ‘तो पहा चंद्र!’ असं म्हटलं तर गांगरून नाही का जाणार ते मूल! त्याला आधी दाखवायची ती एखाद्या योग्य वृक्षाची शाखा. फांदी. ती त्याने व्यवस्थित पाहिली, की मग म्हणायचं ‘ही फांदी आहे ना, तिच्या वर पहा.. तो.. हां.. तो चंद्र.’ सोप्यापासून कठिणाकडे सुलभपणे नेणारी ही भारतीय संस्कृती. माउलींच्या बाबतीत विचार करू जाता, मला माउलीचं वाड्मय म्हणजे ती शाखाच वाटते. हिरवीगार, सुशांत, स्थिर आणि सुगंधी अशी शाखा. उन्हाच्या कितीही क्रूर नि अटळ झळा सोसल्या तरी प्रसन्न असणारी, आणि पाहणारा, मग तो कुणीही असो त्याला शीतळताच देणारी शाखा. तो चंद्र, पोर्णिमेचा चंद्र – म्हणजे अर्थातच विठ्ठल! आपापली रात्र मग ती कितीही घनदाट असो, प्रत्येकाची पहाट अजून कितीही दूर असो, प्रत्येकाला आश्वास्त करणारा चंद्र. वाटतं, या चंद्राकडे पहायचं तर आधी शाखा पाहायला हवी. हवीच! तो चंद्र थेट पाहता येतोच. तसं पहायलाही हरकत नाही. कारण तो भिववणारा अथवा आपल्या मोठेपणाने भांबावून टाकणारा नाही. पण हे सुद्धा शाखेनेच तर शिकवलं! म्हणून माउली नावाची ही शाखा महत्त्वाची. गरजेची. शाखा-चंद्र न्यायानुसार, एकदा का चंद्र दिसला, की शाखेचं अन्य प्रयोजन उरत नाही. मग ती सहज दुर्लक्षित झाली तरी कुठलीच आपत्ती नाही. किंबहुना चंद्राकडे लक्ष गेलं की शाखेची जाणीव धूसर होणं आलंच. पण माऊलींच्या बाबतीत मात्र हा न्याय बदलावासा वाटतो. वाटतं, की इथे चंद्र – म्हणजे पांडुरंग आपल्याला दिसला किंवा भेटलाही, तरी शाखा विसरता येत नाहीच. ती सोडणं हे करंटेपणच म्हणावं लागेल. कारण, त्या शाखेतूनच उलगडत जातो चंद्र. खरं सांगायचं तर शाखा विसरून तो चंद्र समजेल सुद्धा. पण तो चंद्र आपल्याही नकळत आपला होऊन जातो हे या शाखेचं, माऊलींचं श्रेय. ‘शब्दब्रह्म कवळले’ याचा कल्पनेच्या पातळीवर तरी निसरडा अनुभव हवा असेल तर या शाखेचे हिरवे ताजे आशयच हवेत. केवळ इथेच न थांबता वाटतं, की चंद्र अर्थात तो अलांछन चंद्र आहे (हे सांगायला सुद्धा माऊलींचीच करंगळी धरावी लागते!) तो चंद्र मुळचा सुंदर आहेच. पण शाखेचं मार्दव साक्षात चंद्राच्या सौंदर्यात भर घालणारं! एकाच वेळी पाहणार्याला आणि चंद्राला सुद्धा आनंद देणारी ही शाखा म्हणजे दोघांमधला अनुपम पूल वाटते. जो चालताना पावलागणिक आर्त होत जाते चंद्राची तहान आणि पुलाची ओढ सुद्धा घनदाट होत जाते. चंद्र गाठावा ही अनिवार ओढ आणि तरीही शाखेचा आस्वाद्य सेतू संपूच नये हा लळा अशी अवस्था होऊन जाते. एखाद्या क्षणी पूल आणि चंद्राचं अद्वैतच कळून यावं चालणार्याला आणि चालणंच विसरून जावं या प्रकाशाच्या उत्सवात..! विठ्ठल नावाचा चंद्र पहायचा असेल तर माउली नावाच्या अखंड कोमल शाखेला पर्याय नाही आणि एकदा तीत डोकावलं की ती सोडणं दुरापास्त होऊन जातं हे आनंदी वास्तव आहे! त्या शाखेच्या पानापानांत चंद्राचे प्रकाश, नव्हे चंद्रच सानंद खेळतो! चंद्र तिथेच तर भेटतो! माऊलींनी आता जर हे वाचलं तर काय म्हणतील माहितीये? म्हणतील, की अहो चंद्राचाच नाही का असाच एक न्याय? तो आठवा. त्यानुसार कुठलीही गोष्ट चंद्राच्या प्रकाशात अधिक सुंदर दिसते. तुम्ही या शाखेची कसली स्तुती करताय? त्यावर ज्या निवृत्तीनाथांनी जाणिवेचं जळ शिंपडलं आणि ज्या विठाई नवाच्या अलांछन चंद्रमा-प्रकाशात ती झळकते आहे त्यांचं कौतुक करा. त्यांचंच करा. माउलीचं हे मनोगत ऐकावं आणि विस्मयो अनुभवून त्या शाखेचा प्राणमोही स्नेह अधिकच जडावा आणि या शालीनतेच्या दर्शनाने आपलं अहंकाराचं जडत्व गळून आपणही अधिक हलकं व्हावं आणि या नव्या निवांतपणाने नव्याने शाखेवर खेळावं बागडावं, बागडतंच राहावं..
हा झाला रात्रसमयीचा विचार. पण दिवसाचा? म्हणा भवरात्र वगैरे म्हणू गेलो तर दिवसाला जागा नाहीच. पण वारकरी तत्त्वज्ञान हे असं निराशावादी किंवा जग असत्य मांनणारं नाही. दिवसाचा उजेडात माऊलींना शोधू गेलो तर अगदी चटकन सापडतं ते सूर्यप्रभावी असं कोमल नि अतिहळुवार कमळ! माऊलींची शब्दकळा त्यांचं सारं वाड्मय म्हणजे कमळ वाटू लागतं. माऊली नावाचं सहस्त्रदल कमळ देखील चिखलातंच तर उगवलं! त्या लहानग्या ओजस्वी बालकांना वाळीत टाकणाऱ्या अंध समाजाला चिखल म्हटलं तर त्यात चूक ती कोणती? पण हे कमळ त्यातही फुललं, बहरलं. त्याचा लोकोत्तर गंध समाजास काळायला उशीर झाला असला तरी तो कळल्यावाचून राहिला नाही. असं होणं शक्यच नव्हतं हेही खरंच. वर विठ्ठलाला जसं पोर्णिमेचा चंद्र म्हणून पाहिलं तसं इथे या कमळाच्या संदर्भात सूर्य म्हणून पहावसं वाटतं. सूर्याच्या प्रकाशाचा अनुभव तसा थेट येईल. येतोच. पण जेव्हा त्याच्या संजीवक उजेडाचं सेवन माऊली नावाच्या कमलदलाच्या पात्रातून केलं जातं, तेव्हा ‘सेवक’ धन्य झाल्यावाचून राहील तरी कसा!? ‘साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ’ अशा या माऊलींच्या अक्षर पाकळ्यांमधून अमृताचंच तर प्राशन होतं! ते करताना, आपापल्या परीने का होईना पण ते अनुभवताना ‘वैखरी कैसेनि सांगे?’ असं वाटणं यात नवल ते काय! विठ्ठल नावाचा सूर्य मूळचा तापहीन आहेच. पण या कमळातून तो अनुभवू जावा तर आणखीनच शीतल होतो. जन्माचं अंतर कापून उराउरी भेटतो. त्या अनादी भास्कराचं प्रतिबिंब म्हणजेच तर हे कमळ आहे! ‘प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट’ याचा इतका लोभस अनुभव अन्य कुठे शोधूनही सापडणार नाही. याही रुपकात असंच वाटतं की अचानक कधीतरी दिसेल साक्षात सूर्यच, या कमळात विराजमान झालेला.. आपण मात्र भ्रमर होऊन चाखत रहावा सूर्य कमळाचं मार्दव मिसळलेला. हे कमळ आणि तो सूर्य सर्वांसाठी एकच असला तरी प्रत्येकासाठी आपला आहे. वेगळा आहे. त्या कमळाभवतीच भ्रमर होऊन फिरत रहावं आनंदानं.. त्याच्या मनःपूर्वक स्मरणातून अशा सहस्त्र प्रदक्षिणा घालण्याचं पुण्य किमान एकदा लाभलं तरी आतली इंद्रायणी भरून पावेल.
या लेखातून हाती काय आलं याचा विचार खचितच करू नये. कारण एक म्हणजे हाती देणारे, देऊ शकणारे आपण कोण? आणि दुसरं म्हणजे ते या लेखनाचं प्रयोजनच नाही. कमळाभवती यथाशक्ती फिरताना भ्रमराच्या आत उमलतात आनंदाची गाणी.. त्यातलंच हे एक गाणं.
माउलीच्या शब्दातीत शब्दकळेला अलंकार शोधण्याचा हा अनिवार मोह. त्याचंच हे एक लहानसं उणं अपुरं गाणं.. सूर शोधत मनसोक्त वाहत जाणारं.. खरंतर फार महत्त्वाचंही नाही. महत्त्वाचं आहे, ते सूर्याचं कृपागान, कमळाचा मार्दवी कळवळा आणि त्या अनुबंधातील सुगंधी जाणीवा..
-पार्थ जोशी
28parthjoshi@gmail.com
(शेअर करण्यास हरकत नाही)
Leave a Reply