उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारा आग्रा-नाशिक मार्ग मध्ययुगात महत्वपूर्ण मानला जात असे . कारण याच मार्गाचा वापर मोगल शासक दख्खनेवर आक्रमण करण्यासाठी करीत असत . त्यामुळे इतिहासकाळात या राजमार्गावर उत्तर महाराष्ट्रातील अनेक मोक्याच्या ठिकाणी गडकिल्ले बांधण्यात आले. आक्रमकांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने खाणदेशातील धुळे गावाजवळ सोनगीर किल्ला बांधण्यात आला .
सोनगीर किल्ल्याला भेट देण्यासाठी, धुळ्याहून १८ कि.मी अंतरावर असणा-या गडपायथ्याचे सोनगीर गाव गाठायचे;तिथे पोहोचताच दक्षिणोत्तर पसरलेला सोनगीरचा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो.गावातून किल्ल्याकडे जाणा-या पायवाटेने काही मिनिटांची चणण पार केल्यावर आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारात येऊन पोहोचतो.या वाटेने चढताना उजव्या हातास गडाची एकसलग तटबंदी व त्यामध्ये असणारे वैविध्यपूर्ण आकाराचे चौकोनी बुरूज पाहायला मिळतात.सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने अधिक आहे.किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या बुरूजांची बरीचशी पडझड झाली असून त्यातील प्रवेशद्वार मात्र सुरक्षित उभे आहे .येथून आत प्रवेश केल्यावर सुंदर नक्षीकामयाअसलेले चार दगडी स्तंभ व एक थडगे आपल्या नजरेत पडते .ते पाहून आपण कातळात खोदून काढलेल्या पाय-यांच्या वाटेने वर जाताना डाव्या हातास सातीआसरा देवीची घुमटी लागते.सातीआसरा देवी ही लेकुरवाळ्या मातांचे दैवत असल्याकारणाने येथे नवस म्हणून छोटे पाळणे ठेवलेले आहेत.
गडमाथ्यावर पोहोचताच आपणास जी तटबंदी दिसते तिथे मोठे दगड न वापरता अनेक लहान दगडांचा एकमेकांवर रचून वापर केला आहे. आपण ही तटबंदी न्याहाळून गडाच्या मधून जाणा-या पायवाटेने दक्षिण बाजूला असणा-या बुरूजाच्या माथ्यावर जायचे .या बाजूस तट तसंच बुरूज वगळता इतर कोणतेही दुर्गअवशेषर शिल्लक नाहीत.त्यामुळे येथून माघारी फिरून आपण गडाच्या उत्तर टोकाकडे जायचे.या वाटेवर आपणास इतिहासकाळात तेल साठविण्यासाठी वापरले जाणारे एक दगडी रांजण निदर्शनास पडतं.हे रांजण जमिनीच्या पोटात असून त्याच्या बाजूलाच एक आयताकृती खोल विहीर असून,इतिहासकाळात मात्र याच विहीरीचे पाणी खापराच्या पाईपद्वारे गडपायथ्याच्या शिबंदीसाठी नेत असत.या विहीरीच्या बाजूलाच एका सुंदर पुष्करणीचे अवशेष असून तिच्या चारही बाजूंच्या भिंतीत प्रत्येकी पाच कोपरे बांधले आहेत.हे दुर्गअवशेष पाहून व वाटेवरील वाड्याचे चौथरे पहात किल्ल्याचे उत्तर टोक गाठायचे.या टोकावर काळ्या पाषाणात बांधलेला गोलाकार बुरूज असून त्यात तोफेची तोंडे बाहेर काढण्यासाठी दगडी झरोकेही ठेवण्यात आलेले आहेत.
१३-१४ व्या शतकात सोनगीर किल्ल्यावर हिंदू राजाची सत्ता होती . पुढे खानदेशाचा फारूकी घराण्याचा संस्थापक राजा मलिक याने सोनगीरवर हल्ला चढवून हा किल्ला जिंकून घेतला.पुढे म्हणजे इ.स. १६०१ मध्ये खानदेशामधील फारूकी घराण्याचे राज्यसंपुष्टात आले.त्याकाळी सोनगीरचा किल्लेदार फौलादखान नावाचा सरदार होता.त्याने बहादूरशहाचा पराभव झाल्याचे पाहताच मोगल सम्राट अकबराचे स्वामित्व मान्य केले .त्यामुळे अकबर बादशाहने त्यास सोनगीरचा किल्लेदार म्हणून कायम ठेवले.१७५२ पर्यंत हा किल्ला मोगलांच्याच ताब्यात होता,पण त्याच वर्षी मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यावेळी झालेल्या भालकीच्या तहानुसार हा गड मराठ्यांच्या ताब्यात आला .त्यावेळी बाळाजी बाजीराव पेशव्यांनी याचा ताबा नाराशंकराकडे दिला .१८१८ मध्ये पेशवा दुसरा बाजीराव शरण आल्यानंतर या गडाचा ताबा इंग्रजांकडे गेला.
— सागर मालाडकर
सोनगीर किल्ला हा सुजानसिंह रावळ या राजाने जिंकला होता…