सोनकी झाली निवृत्त
कौतुके शिखरे गाठली
झेंडू फुलू लागला
परी अहंकार न राहिला!!
अर्थ–
पूर्वीच्या काळी आपल्याकडे सणा सुदीला घरात तोरणं करायला गावागावात सोनकी किंवा रानभूली ची फुले वापरली जायची. अगदी छोटी, नाजूक पिवळी छान मनाला प्रसन्न करणारी ही सोनकी प्रत्येक घराचा दरवाजा उजळून काढायची. पण नंतर झेंडू ला प्रसिद्धी मिळाली, शेती वाढली, मागणी वाढली. तशी सोनकी ची निवृत्ती अटळ झाली आणि तिची जागा झेंडू ने घेतली. आता घरोघरी झेंडू ची तोरणं फुलतात. विजयादशमीच्या दिवशी शस्त्र-अस्त्र-गाड्या-घरे-दुकानं-नोकरीची ठिकाणे- व्यावसायची ठिकाणे- मशिनरी-संगणक-फोन-कॅमेरे इतकंच काय काही ठिकाणी माणसांना सुद्धा फोटोत सजवले जाते या झेंडूच्या फुलांनी. त्यांची पूजा केली जाते. पण याचा अहंकार दोन्ही फुलांना नाही आणि हे समजणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही.
निरासक्त कर्म हे श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेत संबोधले त्याचा खरा अर्थ समजून घेऊन जगणे हे गरजेचे आहे. आपल्या मुळे कोण आहे या दृष्टिपेक्षा आपण कोणामुळे आहोत याची जाणीव असली की तिथे अहंकार या शब्दाला आणि पर्यायाने द्वेष- मत्सर- राग या नकारात्मक धोरणांना थारा मिळत नाही.
आपण करीत असलेले कर्म हे त्यातले मर्म जाणून जर योग्य धर्माने पार पडले तर त्याचा परिणाम अत्युच्च शिखरावर पोचण्यास नक्कीच होईल. पण जर आपण करत असलेले कर्म हे मीपणा-क्रोध-द्वेष- मत्सर या काटेरी जंगलाच्या कचाट्यात सापडले तर मात्र तुम्ही पायथ्याशीच घुटमळत रहाल हे नक्की.
झेंडू आज शोभा वाढवतो तर उद्या निर्माल्य बनून पाण्यात मिसळून जातो. तसेच सोनकीचेही पण आज आणि उद्या च्या विचारात भविष्यात कोण? यावर चर्चा होत बसली तर आज उद्यावर गेलाच समजा आणि मग आज उद्यावर गेल्याने उद्या कधीच येणार नाही तेव्हा निरासक्त कर्म करणे हे गरजेचे आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply