
मानवी शरीरातील नेहमी तपासता न येणाऱ्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी आपल्या कानांना ऐकू न येणाऱ्या म्हणजे अल्ट्रासाउंड ध्वनी लहरींचा वापर केला जातो. क्ष-किरणांप्रमाणेच या ध्वनिलहरी हव्या त्या भागावर केंद्रित करता येतात. अल्ट्रासाऊंड म्हणजे श्राव्यातील ध्वनी लहरींचा उपयोग करून शरीराची तपासणी करण्याच्या तंत्राला सोनोग्राफी असे म्हणतात.
नेहमीच्या ध्वनिलहरी या एखाद्या घटका भोवती फिरत राहतात; परंतु अल्ट्रासाउंड ध्वनिलहरी या एखाद्या वस्तूवर आपटून परत येतात. एक प्रकारे त्या प्रतिध्वनी निर्माण करतात. या प्रतिध्वनीच्या मदतीने जी प्रतिमा तयार केली जाते त्याला सोनोग्राम असे म्हणतात.
विशिष्ट प्रकारच्या स्फटिकांना विद्युत दाब लावला की, त्यांची जाडी विद्युतदाबानुसार बदलत राहते. त्यांच्या कंपनांमुळे जो ध्वनी निर्माण होतो तो अतिउच्च कंपनसंख्या असतो तोच अल्ट्रासाउंड होय. याची फ्रिक्वेन्सी ही २० किलोहर्टझपेक्षा जास्त असते. ट्रान्सड्यूसर च्या मदतीने अल्ट्रासाऊंड लहरी बाहेर फेकल्या जातात व त्यांचा प्रतिध्वनि हा इलेक्ट्रॉनिक संदेशात बदलला जातो.
सोनोग्राफी हे खरे तर रोगनिदानासाठी असलेले सोन्यासारखे तंत्र आहे. पण गर्भलिंगनिदानासाठी त्याचा वापर वाढल्याने ते बदनाम झाली आहे. जन्माला येणार्या बाळातील काही दोष किंवा व्यंगे त्यात आधीच समजतात हा त्याचा खरा उपयोग आहे. शिवाय डॉप्लर शिफ्ट स्कॅनरच्या मदतीने गर्भाशयातील बाळाचे चिमुकले हृदयही समजते. गर्भाच्या दिशेने गेलेल्या अल्ट्रासाउंडच्या प्रतिध्वनीतील फ्रिक्वेन्सी म्हणजे कंप्रतेतील बदल पाहून आपल्याला बरीच माहिती मिळते. यात ट्रान्सड्यूसर हा अल्ट्रासाऊंड प्रक्षेपक व ग्राहक अशी दोन्ही काम करतो.
सोनोग्राफीने आपल्याला रक्ताभिसरणाची पूर्ण माहिती मिळते. रक्ताचा प्रवाह कुठे अडखळत आहे किंवा कसे हे समजते.
एक्स-रे हे उच्च ऊर्जा शक्तीचे असतात. त्यामुळे त्याचा गर्भवती महिलांवर वाईट परिणाम होतो. अल्ट्रासाउंड मध्ये सूक्ष्म यांत्रिक स्पंदने निर्माण होत असल्याने गर्भाची तपासणी करताना सोनोग्राफीचा वापर केल्याने कुठलाच वाईट परिणाम होत नाही. यात अल्ट्रासाउंडच्या प्रतिध्वनीचे रूपांतर इलेक्ट्रॉनिक संदेशात केले जाते व त्यातून गर्भाची किंवा निदान करावयाच्या कुठल्याही अवयवाची प्रतिमा संगणकावर दिसते. यात हृदयाच्या हालचालीही टिपता येतात. त्यामुळे निदान करणे सोपे जाते.
इंग्लिश वैज्ञानिक आयन डोनाल्ड यांनी १९५७ मध्ये अल्ट्रासाउंडचा शोध लावला व त्याचा उपयोग गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी केला. सोनोग्राफीच्याच तंत्रावर आधारित अशा सोनार नावाच्या यंत्राने पाणबुड्यांचा शोध घेता येतो.
संदर्भ : मराठी विज्ञान परिषदेच्या सौजन्याने – ‘कुतुहल’ या सदरामधील लेख – राजेंद्र येवलेकर.
Leave a Reply