शंकर वामन दांडेकर म्हणजेच सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.
सोनोपंत दांडेकर यांचा जन्म २० एप्रिल १८९६ रोजी केळवे-माहीम येथे झाला. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरीच्या वायंगणीचे होते. पुढे ते पालघर यथे स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे-माहीम इथेच झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले तर उच्च शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. १९६९ साली ते मुबई विद्यापीठाची तत्वज्ञान विषयाची ‘ प्रल्हाद सीताराम ‘ ही शिष्यवृत्ती मिळवून १९१९ साली एम. ए . झाले. त्यांनी हरिभक्त-परायण जोग महाराज यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांच्या प्रेरणेने वारकरी संप्रदायात प्रवेश केला. सोनोपंत दांडेकर वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू, प्रसाद मासिकाचे संपादक, प्रवचनकार, कीर्तनकार, पंढरीचे नित्य वारकरी या नात्याने ओळखले जाते. त्यांना मामासाहेब दांडेकर म्ह्णून देखील म्हटले जायचे.
सोनोपंत दांडेकर यांनी १९२० पासून न्यू पुना कॉलेजमध्ये तर १९४० पासून रुईया महाविद्यालयात अध्यापन केले. १९४५ पासून सर परशुरामभाऊ महाविद्यालयात ते प्राचार्य होते. ते १९५१ साली निवृत्त झाले. १९४७ पासून ते ‘ प्रसाद ‘ या मासिकाचे संपादन आणि आणि तेथे त्यांनी पुढे नियमित लेखन केले. मला आठवतंय त्यांचे निधन झाल्यावर ‘ प्रसाद ‘ मासिकात त्यांच्यावर विस्तृत लेख होता, तो माझ्या वाचनात लहानपणीच आला होता कारण माझे आजोबा तो अंक वाचत असत.
महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘ ज्ञानेश्वरी ‘ आणि ‘ नामदेव गाथा ‘ यांच्या प्रकाशन संस्थेच्या समित्यांचे ते अध्यक्ष होते. कीर्तन आणि प्रवचनकार म्हणून जनसामान्यांमध्ये परिचित असलेल्या सोनोपंत दांडेकर यांचे लहान मुख्यतः प्राचीन संतांवरचे आहे. त्यांनी वारकरी पंथाचा इतिहास , श्री ज्ञानदेव : चरित्र आणि ग्रंथ व तत्वज्ञान , ईश्वरवाद हा ईश्वराविषयी प्रश्नांची चर्चा करणारा ग्रंथ लिहिला . त्याचप्रमाणे त्यांनी ‘ ज्ञानदेव व प्लेटो ‘ हा ग्रंथ लिहिला.
सोनोपंत दांडेकर यांनी प्रसाद मासिकात १९४७ ते १९५१ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ प्रकरणांच्या लेखमालेचे संकलन ‘ अध्यात्म शास्त्राची मुलतत्वे ‘ ह्या नावाने केले. त्यांनी जोग महाराजांचे चरित्र १९६५ साली लिहिले.
सोनोपंत दांडेकर आणि १९२५ साली ‘ श्री तुकाराम महाराजांची गाथा ‘ आणि ‘ सार्थ ज्ञानेश्वरी ‘ हे त्यांची महत्वपूर्ण संपादने आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी भागवत धर्म , श्री ज्ञानेश्वरी व ज्ञानेश्वर , तुकाराम महाराज यांच्याविषयी अनेक स्फुट लेख त्यांनी लिहिले आहेत. श्रीमद्भगवद्गीता : महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन , सटीप ज्ञानेश्वरी , सार्थ ज्ञानेश्वरी , साक्षात्कारपथावर तुकाराम अर्थात तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र , श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान , ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश , सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना , ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ , भारतातील थोर स्त्रिया , श्रीसंत चोखामेळा महाराज यांचें चरित्र व अभंग गाथा , अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली .पालघर (पालघर जिल्हा) येथील एका महाविद्यालयाला सोनोपंत दांडेकरांचे नाव दिले आहे त्याचप्रमाणे सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो.
९ जुलै १९६९ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. त्यावेळी पुणे ते आळंदी अशी सुमारे २३ किमी अंतर चालत जाऊन त्यांच्या अंत्ययात्रा आळंदीला पोचली होती. तेथे विष्णूमहाराज जोग यांच्या समाधीच्या सान्निध्यात श्री क्षेत्र आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Leave a Reply