व्यभिचाराची झाली दाटी।
गंजीफा खेळती पैशांसाठी ॥
मुले करिती चोरीचपाटी।
काढती भट्टी घरोघरी ॥
या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा… असेच सांगणे असते. या अशा सर्वसामान्यांना सोप्या शब्दांतून समाज कळावा, त्यांच्या वर्तणुकीत बदल घडावा, त्याच्या घरात सौख्य नांदावे हा ध्यास संताचा असतो. तो समाजाच्या बदलत्या व्यवस्थेकडे पाहत असतो. त्यातून ते समुदाय, व्यक्ती, घर घडावे म्हणून धडपडत असतात. गाव केंद्रबिंदू मानून ते सुधारलेच पाहिजे हाच ध्यास राष्ट्रसंतांचा होता. व्यभिचार आता प्रौढांचा सोपस्कार झाला आहे. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसते. जोडीला पैशांसाठी पत्ते-जुगारासारखे व्यसनं तर आहेच. चोऱ्या-.माऱ्यांमध्येही त्यांना मोठा आनंद वाटतो. यावर ताण म्हणजे दारुची नशा आहेच. व्यसन शमविण्यासाठी दारुच्या भट्ट्या दिसतात. सारेच चंगळवादी होताना दिसतात. राष्ट्रसंताना काय अपेक्षित आहे, त्यांना कसे आचरण हवे आहे, त्यासाठी त्यांच्या अटी कोणत्या आहेत, त्या गावकऱ्यांनी कशा पाळल्या पाहिजेत, गावातील पुढाऱ्याने कसे वागवले पाहिजे, हा सारा बोध त्यांनी दिला आहे. देव कशात शोधावा, तो कोठे असतो हे त्यांनी सांगितले आहे. ग्रामगितेतील प्रत्येक शब्द मनुष्यजातील वठणीवरच आणणारा आहे. गाव सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावे, तिथे ग्रामोद्योग असावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात अशी त्यांची निष्ठा होती. राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञान आचरणयुक्त असून समाजाचा कणा आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच अंधश्रद्धा, देवपूजा, अनिष्ठ रुढी व परंपरा उपटून फेकण्याचे काम ग्रामगीता करते, त्याचे प्रतिबिंब उमटत जाते. ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग,’ असे तुकोबाराय म्हणतात. त्याचे मूळ घरातील सौख्यांशी निगडीत आहे. तोच धागा पुढे राष्ट्रसंत ग्रामउध्दारासाठी पकडून ठेवतात, असे म्हटले तरी समाजिक सुसंगती निश्चित होते. असे म्हणतात की, भगवतगीता कृष्णाने फक्त अर्जुनासाठी सांगितली पण तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता गावा-गावांच्या उद्धारासाठी तेथील फाटक्या-तुटक्या माणसांसाठी सांगितली. यातच सारेच आले.
-चैतन्यतीर्थ
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply