नवीन लेखन...

सोप्या शब्दांत चाणक्य तत्त्वज्ञान

तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत. तत्त्वज्ञान समाजाच्या सर्व स्तरांत रुजवण्यासाठी त्याचं रूपांतर मूल्यांमध्ये करावं लागतं. ही सामाजिक मूल्यं म्हणजेच जगण्याचं तत्त्वज्ञान असतं, ज्याद्वारे समाजाचा घटक असलेला माणूस उन्नत होत असतो.

अशी मूल्य, असं तत्त्वज्ञान रुक्षपणे सांगितलं आणि ते आचरणात आणावं, अशी अपेक्षाही धरली तर ते सहसा शक्य होत नाही. लोकांना निव्वळ उपदेश नको असतो. माणसांच वय कोणतंही असो; त्याच्या गळी एखादा उपदेश उतरवायचा असेल तर त्याला आंजारून, गोंजारून, चुचकारून आणि प्रसंगी दंडित करूनच ते करावं लागतं. साधारणतः अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वी भारतात होऊन गेलेल्या आचार्य विष्णुगुप्त उर्फ आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य याने ही गोष्ट ओळखली होती. म्हणूनच अर्थशास्त्र लिहिताना चाणक्याने विविध उदाहरणांचा उपयोग केला. तत्कालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक मानसिकतेवर बोट ठेवताना त्याच मानसिकतेचा मोठ्या युक्तीने वापर करून समाजाच्या अंगी मूल्ये रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

चाणक्याचे हे तत्त्वज्ञान, ही नीतीमूल्ये सध्याच्या वातावरणासाठी अनुरूप करून अत्यंत सोप्या शब्दांत ‘दस स्पोक चाणक्य’ या पुस्तकात लेखक राधाकृष्णन पिल्लई यांनी मांडलंय. राधाकृष्णन पिल्लई यांनी संस्कृतमध्ये एम.ए. केल्यानंतर कौटिल्यीय अर्थशास्त्र या विषयावर पी.एचडी केली. पिल्लई हे मुंबई विद्यापीठातील लीडरशिप सेंटरचे प्रमुख असून चाणक्याच्या अर्थशास्त्रातील विविध पैलूंवर आधारित विविध अभ्यासक्रम ते राबवतात. यातून त्यांना चाणक्यामध्ये एक मित्र, गुरू, शिक्षक, मार्गदर्शक, नेता दिसून आला.

कोणत्याही महनीय व्यक्तीचं चरित्र मांडणं आणि त्या व्यक्तीच्या कार्यातून विविध विषयांची निवड करून त्या विषयाचा संबंधित महनीय व्यक्तीच्या नजरेतून विस्तार करणं हे खरोखरच अवघड काम आहे, जे राधाकृष्णन पिल्लई त्यांच्या प्रत्येक पुस्तकात यशस्वीरीत्या करतात. म्हणून त्यांनी चाणक्याच्या अर्थशास्त्रातून विषय, संकल्पना वेगळ्या काढून ‘कॉर्पोरेट चाणक्य’, ‘चाणक्याज् सेव्हन सिक्रेट्स ऑफ लीडरशिप’, ‘चाणक्य इन यू’ आणि ‘कथा चाणक्य’ ही पुस्तकं लिहिली. ही सर्व पुस्तकं बेस्ट सेलर्स आहेत.

सध्याच्या काळाला वेग आहे. याच वेगावर स्वार होत सध्याच्या पिढीला प्रत्येक गोष्ट चटकन आत्मसात करायला हवी आहे. साहजिकच ज्ञानाची गोळी घेण्याकडे कल वाढतो आहे. अशा काळात चाणक्याने दिलेला बोध सोप्या-सुटसुटीत भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता लेखकाला वाटली. जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावर कसं वागायचं ते शिकवणारं कुणी मिळतंच असंही नाही, तसं करणं प्रत्येकवेळी शक्यही नसतं. चांगले मित्र कसे मिळवावेत, चांगली कारकीर्द कशी घडवावी, सुखी वैवाहिक जीवन कसं जगावं, कुटुंब कसं चालवावं किंवा चांगलं आयुष्य कसं जगावं हे हाताला धरून शिकवणं शक्य नसलं तरी या पुस्तकातून त्याविषयी दिग्दर्शन करण्यात आलं आहे.

चाणक्याचे विचार वास्तवाशी जोडून, सोप्या उदाहरणांसह इथं मांडले आहेत. थांबा-विचार करा-जा याचे महत्त्व, सतत क्रियाशील राहा, लायक व्यक्तींना प्रोत्साहन द्या, भूतकाळ विसरू नका, तुम्ही तुमचं काम करा देव त्याचं काम करेल, तुम्हाला तुमची कर्तव्ये माहीत असू द्या तशीच इतरांचीही माहीत असू. द्या… यांसारख्या ‘गोष्टी युक्तीच्या चार’ ज्या चाणक्याने सांगितल्या त्या गोष्टीरूपाने, सोप्या शब्दांत या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

कोणतंही तत्त्वज्ञान चिरकाल टिकवायचं असेल, तर ते बदलत्या काळाला अनुरूप करून घेणं जमावं लागतं. असं करताना त्याचा गाभा कुठंही सुटू देता उपयोगी नसतो. मग गहन तत्त्वज्ञान सोपं होऊन जातं. मुख्य म्हणजे ते नकळत आचरणातही आणलं जातं. चाणक्याचं तत्त्वज्ञान सोप्या पद्धतीनं इथं आल्यामुळे ते अनुसरणीय झालं आहे.

वैभव वझे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..