नवीन लेखन...

साउथ आफ्रिका संस्कृती(!!)

एखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली!!) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज). अर्थात, माझ्यासारखे नोकरीसाठी येउन स्थायिक झालेले तसे बरेच आहेत पण एकूण लोकसंख्येच्या मानाने, अजूनही प्रमाण नगण्य आहे. दुभंगलेली कुटुंबव्यवस्था, हे इथल्या बहुतेक सगळ्या समाजाचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल.
जहाजाला कुठे भोक पडले आहे आणि किती प्रमाणात जहाजात पाणी शिरत आहे, याचा पत्ता लागत नाही!! लग्नसंस्था अजून अस्तित्वात आहे, हेच भाग्य!! माझा, इथल्या समाजातील काही लोकांशी जवळून संबंध यायला लागल्यावर, हळूहळू चित्र स्पष्ट व्हायला लागले. सुरवातीला माझ्यावर भारतीय संस्कार स्पष्ट असल्याने, इथल्या मानसिकतेबद्दल बरेच आश्चर्य वाटायचे. नंतर, जसा जवळून संबंध यायला लागल्यावर, भरजरी वस्त्रावरील वर्ख उडून आतील अस्तर दिसायला लागावे, त्याप्रमाणे इथले समाजमन ध्यानात यायला लागले.
गोरा समाज, तुमच्यापासून पहिल्यापासून थोडासा फटकून वागत असतो. काळ्या लोकांपासून तुम्हीच जर दूर असता, तर मुळ भारतीय वंशीय लोक, त्यातल्या त्यात, तुमच्या जवळ येऊ शकतात. कलर्ड समाज तर बहुश: त्यांच्याच विश्वात रममाण झालेले असतात. असे जरी असले तरी संस्कृती म्हणून बघायला गेले तर सामायिकता आढळते. मी, १९९४ साली प्रथम तिकडे गेलो. अर्थात, त्यावेळेस, मी, साउथ आफ्रिकेतील चौथा महाराष्ट्रीयन माणूस!! इथे भारतीय समाज, १]  तमिळ/तेलगु, २] हिंदू/गुजराती, मुसलमान अशा ३ भागात विभागाला गेला आहे.
आता हिंदू म्हणजे, त्यात उत्तर भारतीय, गुजराती,बंगाली सगळे येतात. अर्थात, या विभागणीनुसार देवळे, राहणीमान इत्यादी गोष्टींत फरक पडतो. भाषा अर्थात इंग्रजी. तेंव्हा या समाजातील काही गमतीजमती, उदाहरणासहीत लिहिण्याचा प्रयत्न. खरे तर गमतीजमती हा शब्द बरोबर नाही कारण थोडी तठस्थ वृत्ती ठेवणार आहे. माझ्या पहिल्याच नोकरीत बरेचसे भारतीय वंशाचे लोक ओळखीचे झाले. माझ्या विभागात सुरवातीला, नसिमा म्हणून मुसलमान मुलगी/स्त्री (लग्न झालेले म्हणून) होती. वागायला मोकळेपणा आणि मुळात मी मुंबईहून आलो, याचे औत्स्युक्य!!
माझ्या महितीतील, हीच एकमेव मुलगी, जिचे लग्न अजूनपर्यंत तरी टिकलेले आहे. आमच्या बऱ्याच विषयावर गप्पा व्हायच्या. एक गंमत मी वारंवार अनुभवली आहे. मी, मुंबईतील, हे समजल्यावर लगेच प्रश्न यायचा, ” अमिताभ/शाहरुखला ओळखतोस का??” पहिल्यांदा हसायला यायचे पण, इथे इतका भोळसटपणा सर्रास दिसून येतो. जणू एकाच शहरात राहतो म्हणजे आमच्या भेटीगाठी नेहमीच्याच!! याचे मुख्य कारण, वर्णभेद राज्यव्यवस्थेने इथल्या समाजाला इतर जगापासून वंचित ठेवल्याने, सर्वसाधारण वृत्ती हि अशीच राहिली. आता थोडाफार फरक पडला आहे. हळूहळू जशी ओळख वाढली, तशी एकदोनदा घरी जेवायचे निमंत्रण मिळाले इथे गंमत पाहायला मिळाली. ऑफिसमध्ये वागण्या/बोलण्यात जो मोकळेपणा असायचा, त्याची नामोनिशाणीदेखील, तिच्या(च) घरी दिसत नव्हती.
हाताची घडी आणि तोंडावर बोट!! मलाच कंटाळा आला. कितीही झाले तरी, तिच्या नवऱ्याशी काहीही ओळख नाही, त्यामुळे बोलण्यात अवघडलेपण सतत असायचे!! नंतर लक्षात आले की, टिपिकल मुस्लिम संस्कृती!! मानसिक दुभंगलेपण इथे जे दिसले, ते मला नंतर पुढील १७ वर्षात वारंवार इतर घरांत आढळले. याच ऑफिसमध्ये, फरझाना म्हणून मुस्लिम युवती भेटली. वागायला अतिशय मोकळी, अगदी नको तेव्हढी!! तेंव्हा तिचे लग्न झाले नव्हते परंतु बिनधास्त वृत्तीने ती, दुसऱ्या मुस्लिम माणसाबरोबर राहत होती!! त्याच्यावर तिचे प्रेम होते/आहे. नंतर मला समजले की  शरीरसंबंध देखील ठेवला होता. आता त्याच्याच बरोबर तिचे लग्न झाले आहे. हि, मी बघितलेली पहिली मुस्लिम युवती, जी उघडपणे नाईट क्लबमध्ये नाचायला जायची, क्वचितप्रसंगी “स्मोकिंग”देखील!!
धक्कादायक भाग या पुढे आहे. २००४ मध्ये तिचे रीतसर लग्न झाले परंतु, त्याच्या प्रियकराची नोकरी गेली आणि एकदम हे कुटुंब उघड्यावर आले. धक्कादायक बाब अशी की तिच्या नवऱ्याने तिला “बाजारात आणले!! अगदी उघड नाही परंतु “सोसायटी गर्ल” या नावाने प्रतिष्ठित वर्गात ती मिसळू लागली!! अर्थात, हे सगळे सुरु झाले, तेंव्हा एकदा मी पीटरमेरित्झबर्ग शहरात, असाच जुन्या मित्रांना भेटायला आलो असताना, अचानक फरझाना मला भेटली. वास्तविक कसे बोलायचे, याचा मला संकोच वाटत होता पण, जुन्या मैत्रीच्या आधारावर तिने कसलाही आडपडदा न ठेवता तिचे आयुष्य मला सांगितले!!
पीटरमेरित्झबर्ग हे माझे साउथ आफ्रिकेतील पहिले शहर, नंतर, नोकरीनिमित्ताने, डर्बन, रस्टनबर्ग, Standerton, प्रिटोरिया आणि जोहानसबर्ग इथल्या शहरात वास्तव्य झाले.प्रत्येक शहरात वेगवेगळे “नमुने” अनुभवायला मिळाले. इथेच मला पुढे “हिंदू” समाजातील मुली बघायला मिळाल्या पीटरमेरित्झबर्ग इथल्या कंपनीचा व्याप वाढायला लागला तशी नवीन भरती आवश्यक झाली. त्यानुसार, माझ्या विभागात आधी “बेटी” नंतर “ज्योती” नावाच्या मुली कामाला लागल्या आणि मला इथल्या भारतीय समाजाची खरी ओळख मिळाली!! वास्तविक, या दोन्ही मुली, त्यावेळेस विशीतील किंवा एखाद वर्षे इकडे/तिकडे, याच वयोगटातील. आमचे बोलणे अर्थात इंग्रजीतून.
माझे इंग्रजी म्हणजे भारतीय (ब्राह्मणी!!) तर इथले संपूर्ण पाश्चात्य!! सुरवातीला माझी फार पंचाईत व्हायची. काही उच्चाराला, लोक नाक मुरडायचे! परंतु नंतर मी जाणीवपूर्वक उच्चार सुधारले. आता, हि “बेटी”, अजूनही सुस्वरूप, बुद्धीने तल्लख परंतु चारित्र्याने हलकी!! जेंव्हा माझ्याबरोबर काम करायला सुरवात झाली तेंव्हा तिची “एंगेजमेंट” झाली होती. लवकरच तिच्या प्रियकराशी माझी ओळख करून दिली होती. असे असून देखील हीच बाहेरख्यालीपणा चालूच असायचा दिसायली देखणी असल्याने तिच्या भोवती “रुंजी” घालणारे, अगदी ऑफिसमधील होते. रॉकीबरोबर लग्न ठरलेले असून, ती ” दुसऱ्याशी प्रेमसंबंध ठेऊन होती. लवकरच तिचे दुसऱ्या प्रियकराबरोबर फाटल्याचे समजले. काही दिवसातच, तिने ऑफिसमधील, “थिगेसन” बरोबर “सूत” जमविले त्यावेळेस मी तिच्याशी बराचवेळ बोललो परंतु पालथ्या घड्यावर पाणी!! कामात अतिशय हुशार पण, चारित्र्य हे असे!!
तशीच कथा ज्योतीची!! वास्तविक परंपरागत गुजराती कुटुंबातील हि मुलगी इथल्या मुली गप्पा मारणे प्रसंगी ऑफिसमधील सहकाऱ्याबरोबर जेवायला जाणे, यात कुणीही “निषिद्ध” मानत नाही.  ज्यीतीच्या घरी तर मी बरेचवेळा गेलो होतो तिच्या घरातल्यांशी माझे फार जवळचे संबंध झाले होते. इथेच मला खऱ्या अर्थाने इथला भारतीय समाज समाज कळला. ज्यीतीची आई अतिशय देखणी, हसतमुख अशी आहे ड्रायव्हिंग स्कूल त्यांनी काढले होते, त्यामुळे घरात नेहमीच वर्दळ. ज्योतीचे वडील मात्र दिसायला थोडे वयस्कर होते (२००४ साली ते गेले!!) तरीही त्या कुटुंबात माझे खूप चांगले स्वागत व्हायचे, पुढे मी दुसऱ्या शहरात गेलो तरी या कुटुंबाशी संबंध राखून होतो.
जसे तिच्या घरी, येणे/जाणे वाढले तशी, घरातील अनेक गोष्टी समजायला लागल्या. घरी, ड्रायव्हिंग शिकायला आलेल्या एका तरुणाशी ज्योतीच्या आईचे संबंध जुळले!! इतके की, तिच्या नवऱ्याला देखील याची कल्पना होती!! पण, जिथे नवराच बाहेर संबंध ठेऊन होता तिथे तो हिला कुठून विरोध करणार!! पुढे, १९९७ मध्ये ज्योतीचे लग्न झाले ( म्हटले तर हि “बातमी”!!) आणि ज्योती डर्बन इथे आली. पीटरमेरित्झबर्ग पासून डर्बन केवळ ९० किलोमीटर, त्याचसुमारास, मला डर्बन इथे नोकरी मिळाली आणि अधूनमधून ज्यीतीशी गाठभेट व्हायला लागली. हळदीचा रंग चार दिवस, या न्यायाने सुरवातीला ती खूपच आनंदी दिसायची. पुढे काही वर्षांनी मी डर्बन सोडून रस्टनबर्ग इथे गेलो आणि एकेदिवशी, ज्योतीचा मला फोन आला “कालच अभिजितने मला घराबाहेर काढले आणि मी आजपासून माझ्या मावशीकडे, डर्बन इथेच राहायला सुरवात करीत आहे!!”
एव्हाना मला इथल्या संस्कृतीची चांगली ओळख झाल्याने मला तसे काही फारसे आश्चर्य वाटले नाही. काही दिवसांनी, माझ्या डर्बन इथल्या मित्रांनी बातमी दिली. लाग्नानंतर काही दिवसातच, ज्योतीचा, तिच्या नवऱ्याच्या मित्राशी संबंध आला आणि इतका आला की  गावात बभ्रा व्हायला लागला. या प्रसंगाची परिणीती अशीच होणार होती. वास्तविक. ज्योती माझ्याबरोबर काम करायची तेंव्हा इतकी सालस, सरळ होती ( या शब्दाला आता काहीही अर्थ नाही तरीही!!) की, तिच्याबाबतीत असे काही घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. लग्न होऊन चार(च) वर्षे झाली होती आणि तिची अशी चित्तरकथा!! अशा कितीतरी कथा, माझ्या वास्तव्यात बघायला मिळाल्या.
रस्टनबर्ग मधील कंपनीत, माझ्या विभागात “तान्या” नावाची गोरी मुलगी होती. माझ्या आयुष्यात आलेली हि पहिली गोरी मुलगी. वास्तविक डर्बन  इथल्या कंपनीत काही गोऱ्या  मुलींशी ओळखी झाल्या होत्या पण, त्या मुली दुसऱ्या  डिपार्टमेंट मध्ये कामाला असल्याने फक्त जुजबी ओळख होती. हि, जशी कल्पना केली त्याप्रमाणेच निघाली. गोरा समाज मुलत: मोकळा (वागायला नि बोलायला देखील!!) असतो, त्यातून आता इथे तर एकत्र काम करायचे म्हटल्यावर, ओळख चांगली झाली. साउथ आफ्रिकन संस्कृतीप्रमाणे वयाच्या १७ व्या वर्षी एकटे राहायला सुरवात. अर्थात, Boyfriend आवश्यक.
इथे वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जर का Boyfriend/ girlfriend नसला तर त्या मुला/मुलीतच कमतरता आहे, असे मानण्यात येते!! धन्य तो समाज!! थोड्या ओळखीनंतर, समजले कि त्यावेळचा मित्र, हा तिचा तिसरा Boyfriend!! एकेकट्याने आयुष्य, स्वतंत्र काढायचे, तेंव्हा सगळ्या निर्णयांची जबाबदारी घेणे येतेच!! एक गोष्ट मला स्पष्टपणे समजली. गोऱ्या रंगाची माणसे, शक्यतो काहीही लपवून, छपवून करीत नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षी समजा, आपली आई (एकटी असेल तरच) दुसऱ्या तरुण किंवा वयस्कर पुरुषाच्या प्रेमात पडली तर मुलगा/मुलगीच पुढाकार घेऊन, शक्यतोवर लग्न लावून देतात आणि त्यात काहीही गैर मानत नाहीत. हे कितपत संय्युक्तिक आहे, हा वादाचा मुद्दा (आपल्या दृष्टीने!!) ठरू शकतो, त्यांच्या नाही!!
आता एकत्र राहायचे म्हटल्यावर शारीरिक संबंध येणारच आणि तिथे देखील कसलीच लपवाछपवी नाही. अगदी उघड!! याच कंपनीत टीना नावाची गोरी मुलगी होती.पहिले लग्न मोडलेले तरीही काहीच घडले नाही असे वागणारी!! ती देखील, तिच्या गोऱ्या मित्राच्या घरी राहत होती, मुलासकट!! पुढे काही महिन्यांनी त्यांचे पटेनासे झाले, तिने, त्याचे घर लगेच सोडले आणि स्वतंत्र राहू लागली.अशा घटनांचा त्यांच्या आयुष्यावर दिसण्यासारखा काहीही परिणाम होत नाही. एकट्या असतील तेंव्हा बहुदा अश्रू ढळत असतील, असा देखील अनुभव मला याच मुलीच्या बाबतीत आला. एकदा, एका संध्याकाळी तिने मला जेवायला घरी बोलावले (रविवार दुपार!!) आणि ड्रिंक्स घेताना, तिने माझ्याकडे मन मोकळे केले. गोरी व्यक्ती रडताना, पहिल्यांदाच पाहत होतो. कितीही वाईट वाटले तरी, अखेर मी “परका”. काही दिवस(च) इथे राहायला आलेला, तेंव्हा मी तरी काय दिलासा देणार!! पण, असे प्रसंग विरळाच!!
अशा अनेक कथा, माझ्या गाठीशी आहेत. खरेतर, माझा, ज्या,ज्या मुलींशी संबंध आला, तिच्यावर प्रत्येकी एक, असे प्रकरण लिहावे लागेल. प्रत्येकीच्या आयुष्यात काहीनाकाहीतरी घडलेले आहे. चांगले/वाईट, दोन्हीही!! इथे मी मुलींचीच उदाहरणे दिली आहेत परंतु पुरुष किती “लंपट” आहेत, याचे तर कितीतरी अफलातून अनुभव आहेत.
– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..