नवीन लेखन...

साउथ आफ्रिका – डर्बन!!

माझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इतिहास हेच सांगतो की, या शहरात ब्रिटीश लोकांनी इथे भारतीयांना उसाच्या लागवडीसाठी प्रथम आणले.

गेल्या वर्षी, त्यानिमित्ताने इथे बरेच समारंभ आयोजित केले होते. त्यावेळचे आणलेले भारतीय. हे प्रामुख्याने “गुलाम” म्हणूनच आणले गेले. हळूहळू, त्या भारतीयांनी, इथे स्थिरावायला सुरवात केली. अर्थात, त्यावेळचे भारतीय हे, मुलत: निरक्षरच होते. नंतर, इथे त्यांनी स्वत:चे आयुष्य मांडायला सुरवात केली. मग, त्यावेळच्या चालीरीती(ज्या आजही अत्यंत आंधळेपणाने पाळल्या जातात!!), त्यावेळची संस्कृती, सण वगैरे गोष्टी इथे रुजवायला सुरवात झाली. वंश-भेद सिस्टीम हीं नंतरच्या काळातली. आजही, त्यावेळच्या संस्कृतीच्या काही खुणा इथे आढळतात.

महात्मा गांधी वगैरे सुशिक्षित माणसे हीं नंतरच्या काळात आली. आज, त्यावेळचे काही फोटो बघताना, एकूणच मजा वाटते. आता तर, इथे भारतीय वंश चांगलाच स्थिरावला आहे. खरतर, गुजराती समाज वगळता, इथल्या भारतीय लोकांचा, भारताशी संबंधच मधल्या काळात तुटला होता आणि आलाही, इथे काही लोकांना, त्यांच्या “मूळ” गावाविषयी काही विचारले तर, धडपणे सांगता येत नाही!! गुजराती लोकांचे मात्र खरच कौतुक वाटते. त्यांनी, आपले सण, रीतीरिवाज, भाषा, वेशभूषा, वगैरे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे जपून ठेवल्या आहेत, इतके की, तुम्ही त्यांच्याशी अगदी अस्खलितपणे गुजराती भाषेत बोलू शकता.

तुम्हाला पत्ता लागणार नाही, की तुमच्याशी बोलणारी माणसे, हीं इथली चौथी, पाचवी पिढी आहे!! मात्र, तसे इतर लोकांच्या बाबतीत दिसत नाही. मुळचे तमिळ, तेलगु, बिहारी व राजस्थानी लोक, त्यांची भाषा तर सोडूनच द्या, पण इतर खास गोष्टी देखील पार विसरलेले आहेत. साधे धड हिंदीदेखील फारसे बोलता येत नाही, थोडेफार येते, ते हिंदी चित्रपट बघून!! मला याचे नेहमीच नवल वाटत आले आहे, जी गोष्ट गुजराती लोकांना जमली, ती, या इतर भाषिकांना का जमली नाही?

जेंव्हा इथे Apparthied System शिगेला पोहोचली होती, तेंव्हा या देशाचा सगळ्या जगाशी संबंध तुटला होता आणि हेच कारण, इतर भारतीय नेहमी पुढे करतात, पण मग त्यात गुजराती लोकदेखील होतेच की, तेंव्हा त्यांनादेखील तितकाच जाच झाला जितका या लोकांना झाला. पण, त्यांनी अगदी अहमहमिकेप्रमाणे आपली भाषा संवर्धित केली. यावर मात्र, हे लोक गप्प बसतात.

असो, डर्बन हे शहर, अरेबियन समुद्रकिनारी वसलेले आहे. एकूणच इथले हवामान, आपल्या भारतीयांना सहज भावण्यासारखे आहे, म्हणजे, इथे कधीही कडाक्याची थंडी पडत नाही. मला तर इथे कधीही Jacket घालावेसे वाटले नाही. इथे भारतीय लोकसंख्या बरीच असल्याने, इथे वावरायला देखील खूप चांगले वाटते. जोहानसबर्गप्रमाणे, इथे देखील, नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध असतात पण एकूणच शहर तसे काही फार पसरलेले नाही. आताच गेल्या काही वर्षात, या शहराची वाढ पसरायला लागलेली आहे. आजूबाजूची गावे आता शहरात अंतर्भूत व्हायला लागली आहेत. त्यातून आता, नवीन विमानतळ एका नव्या गावात झाल्यापासून तर, शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात सुरु झाले. इथली हवा, आपल्या सारख्या भारतीय माणसाना मानवणारी असल्याने म्हणा, मला डर्बन फार आवडले.

जोहानसबर्ग शहराचा विस्तार फार प्रचंड असल्याने, ते शहर तसे अंगावरच येते तसे, डर्बन बाबतीत घडत नाही. इथे अत्यंत सुंदर समुद्र किनारे आहेत. व्हाईट लोकांनी, त्या किनार्यांचे सौंदर्य अधिक कसे वाढेल, अशा रीतीने जपणूक केली आहे. इथे वर्षाचे बाराही महिने, समुद्राच्या लाटांवरील खेळ चालू असतात, उदाहरणार्थ, skeing, water boating इत्यादी. इथे काही समुद्र किनारे असे देखील आहेत की, एखाद्या संध्याकाळी निरवपणे ध्यानस्थ बसता येते. इथे किनारे बरेच असल्याने, अर्थातच मासे आणि त्यांचे Aquarium, Dolphin Show इत्यादी गोष्टी खरच बघण्यासारख्या आहेत. त्यातून, निरनिराळे Water Sports तर वेगळीच धुंदी आणतात.

केप टाऊन, पोर्ट एलिझाबेथ आणि डर्बन हीं, या देशातील अशी शहरे आहेत की, केवळ समुद्र किनारे आणि त्यांचे सौंदर्य उपभोगणे, यासाठी इथे वारंवार यावे!! केप टाऊन तर, फारच बहारीचे आहे. इथे सर्व प्रकारच्या हॉटेल्सची सोय आहे. Hilton, Holiday Inn सारख्या पंच तारांकित हॉटेल्स पासून ते, Road Lodge, City Lodge सारख्या सामान्य माणसाना परवडणाऱ्या हॉटेल्सची इथे भाऊगर्दी आहे. या शहरात जितकी भारतीय हॉटेल्स सापडतात, तितकी, अगदी केप टाऊन मध्ये देखील नाहीत. मी जेंव्हा या शहरात राहत होतो, तेंव्हा महिन्यातून एकदा तरी, लांबवरच्या समुद्रकिनारी भेट देऊन यायचे, हा माझा नित्याचा कार्यक्रम होता. शहरातील किनाऱ्यांवर फार गर्दी असते, विशेषत: शनिवार-रविवार हे दिवस तर, अशा ठिकाणी फारच गर्दीचे असतात. अगदी गाडी कुठे पार्क करायची, इथून प्रश्न सुरु होतात. त्यामानाने, दूरवरचे किनारे तसे अति शांत आणि मोकळे असतात. त्यानिमित्ताने, गाडीदेखील जोरदारपणे घुमवता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, मिळणाऱ्या शांततेने मनाला मोठा विरंगुळा लाभतो.

इथेच, Chatsworth या उपनगरात ESKON चे कृष्ण मंदिर आहे. मंदिर खरोखरच फार भव्य आहे. अति सुंदर आणि तितकेच अति स्वच्छ!! मी राहायचो त्यापासून हे ठिकाण तसे लांब होते, पण कधीतरी जायला फार मजा यायची. तशी शहरात इतर हिंदूंची बरीच मंदिरे आहेत. इथे तसे म्युझियम वगैरे आहे पण ते काही खास बघण्यासारखे नाही. इतर शहरांप्रमाणेच इथेदेखील अप्रतिम मॉल्स आहेत. बऱ्याच वेळा तिथे हिंदी चित्रपट लागतात. हल्ली तर, इथे बऱ्याच हिंदी चित्रपटांचे शुटींगदेखील होते. एकतर, युरोपप्रमाणे अप्रतिम लोकेशन्स सापडतात आणि एकूणच खर्चदेखील त्यामानाने बराच कमी येतो. इथे एकूणच राहण्याचा खर्च तसा कमी आहे, कारण घराच्या किमती आणि गाड्यांच्या किमती!! इथेदेखील अजूनही, तुम्हाला, भारतीय, काळे, कलर्ड आणि गोरे अशा वेगवेगळ्या वसाहती आढळतील आणि अर्थातच त्यानुरूप त्यांचे राहणीमान!!

माझ्यासारखे जे हल्लीच भारतातून आलेले आहेत, ते शक्यतोवर, गोऱ्या लोकांच्या वस्तीतच रहातात. इथेदेखील आता हळूहळू गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललेले आहे तरीही, निदान दिवसा ढवळ्या तरी, तुम्ही इथे रस्त्यावरून हिंडू शकता. जोहानसबर्ग आणि डर्बन, या शहरातील एक फरक प्रकर्षाने जाणवतो व तो म्हणजे डर्बनमधील दाट झाडी!! खरे तर, जोहानसबर्गमध्ये देखील झाडी भरपूर आहे, शहराच्या मध्यभागी Emerentia सारखे अति विस्तीर्ण उद्यान आहे, की जिथे आत शिरल्यावर, बाहेरील जगाशी संबंधच तुटल्यासारखा होतो, तरीदेखील डर्बन आणि एकूणच नाताळ राज्यातील हिरवेगारपणा काही और आहे.

एकही रस्ता असा सापडत नाही की तिथे झाडांची गर्दी नाही!! त्यामुळे, अगदी कडक उन्हाळा जरी झाला तरी एकूणच सगळे वातावरण शांत असते. इथल्या लोकांना शिकवण आहे की नाही, मला कल्पना नाही, पण आपल्यासारखी इथे वृक्षतोड वगैरे प्रकार घडत नाही. वृक्ष तोडले जातात, ते केवळ वादळाने आडवे झाले म्हणू किंवा एकूणच रहदारीला त्रासदायक झाले म्हणून. खरतर, हिरवी झाडी, हीं डोळ्यांना किती विश्रांती देते, हे जणू आपल्याला भारतात, कुणी समजावून सांगितलेच नाही!! डर्बन टुमदार आहे, बरीच भारतीय माणसे सहज आणि वारंवार भेटतात, दिसतात, म्हणून असेल पण या शहराने माझ्या मनात “घर” केले, हे मात्र नक्की.

– अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..