आतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, पण बहुतेक काळे लोक हे स्वत:पुरते बघणारे आणि स्वत:च्याच कोशात वावरणारे असतात. त्यातून, मी देखील कधी फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. कामाच्या संदर्भात, जेव्हढा संबंध आला, तितकाच आणि तेव्हढाच संबंध माझ्याकडून राखला गेला. तोच प्रकार, कलर्ड समाजाबद्दल. खर तर, हा समाज, मुळातच गैर लैंगिक संबंधातून अधिकतर जन्माला आला!!
कलर्ड याचा अर्थच मुळी, एकतर बाप गोरा आणि आई काळी, किंवा आई गोरी आणि बाप काळा!! शक्यतोवर भारतीय वंशाचे लोक, या वाटेला फारसे गेलेले आढळत नाहीत. अगदीच सापडत नाहीत, असे देखील नाही पण एकूण प्रमाण नगण्यच म्हणावे लागेल. कारण,इथे पूर्वीपासून गुलाम म्हणूनच वागवले गेल्याने आणि गोऱ्या लोकांची अनन्वित अत्याचार करण्याची प्रवृत्तीलालसा यातून, प्रामुख्याने हा समाज उदयाला आला. त्यामुळे, जिथे जन्मच मुळी, अनैतिक संबंधातून आलेला असल्याने, एकूणच मानसिक जडण घडण हीं अतिरेकी आणि स्वैर विचारांचीच होत गेली. आजही, त्यात फारसा बदल नाही. त्यामुळे असेल, कदाचित पण माझा या समाजाशी फारसा जवळचा संबंध आला नाही. त्यातून, बरेचसे काळे,जरा उग्र स्वभावाचेच भेटले. त्यामुळे, मी आपसूकच दूरस्थ अंतर राखूनच संबंध ठेवले. काही वर्षांपूर्वी, मी जेंव्हा UB group मध्ये काम करत असताना, मला साउथ आफ्रिकेतील अंतर्भागात बरेच फिरावे लागले. आमचे सेल्स डेपोज हे फार अंतर्भागात होते, आणि माझ्या कामाचा एक भाग म्हणून, त्या डेपोजना भेट देणे आवश्यक असायचे. त्यावेळी, मला जे साउथ आफ्रिकेचे दर्शन घडले, ते सहजी विसरण्यासारखे नाही.
आपल्या भारतात, ज्याला दारूचे गुत्ते म्हणतात, त्याची प्रतिकृती इथले बियर हॉल आहेत. एकतर, देशाच्या अंतर्भागात राहण्याची इतकी वाईट अवस्था आहे की आपण कल्पना देखील करू शकणार नाही. इतकी वर्षे, मी शहरात घालवल्यानंतर, हे जुनाट दर्शन, मला जरा धक्का देणारेच ठरले. घरात साधा रॉकेलचा दिवा नाही, सतत अंधारी वातावरण, घरात नेहमीच दारूचा भपकारा येत असतो. बियर हॉलमध्ये तर, नेहमी मिणमिणणारे दिवे आणि, बरेचसे झिंगलेले दारुडे, असेच वातावरण असते. कुठेतरी शिळ्या बियरचा वास कोंदटलेला असतो , कुणीतरी अर्धवट नशेत अर्वाच्य शिव्या हासडित असतो, असे अतिशय बकाल वातावरण असते. आसपासची घरे देखील, फक्त मातीची किंवा शेणाने सारवलेली असतात. आजूबाजूला, घाणीचा नुसता बुजबुजाट माजलेला असतो. मला तर, कधी एकदा stock report बनवून, निघतो, असे प्रत्येक वेळी वाटायचे.
असो, यावरून, जोहानसबर्ग शहराची कल्पना करू नये. जोहानसबर्ग शहर म्हणजे साउथ आफ्रिकेच्या ऐश्वर्याचा चांद!! विशेषत: इथली उपनगरे म्हणजे या शहराची शान आहे. Sandton, Midrand, Bendfordview, Randburg, East Gate, Benoni इत्यादी उपनगरे खरोखरच अप्रतिम आहेत. नुसते इथले मॉल्स जरी हिंडत बसलो तरी आठवडा सहज निघून जाईल(काहीही खरेदी न करता!!) इथले रस्ते, इथले हवामान, एकूणच infrastructure हे जागतिक दर्जाचे आहे. जसे भारतात, मुंबईचे स्थान तसे इथे जोहानसबर्गचे स्थान.
देशातील बहुतेक सगळ्या आर्थिक घडामोडीचे केंद्रबिंदू. देशातील सर्वात जास्त उद्योगधंदे, करमणुकीची साधने, उंची हॉटेल्स, अप्रतिम मॉल्स, सगळे काही इथे उपलब्ध आहे. इथले Lion Park देखील सुंदर आहे. इथे, तुम्ही सिंहाच्या छाव्यांशी खेळू शकता, फोटो काढू शकता. जोहानसबर्ग हे समुद्रसपाटीपासून खूपच उंचावर असल्याने, हवा बहुतेकवेळा थंडच असते. इथल्या घरात जर डोकावून पहिले तर असे लक्षात येईल की, या घरात पंखे अडकवायची सोयच नाही. असे नव्हे, की कुठेच सिलिंग पंखे दिसत नाहीत पण शक्यतो बहुतेक घरात table fan असतात.
घरात, हीटर मात्र आवश्यक कारण अगदी उन्हाळ्याच्या दिवसात देखील जरा जोराचा पाऊस पडला तरी हवा बोचरी थंड होते. थंडीच्या दिवसात तर, हीटरशिवाय गत्यंतरच नाही!! इथले रस्ते देखील पाहण्यासारखे आहेत, अगदी सरळसोट रस्ते, फक्त वर खाली फार आहेत, कारण शहरच मुळात वेगवेगळ्या टेकड्यांवर वसलेले आहे. इथेच देशाचे प्रमुख शेयर मार्केट आहे. त्यामुळे, सगळ्या आर्थिक घडामोडी इथूनच हलवल्या जातात. तसा विचार केला तर, या शहरात खास काय बघण्यासारखे आहे, तर थोडा प्रश्नच आहे. मॉल्स वगैरे इमारती सोडून दिल्या तर, मात्र बघण्यासारखे खास काहीही नाही.
इथेच जगप्रसिद्ध क्रिकेटचे Wanderors हे स्टेडियम आहे. खरेदी करायला, जोहानसबर्गसारखे दुसरे शहर नाही. या शहरात काय मिळत नाही, हाच खरा प्रश्न आहे. जगातील सगळ्या उत्तमोत्तम गोष्टी इथे सहज उपलब्ध आहेत. अर्थात, जगातील इतर शहराप्रमाणे, या शहरातही गलिच्छ वस्ती आहे. Sandton सारख्या अति श्रीमंत उपनगराच्या बाजूलाच, Hillbrow सारखे अत्यंत बकाल आणि गुन्हेगारीने बुजबुजलेले उपनगर आहे. तिथे तर, मी रात्री तर सोडूनच द्या, दिवसा देखील एखाद, दुसरा प्रसंग वगळला तर गेलेलो नाही. अर्थात, या भागात, गोरे लोक राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
आर्थिक केंद्र असल्याने, आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण देखील या शहरातच अधिक!! रात्री शहराच्या सेन्ट्रल विभागातून पायी हिंडण्याचे धाडसच होत नाही. खरतर, साउथ आफ्रिकेत, रात्रीचे पायी हिंडणे एकूणच फार धोकादायक आहे. इथेच मला मुंबईची फार आठवण येते. मुंबईत, दिवसा तर सोडूनच द्या, रात्रीदेखील, तुम्ही आरामात रस्त्यावरून हिंडू शकता. मुळात, जोहान्सबर्ग शहर हे अति प्रचंड आणि पसरलेले आहे. जवळपास, मुंबईच्या तिप्पट तरी पसरलेले शहर आहे. सगळे शहर, highway ला जोडलेले आहे. जवळपास २५ off-ram आहेत, म्हणजे उपनगरे!! त्यामुळे, गाडी चालवताना, जरा सावधानगीरीच बाकागावी लागते, कारण जर का तुम्ही तुमचा off-ram चुकलात, तर तुम्हाला कमीत कमी ३ ते ४ की.मी,चा उलटा प्रवास करणे आवश्यक ठरते.
– अनिल गोविलकर