मागील भागात, मी इथल्या भारतीय वंशाच्या समाजातील पुरुषाबद्दल थोडे लिहिले. खर तर, इथल्या भारतीय लोकांच्यात “न्यूनगंड” प्रचंड प्रमाणात आहे. तो त्याच्याशी बोलताना सतत जाणवत असतो. कुठल्याही विषयात, आपल्याला प्रचंड माहित अथवा ज्ञान आहे, असा ते फार चलाखीने भास निर्माण करू शकतात. प्रत्यक्षात, ते चक्क खोटे बोलत असतात. त्यांना त्यात काय आनंद मिळतो, याचा मला अजूनही पत्ता लागलेला नाही. कारण, त्यांचे खोटे बोलणे, मी इतरांशी बोलताना उघडकीस आणलेले आहे पण, तरीदेखील वृत्तीत काही फरक नाही. स्वत;चा प्रचंड बडेजाव मारायचा, असे त्याच्या स्वभावाचे व्यवच्छेदक लक्षण सांगता येईल आणि आपण बोलताना किती वाहवत जात आहोत, याची तमा न बाळगता, इथले भारतीय बोलत असतात.
आतापर्यंत, मी कितीतरी भारतीयांच्या घरी पार्ट्यांना गेलेलो आहे. ड्रिंक्स अर्थात, हा पार्टीचा प्रमुख कार्यक्रम. खर तर, ड्रिंक्स शिवाय, इथे कसलाच समारंभ साजरा होत नाही!! त्यात, जर का पार्टी असेल तर, तो कार्यक्रम प्रथम, मग वाढदिवस, बारसे, लग्न समारंभ इत्यादी गोष्टीना प्राधान्य!! अशा वेळी, अनेक अगदी वयस्कर माणसे जरी घेतली तरी, त्यांचे बोलणे याच वळणावर जाते. मी, कितीतरी वयस्कर माणसाना चक्क “थापा” मारताना ऐकलेले आहे. मलाच, मुंबई कशी कळलेली नाही, हे समजावून सांगतात. आता, काय बोलणार!! आणि, हे सगळे अतिशय गंभीरपणे, बोलणे चाललेले असते.
अरे, प्रत्यक्ष “कोलाबा” परिसर कसा आहे, हेच मी आतापर्यंत कमीतकमी चाळीस वेळा तरी ऐकलेले असेन!! प्रत्यक्षात, हीं माणसे, त्या परिसरात केवळ पाच, सहा दिवसच राहिलेली असतात!! तुम्हाला एक गंम्मत सांगतो. १९९७ च्या सुमारास, मी अशाच एका पार्टीला गेलो होतो. अर्थात, भारतीय लोकांचीच पार्टी होती. तिथे मला काही मुले/मुली भ्तल्या आणि त्यांना, मी भारतातून आलो आहे, असे समजले. त्यातील एका मुलीने, भारतीय चित्रपट संगीताचा विषय काढला. मी खुश!! तिने, अर्थात, त्यावेळची गाजत असलेली गाणी, मला आवडल्याचे सांगितले. मी तसा गप्पच होतो. थोड्यावेळाने, मी तिला, “लताची कुठली गाणी आवडतात?” हा प्रश्न केला. यावर, तिचा प्रश्न “कोण लता!!”. आता सांग, मी काय बोलणार!! पण, अशा अर्धवट माहितीवरच, तिथे फुशारकी मारली जाते आणि स्वत;ची पाठ थोपटून घेतली जाते.
मागे, मी “निखारयावरून चालणे” यावर लिहिले होते. अशाच एका, पार्टीत एक भारतीय मला भेटला होता आणि तो मला अभिमानाने सांगत होता.”मी निखाऱ्यावरून अनवाणी आणि अत्यंत संथपणे चालतो!! बाकीच्यांना माझ्यासारखे अजिबात चालता येत नाही!!” प्रत्यक्षात, ती व्यक्ती, गेले दोन वर्षे नोकरी नाही(वय वर्षे ३०-हीं गोष्ट १९९८ मधली!!) आणि भावाच्या घरी अक्षरश: चरत होता आणि घमेंड कसली बाळगतो तर, निखारयावरून संथ चालण्याची!! नंतरही, तो पुढील ४ वर्षे तरी भावाकडेच राहत होता. आता, तो कुठे आहे, काहीच कल्पना नाही. पण, असा भारतीय लोकांचा स्वभाव!! माझा असा अंदाज आहे, की १९८८ पर्यंत, सतत व्हाईट लोकांच्या जोखडाखाली वावरल्याने, मनाची प्रचंड कुचंबणा झाली असाणार आणि स्वातंत्र्य मिळाले पण आता इथे Black Empowerment कायदा लागू झाला आणि भारतीय समाजाची कोंडी तशी कायमच राहिली!! त्या मानसिक कोंडीतून, हताशता आणि विफलता, याचे मिश्रण त्याच्या मनात झालेले आहे. त्यातूनच असा वैफल्यग्रस्त अहंगंड निर्माण झाला असणार. त्यातून, इथे शिक्षण प्रचंड महाग असल्याने आणि आर्थिक परिस्थती तशी सामान्य असल्याने, त्या कुचंबणेत सतत भर पडत राहिली.
शिक्षण म्हणजे, Matric हेच बहुतांशी भारतीयांच्या नशिबात लिहिलेले आहे. आता, त्या पदवीनुसारच त्यांना नोकऱ्या मिळणार आणि मग अशा अवस्थेत त्यांचा आर्थिक स्तर उंचावायचा कसा? कोणी तसे फारसे बोलून दाखवत नाही, पण एखाद्या बेसावध क्षणी आपल्याला असे कळून जाते. इथे, Appartheid काळात, किती अत्याचार झाले, याबद्दल तसे अजूनही फारसे बोलले जात नाही. अर्थात, तुम्ही जसे जवळकीचे संबंध जोडाल, तशी ती माहिती आपल्याला कळू शकते. मी इथे १९९४ साली आलो, म्हणजे वंश-भेद संपून नुकतीच दोनच वर्षे झाली होती. तरीदेखील मला याची स्पष्टपणे जाणीव झाली होती. व्हाईट लोकांच्या हॉटेलमध्ये जर का तुम्ही गेलात, तर तुम्हाला कुणी आधी विचारात नाही आणि तुमची ऑर्डर घ्यायला कुणी गोरी मुलगी आली, तर चेहऱ्यावर तुसडा भाव स्पष्टपणे दिसायचा. तुमची ऑर्डर वेळेवर आणली जात नसे आणि हीं गोष्ट १९९४ च्या अखेरची!!
आजही, इथे व्हाईट लोकांच्या वस्तीत तुम्हाला लगेच घर मिळत नाही, मिळाले तर, व्हाईट लोक तुमच्याशी संबंध ठेवायला संपूर्णपणे नाखुशच असतात. मी, २००७ साली इथे महिंद्र कंपनीत नोकरी स्वीकारली होती, बहुतेक भाग हा आजही व्हाईट लोकांनी व्यापलेला, तेंव्हा मला घर देखील त्यांच्याच परिसरात घ्यावे लागले. तुम्हाला सांगतो, पहिले दोन महिने, माझ्या शेजारी एक व्हाईट कुटुंब राहत होते पण कधीही “hi” किंवा “Hello” देखील झाले नाही!! अर्थात, नंतर जेंव्हा, माझ्या घरात ऑफिसमधील व्हाईट लोक यायला लागल्याचे बघितल्यावर, त्यांनी माझ्याशी आपणहून बोलायला सुरवात केली!! हीं परिस्थिती २००७ मधील तर मग जेंव्हा प्रत्यक्ष वंश-भेद अगदी भर वस्तीत स्थिरावला होता, तेंव्हा काय हाल झाले असतील याची कल्पना करता येते.
सुदैवाने, माझे आता काही भारतीय कुटुंबात चांगले संबंध निर्माण झाले आहेत आणि ती माणसे मात्र माझ्याशी खूप जवळकीने वागतात. अगदी, जर का दोन,तीन दिवसात फोन झाला नाही तर, स्वता:हून ते माझी विचारपूस करतात. पण, एकूणच भारतीय समाज हा मी वर म्हटल्याप्रमाणे दुभंगलेला आहे. भारताबद्दल खूप आस्था दाखवतात, पण त्यात दिखावूपणा फार दिसून येतो.आपण भारतीय संस्कृतीशी किती जवळीक राखून आहोत, याचे अत्यंत केविलवाणे प्रदर्शन करीत असतात. प्रत्यक्षात, त्यांना भारताची काडीमात्र माहिती नसते, अर्थात, अपवाद म्हणून काही भारतीयांचा निर्देश करता येईल पण, माझे मत, हे एक प्रातिनिधिक मत म्हणून मानायला काहीच हरकत नाही.
एकीकडे, भारतीयत्वाचा प्रंचंड अभिमान बाळगायचा आणि दुसरीकडे, व्हाईट लोकांच्या चाली-रिती आंधळ्या वृत्तीने स्वीकारायच्या, अशा अवस्थेत भारतीय समाज अडकलेला आहे. आतापर्यंत, मी इथला समाज भारतीय ऐकीव माहितीवर कसे अंधानुकरण करीत आहे, हे थोडक्यात सांगितले. आता, याचा दुसरा भाग!!
इथली लग्नसंस्था जवळपास, मोडकळीस आलेली आहे, असे म्हटले तर आश्चर्य वाटायला नको. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जर का मुलाला मैत्रीण किंवा मुलीला मित्र मिळाला नाही तर, त्या मुलीत/मुळात काहीतरी विकार आहे की काय, असला विचित्र समंज इथे पसरलेला आहे. प्रत्यक्ष आई किंवा वडीलच त्या चितेत पडतात, म्हणजे बघ!! त्यातूनच, लग्नाशिवाय एकत्र राहायचे(त्याला काही बंधन नाही!! माझी एक मैत्रीण गेले ८ वर्षे तिच्या मित्राबरोबर राहत आहे पण लग्नाचा अजून पत्ता नाही!!), शरीराचे सगळे भोग घ्यायचे, आणि जर का त्यानंतरही पटले तर लग्न करायचे, असा इथल्या सगळ्या( भारतीय, व्हाईट, काळा समंज) समजत पायंडा पडलेल्वा आहे. आपल्या भारतात, हल्लीच “live and let relation” पद्धतीबद्दल बरेच काही वाद चालू आहेत पण इथे हीं पद्धत कितीतरी वर्षे आधीपासून चालत आहे. अर्थात, इतकी वर्षे एकत्र राहूनदेखील, प्रत्यक्ष लग्न होईलच याची शाश्वती शून्य!!
मी तर, कितीतरी, अशा भारतीय मुली पाहिलेल्या आहेत की, ७,८ वर्षे आपल्या प्रियकरासमवेत राहिल्यानंतर, त्यांना हा प्रियकर आपल्या मनासारखा नाही अशी “उपरती” होते!! तोपर्यंत, तिला एखादे मुल देखील झालेले असते आणि मग त्या मुलाचे घोंगडे ती स्वीकारून, आपले आयुष्य भरकटवीत असते, त्याबरोबर त्या मुलाचे देखील!! अगदी, माझ्या जवळच्या मित्राच्या कुटुंबात देखील अशा घटना घडलेल्या आहेत!! काही मुली, तर त्याहून पुढारलेल्या असतात, स्मोकिंग आणि ड्रिंक्स तर इतक्या प्रमाणात करतात, की पुरुष देखील चकित व्हावेत!! आणि, ह्या मुली काही श्रीमंत घरातील नसतात तर आपल्या सारख्याच मध्यम वर्गीय घरातील असतात.
माझी एक मैत्रीण तर फारच पुढारलेली होती. आता मी होती असे म्हणतो कारण आता ती लग्न होऊन स्थिरावलेली आहे. ती तर, एकाच वेळी ४ प्रियकरासमवेत प्रणयाचे रंग उधळत होती आणि पाचव्याबरोबर एंगेजमेंट झाली असताना. त्याचे तिला काहीच वाटत नव्हते. मी तर, तिच्या आई/वडिलांना प्रत्यक्ष ओळखत होतो आणि हीं माझ्याच कंपनीत कामाला होती!! एकदा, मी तिला याबाबत विचारले असता, तिचे उत्तर, “I just want to enjoy my life before marriage!!” आता, या उत्तरावर मी काय बोलणार!! अर्थात, पुढील भागात, आणखी रंगतदार गोष्टी लिहीन.
-अनिल गोविलकर