नवीन लेखन...

साउथ आफ्रिका – भाग ७

इथले समाज जीवन, हे प्रामुख्याने, मॉल आणि मॉल संकृतीशी जखडलेले आहे. अर्थात, हे मॉल्स मात्र असतात अतिशय सुंदर, प्रशस्त नि विविध गोष्टीनी सामावलेले!! अशा मॉल्स मध्ये, माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजा, पुरवणारे दुकानदार असतात. इथे, नुसते जोहानसबर्ग जरी लक्ष्यात घेतले तरी, या शहरातील प्रत्येक उपनगरात, फार प्रशस्त मॉल्स आहेत. अगदी, नावेच घ्यायची झाल्यास, Sandton, Fourways, Bedfordview, Eastgate, Midrand इत्यादी. प्रत्येक मॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स, शॉप्स यांची नुसती रेलचेल असते. काही अति सुंदर पुस्तकालये असतात, उदाहरणार्थ, Exclusive Books. मी तर, कितीतरी वेळा या पुस्तकालयात जाऊन, एखादे पुस्तक हाताळायला घेऊन, अनेक तास वाचीत बसलेलो आहे. त्याच लायब्ररीत एक छोटेसे कॉफी शॉप असते. तीत्थे फार अप्रतिम कॉफी मिळते.

एक ग्लास भरून कॉफी घ्यायची आणि शांतपणे पुस्तक वाचीत बसायचे, या सारखा दुसरा विरंगुळा नाही. मला तर, अशाच ठिकाणी काही अप्रतिम पुस्तके मिळाली आहेत की जी आज माझ्या भारतातील संग्रहात जमा झाली आहेत. Exclusive Books हे माझे मंदिर!! इथला एक सर्वात चांगला गुण, आपण भारतीयांनी जरूर आत्मसात केला पाहिजे, व तो म्हणजे “शांतता” राखण्याचा. वास्तविक मॉल्समध्ये हजारोनी लोक जमलेले असतात पण कुठेही गडबड-गोंधळ नाही. जोहानसबर्गमध्ये, Monte Casino आणि Emperor’s Palace सारखे अवाढव्य कॅसिनोस आहेत, तिथे तर, देवाला सतत फुले वाहावीत त्याप्रमाणे मशीनसमोर बसून, शेकड्यांनी लोक पैशांचा आहेर देत असतात. अशा ठिकाणी देखील, कधीही आरडा-ओरडा होत नाही की गडबड, गोंधळ माजत नाही. सगळे कसे अति शिस्तवार!!

नुसता पायी फिरायचे म्हटले तरी तुमचे तास-दोन तास सहज निघून जातात. मी तर, Monte Casino मध्ये कितीतरी वेळा गेलो आहे, बहुतेक वेळा, आपले हिंदी चित्रपट पाहण्यासाठी. इथे, भारतासारखी चित्रपटासाठी प्रचंड रांग लावावी लागत नाही. तुम्ही, Compu Ticket वरून, आपली तिकिटे आधीच आरक्षित करू शकता. मी तर, काही चित्रपट अगदी, First Day show, असे पहिले आहेत. अशा कॅसिनो जागी देखील, Exclusive Books सारखे अप्रतिम पुस्तकालय असते आणि तुम्ही तिथे आपला वेळ सत्कारणी लावू शकता. मला वाटत, आता मुंबईत देखील अशा प्रकारची शॉप्स निघाली आहेत.

उदाहरणार्थ, Oxford Book इत्यादी. इथे मराठी पुस्तके मात्र मिळत नाहीत!! तस पहिला गेल्यास, इथे भारतातील बातम्यांपैकी, राजकीय आणि चित्रपट विषयक बातम्यांना प्रचंड आकर्षण आहे. विशेषत: हिंदी चित्रपट आणि अभिनेते यांना इथे फार मागणी आहे. सध्या शाहरुख हा इथल्या भारतीयांचा “देव” आहे. मागे, काही वर्षापूर्वी, इथे शाहरुख, सैफ, रानी मुखर्जी, आणि प्रीती झिंटा इथे आले होते. त्यांनी, जोहानसबर्ग, सन सिटी आणि डर्बन इथे कार्यक्रम केले होते. मी, अर्थातच सन सिटी इथल्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळी, जेंव्हा शाहरुख रंगमंचावर आला, त्यावेळचा टाळ्यांचा कडकडाट अजूनही लक्ष्यात राहिलेला आहे.

सन सिटी, हा इथल्या विलासाचे सर्वोच्च ठिकाण!! विशेषत: Palace Hotel!! इथे ऐषारामाची परमावधी गाठलेली आहे. अर्थात, कॅसिनो आहेतच. पण, तरीही मानव निर्मित अनेक अनुभवण्यासारख्या गोष्टी आहेत. जोहानसबर्ग काय किंवा सन सिटी काय, इथे निसर्ग निर्मित सौंदर्य फारसे नाही पण, इथल्या लोकांनी त्याची कसर, अशा अप्रतिम मॉल्स, शॉप्स, कॅसिनो अशा गोष्टीनी भरून काढली आहे. निसर्ग सौंदर्य पाहायचे असेल तर, मात्र केप टाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. डर्बन सुंदर आहे, अप्रतिम समुद्र किनारे आहेत पण, तरी देखील केप टाऊनची गोष्टच वेगळी.

तिथले समुद्र किनारे, जगप्रसिद्ध Table Mountain, Cape of Good Hope, Robin Island हीं सगळी ठिकाणे खरोखरच फार सुंदर आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, समुद्र किनारे अति विशाल आणि पसरलेले जरी असले तरी घाणीचा जराही मागमूस नसलेले!! जरा आपल्या इथले किनारे(काही अपवाद वगळता!!) नजरेसमोर आणल्यास, इथल्या किनाऱ्यांची स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, आता काही ठिकाणी थोडी अस्वच्छता दिसते आणि ती प्रामुख्याने, काळे आणि भारतीय लोकांनी फेकलेल्या शीतपेय व बियरच्या डब्यांमुळे!! त्याबाबतीत आजही, गोरा माणूस, स्वच्छतेचा अति आग्रही माणूस आहे. मला तर, याचा अनुभव कितीतरी वेळा आलेला आहे.

सुरवातीला, मीदेखील, भारतीय सवयीप्रमाणे, हातातील सिगारेटचे थोटूक(पूर्वी मी स्मोकिंग करायचो!!) रस्त्यावर टाकायचे, कोक संपला की तो पत्र्याचा टिन तसाच फेकून द्यायचा, KFC, SPAR अशा दुकानातून घेतले खाद्य पदार्थ संपले की, तो कागदाचा टिन, तसाच रस्त्यावर टाकायचा, अगदी बाजूला Dust Bin असले तरीदेखील!! पण, नंतर जेंव्हा या गोऱ्या लोकांचे वागणे लक्षात येऊ लागले तशी मी, माझ्या सवयींना मोडता घातला. एवढेच कशाला, अगदी इथली मंदिरे,(यात चर्च, मशीद व आपली देवळे, सगळी आली!!) देखील अशीच झाडून पुसून ठेवल्यासारखी स्वच्छ आणि सुंदर असतात. कितीही गर्दी झाली तरी घाण म्हणून काही होत नाही. मला वाटत, हा मुळातल्या संस्काराचा भाग झाला. आपल्या लोकांवर असे संस्कार फारसे झालेच नाहीत. इथली हवा थंड असते, भारतासारखा लोकसंख्येचा बुजबुजाट नाही, असेही आणखी मुद्दे असतील तरीही जर का घाणच करायची असेल तर, ती कशीही आणि कधीही करता येते. सुदैवाने, अजूनतरी इथली स्वच्छता खरोखरच वाखाणण्यासारखीच आहे. अर्थात, अपवाद म्हणून, गलिच्छ बोळ, वस्त्या आहेतच.

डर्बनला Chatsworth येथे ESKON या संस्थेचे फार मोठे मंदिर आहे, तसेच इतर ठिकाणीही, लहान, मोठी बरीच मंदिरे आहेत. पण, प्रत्येक ठिकाणी, स्वच्छता हा पहिला भाग आणि नंतर शिस्त हीं नेहमीच अनुभवायला मिळाली आहे. हे आपले मंदिर आहे आणि हे आपणच स्वच्छ ठेवले पाहिजे, हीं जाणीव या लोकांच्यात मुरलेली आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या इथली मंदिरे डोळ्यासमोर आणावीत.

वास्तविक, मी पक्का “नास्तिक” आहे, म्हणजे अगदी कर्मठ नास्तिक नव्हे, प्रसंगपरत्वे, मी देखील देवळात जाऊन मूर्तीला नमस्कार करतो. पण, मुळात देवळात जावे आणि शांतपणे चार क्षण घालवावेत, अशी इथली मंदिरे, आपली मनोकामना नेमकेपणाने पूर्ण करतात.

इथे गलिच्छ वस्त्या तर जरूर आहेत. अशा वस्त्यांना इथे Location असे म्हणतात. अशा वस्त्या, साधारणपणे, शहराबाहेर, आडरस्त्यावर असतात. बहुतांशी काळ्या लोकांच्याच अशा वस्त्या असतात. एखाद्या सडलेल्या अवयवाप्रमाणे या वस्त्या शहराचे रूप, कुरूप आणि दुर्गंधी करतात. असो, त्याबद्दल मी पुढील लेखात जरा विस्ताराने लिहीन.

-अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..