“आजकाल प्रत्येकाला आयुष्यात जशी SPACE महत्वाची वाटते …..तीच SPACE मराठी व्याकरणात / लिखाणात देखील तितकीच महत्वाची आहे……..
दोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “”ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार”” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम …
बऱ्याच जणांनी आजवर ….स्वच्छ तारा खा , शांत तारा खा , येथे कचरा टाकून ये ….असे अनेक विनोद ऐकले / वाचले असतील ……ते याच चुकीच्या ठिकाणी असलेल्या SPACE मुळे …
अजून एक ऐकीव किस्सा आहे ………….. एक प्रसिद्ध व्यक्ती आजारी असताना त्यांना भेटायला जाऊन आलेल्या एका पत्रकाराने बातमीसाठी मजकूर लिहिला …तो असा … “आम्ही श्री. …..ना भेटावयास गेलो असता ते गाढव शांतपणे झोपले होते”” ….. वास्तविक वाक्यात “ते गाढ व शांतपणे झोपले होते” ……….असं अपेक्षित होतं ..पण इथे SPACE दिलीच नाही … लिखाणातल्या ह्याच SPACE चा त्याच्या वाचनाच्या वेळेस PAUSE होतो ….आणि या PAUSE च्या कमी-जास्त किंवा चुकीच्या वापरामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो …
प्रसिद्ध निवेदक स्वर्गीय भाऊ मराठे नेहमी एक किस्सा सांगायचे …. शुक्रतारा, मंद वारा या गाण्यातल्या ओळी……..
“लाजऱ्या माझ्या फुला रे … गंध हा बिलगे जीवा…….
अंतरीच्या स्पंदनाने …..अन्.. थरारे ही हवा”….
या ओळी गाताना काही “हौशी” गायक पुरेश्या अभ्यासाअभावी “अन्” आणि “थरारे” या शब्दात आवश्यक एवढा PAUSE न घेताच गायचे आणि ती ओळ लोकांना “अंतरीच्या स्पंदनाने “अंथरारे” ही हवा”…. अशी ऐकू यायची …. मग श्रोते बहुतेक शाल अंथरून घेत असावेत …
अंधुकसं आठवतंय ….आमच्या लहानपणी बाबा आमटे यांच्यावर एक Documentary होती ……. त्यातले निवेदक म्हणायचे ….””बाबा आमटे…कुष्ठरोगी ……………………PAUSE…………. निर्मुलन केंद्र चालवतात”” …… पण प्रत्यक्षात म्हणायचं होतं………….. बाबा आमटे…………PAUSE…………. कुष्ठरोगी निर्मुलन केंद्र चालवतात ……… इथे PAUSE चुकीच्या ठिकाणी घेतला आणि अनावश्यक लांबवला सुद्धा ..
कधी कधी या PAUSE चे विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात ….
मी कशी दिसते ?? किंवा एखादा पदार्थ “कसा झालाय”??? या “बायकोने” विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जर चुकून “मोठा PAUSE” घेतला तर संपलच ना मग सगळं …………
अर्थात हे सगळं विनोद निर्मिती होतेय, मजेशीर अनुभव येतायत तो पर्यंत ठीक पण चर्चा, संभाषण , गप्पांच्या ओघात ते अगदी भांडणात सुद्धा , अनावश्यक किंवा चुकीच्या PAUSE मुळे गैरसमजातून नातेसंबंधावर परिणाम होणार नाही याची मात्र काळजी घ्यायलाच हवी ….
तेव्हा व्याकरण असो वा आपलं आयुष्य ………… SPACE आणि PAUSE “”घेणं”” जितकं महत्वाचं आहे तितकंच ते “योग्य वेळेस” , “योग्य ठिकाणी ”आणि “योग्य कालावधी” साठी घेणं हेही तितकंच महत्वाचं ……….
© क्षितिज दाते.
ठाणे.
छान माहिती
छान माहिती सर