मी कधीही माहेरी गेले की माझी पंच्यांयशी वयाची आई माझ्या अवती भवती घुटमळत असते. आधी माझ्या गालांवरून हात फिरवून घेते, नंतर माझ्या ओढणीचं टोक तरी चाचपते. मी आपली तिचं कुशल विचारून भाचेकंपनीचे लाड करण्यात, भावावहिनीची चेष्टा मस्करी करण्यात मग्न असते.
आई तिथेच कौतुकाने मला न्याहाळत असते. माझ्या नव्या बांगडीला हात लावून बघते.
सुरूवातीला मला तिचं या वागण्याचा अर्थं कळायचा नाही.
पण हळू हळू तिच्या नजरेतली स्पर्शाची तहान मला स्पष्ट होत गेली.
स्पर्श जेव्हा दुर्लभ होतो तेव्हाच त्याचं महत्त्व कळतं.माझ्या वयाची सहा दशके ओलांडल्यानंतर मी जेव्हा स्वत:कडे बघते तेव्हा स्पर्शांची अनेक वाटावळणे शराराने पार केलेली दिसतात.
लहानपणात आईबाबांच्या स्पर्शसान्निध्यातच ऊबदार सुरक्षित वाटायचं. भावंडांचे लडिवाळ तर कधी हाणामारीचे स्पर्शही हक्काची विरासत होती.आजीच्या गोधडीतच नव्हे.,पार तिच्या सुरकुतल्या मऊ मऊ पोटात शिरून गोष्टी ऐकण्यात लाड होते.आत्या,काका यांनी धपाटे घातले तरी त्या स्पर्शातही माया होती. चांगलं काही केलं की त्यांनी पाठीवर फिरवलेला हात बक्षीस वाटायचा. मैत्रिणींशी तर गळ्यात हात टाकल्याशिवाय बोलता येतं यावर विश्वासच नव्हता.
वयात आल्यावर काही स्पर्श टाळण्याचे संकेत मनाने आपोआप दिले.काहींच्या बाबतीत घरच्यांचा खडा पहारा असायचा.पण एकंदरीने तेव्हा बाबा,वडीलधारी पुरूष मंडळी यांनी आपणहूनच आम्हा मुलींना करायच्या स्पर्शावर रेशन आणलं होतं.
मुंबईसारख्या शहरात लोकलच्या, बसच्या गर्दीत काही नकोनकोसे स्पर्श सहन करावे लागायचे तेव्हा जीवाचा चोळामोळा व्हायचा.बाबांच्या वयाचा एखादा सभ्य दिसणारा गृहस्थ शेजारची सीट मिळताच गर्दीचा फायदा घेऊन स्पर्शाचे ओंगळ शिंतोडे उडवायचा तेव्हा माणुसकीवरची श्रद्धाच उडायची.
लग्न ठरल्यावर आणि झाल्यावर तर स्पर्शाच्या आनंदाला फक्त उधाणच माहीत होतं.जोडीदाराच्या आश्वासक, प्रेमळ,प्रणयी, सहज, अशा सा-या चवी ओळखीच्या झाल्या.हव्याहव्याशा झाल्या.
मी आई झाल्यावर त्या नवजात रेशीमस्पर्शांनी नवा अर्थ आणून मला श्रीमंत केलं. मुलांचं सतत अंगाशी येणं, भूक भूक करीत हाताशी झोंबणं, लडिवाळपणे कमरेला विळखा घालणं,रात्री त्यांनी कुशीत झोपणं हे स्पर्श तेव्हा सवयीचे झाले. कधी कधी ‘बाजुला व्हा रे,किती अंगचटीला येता?जरा मोकळी राहू द्या ना मला ! ” असंही मी ओरडले त्यांच्यावर.
गंमत म्हणजे हेच मुलगे काॅलेजात जायला लागल्यावर,मिसरूड फुटल्यावर अंतर राखायला लागले. थोरला शिक्षणासाठी लांब होता.तो घरी आला की मला भरतं यायचं.मी त्याला कुशीत ओढायची. पापा घेऊ बघायची तर तो चक्क अंग चोरायचा. हंहं बास बास असं काही बोलून सुटका करून घ्यायचा.
मी हिरमुसायची. पण नंतर या प्रकारच्या दुराव्याची मनाला सवय लागली.
या उलट मुलगी असेल तर आपणहून बिलगते,गळामिठी घालते अशावेळा स्वत:ला मुलगी नसण्याची खंत उफाळून येते. कोणी कितीही समजावलं की सुना या मुलीसारख्या असतात वगैरे तरी मला ते मुळीच पटत नाही. सुना अदबीने वागतील,मोकळेपणे बोलतील,जीव लावतील पण अहो आईंना आपणहून बिलगणार नाहीत.त्यांच्या आईच्या गळ्यात जेव्हा त्या हात टाकतात तेव्हा मी माझ्या विहीणीवर चक्क जेलस होते. म्हणजे मी हून सुनांना जवळ घेतलं तर त्या मुलग्यांसारखं अंग चोरीत नाहीत,मला त्यांचे लाड करू देतात पण…. जाणवतंच काहीतरी..आतल्या आत…!
माझ्या बरोबरीच्या एका मैत्रिणीचा नवरा चार पाच वर्षांपूर्वी गेला. ती वरवर सावरलेली वगैरे. ब-याच दिवसांनी मी तिच्या घरी गेले होते. झोपताना गप्पा मारता मारता मी सहज तिच्या अंगावर हात टाकला तर तिचे डोळे भरून आले एकदम. माझा हात गच्च पकडत ती म्हणाली,”किती दिवसांनी असा कोणाचा स्पर्श मिळतो आहे गं! ”
तिच्या त्या व्याकुळ उद् गारात अर्थांचे डोंगर सामावले होते.मुला सुना नातवंडांच्या भरल्या घरात ती घासाला महाग नव्हती,पण स्पर्शाला मोताद होती.आपली कासाविशी मला कदाचित् हास्यास्पद वाटेल या भीतीने असेल तिने विषय बदलला पण माझ्या डोळ्यात चर्र दिशी अंजन गेलं.
मला माझ्या आईच्या स्पर्शाचा अर्थ लागला. माझ्या बाबांच्या निधनानंतर आईच्या भोवती नात्यांचा महासागर असूनही ती कोरडी होती. माझे भाऊ,वहिनी कर्तव्यात कमी पडत नाहीत पण साध्या स्पर्शाची तिची तहान कोणाला कळणारी नाही. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा साठीची झूल हटवून मी आईकडे पाहिलं, मी अजून भाग्यवंत आहे,मला आई आहे याचा साक्षात्कार झाला.
आता मी कधीही आईला भेटले की उमाळ्याने आईला मिठीत घेते.तिची जराजर्जर काया समाधानाने माझ्या हातात विसावते.
आईला भेटायला जाताना तिला काय भेट न्यावी हा प्रश्न पूर्वी पडायचा.आता नाही. मीच मला नेते.
— वैशाली पंडित
सौजन्य : पराग खोत
(उदय सप्रे यांच्याकडून – WhatsApp द्वारे)
वैशाली पंडित,तुमचा स्पर्श तृष्णा वरील व्हॉट्स ॲप लेख वाचला.खूप हृदयस्पर्शी आहे.ते वाचून स्पर्शाचे ज्ञान झाले.असेच लेखन वाचायला आवडेल.खूप खूप धन्यवाद.???
Phone number milel ka