नवीन लेखन...

स्पर्शतृष्णेची पाणपोई

एकेका लेखाचे भागधेय विलक्षण असते.

मी परवा रात्री फेसबुकवर स्पर्शतृष्णा लेख नेहमी प्रमाणेच माझ्या मित्रमैत्रिणींच्या वाचनार्थ पोस्ट केला.

सकाळी माझ्या  अमेय आणि सुयोग दोन्ही मुलांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया(ज्या माझ्यासाठी अनमोल आहेत.) आल्या आणि भरून पावले.
माझ्या नेहमीच्या मैत्रिणी,मित्र यांनीही भरभरून दाद दिली.हे सगळं खरंतर नेहमीप्रमाणेच झालं. मलाही त्यात माझ्या भावना मोकळ्या झाल्याने हलकं वाटलं होतं इतकंच.

पण इतकंच होणार नव्हतं.या पलिकडेही या लेखाने अजून काही अनुभव दिले.

काल दिवसभरात हा लेख फार वेगाने पसरला. अक्षरश: व्हाॅटसपवर ऐंशी नवीन लोकांचे माझा नंबर मुद्दाम मिळवून भरभरून अभिप्राय आले. मी थक्क झाले,सुखावले आणि तरी मनाचा एक कोपरा गलबलत राहिला.

अनेकांना आपल्या वृद्ध पालकांच्या तृषार्त नजरेचा अर्थ हा लेख वाचून समजला होता.एका गृहस्थाने आपल्या आईला हा लेख वाचून स्वत:ला अंघोळ घालायला सांगितली. त्याने लिहिलं की,माझ्या आईचा स्पर्श मला किती वर्षांनी होत होता. त्याच्या आईच्या चेह-यावर त्याने सुंदर हसू पाहिलं.

कोणाला दूर असलेला भाऊ आठवला,कोणाला लाड करणारा मामा आठवला.

कोणी आपल्या वडिलांचा सुरकुतला हात गालावरून फिरवून घेतला.
जवळजवळ प्रत्येकाने आपले स्पर्शाचे भांडार खुले केले.
यात कोणी जुन्या ओळखीचे निघाले,कोणी नवीन ओळखीचे झाले.
विशेष म्हणजे स्त्रियांपेक्षा हे कळवणा-या पुरूषांची संख्या जास्त होती.

हे ही समजू शकते एकवेळ. मी ही अनेकदा लेखकाला लेख आवडल्यावर काळजातून दाद दिलेली आहे. पण… अजून…

आज सकाळी  पावणेआठचा सुमार.
बेल वाजली म्हणून दार उघडलं.तर एक तिशीच्या आसपासची स्त्री दारात उभी. चेहरा दमलाघामेजलेला. श्वास फुललेला.
”तुम्ही वैशाली पंडित का?” तिने विचारलं.
”हो. आपण? या ना.. ” मी.

यावर एक नाही दोन नाही बाई माझ्या गळ्यात पडून धो धो रडायला लागली. मी गडबडले. बापरे,आता काय करू हिचं ?

”प्लीज शांत व्हा. मला समजत नाही काय चाललंय? कोण आहात तुम्ही? ”

नुसते हुंदके. मी पाणी आणायलाही जाऊ शकत नव्हते  इतकी गच्च गळ्याशी मिठी. मी सटपटलेच. काय काय आठवलं.एकटीदुकटी बघून झालेल्या दुर्घटना,हत्या. मेलेच म्हटलं बहुतेक. पण बाई सभ्य वाटत होती. चेहरा माझ्या मानेत घुसवलेला. काय कोणाचं सांगावं तरी ! कल्प विकल्प येऊन गेलेत मनात.

शेवटी आवाज चढवला.

”बाई गं,माझे आई,बोल काहीतरी. मी भीतीनेच मरीन इथे.कोण तू? का रडतेस?”
आता आपण काहीतरी विचित्र वागलो याचं भान मॅडमला आलं बहुतेक. माझ्यापासून दूर झाली. मी दाखवल्या खुर्चीवर बसली. पर्समधनं नॅपकीन काढून नाकडोळे पुसले.

” मी विनया राणे. माहेरची साखळकर. मी लांज्याहून आलेय. हायस्कूल टीचर आहे. मॅडम, मला माझ्या बहिणीने बेंगलोरहून तुमचा स्पर्शतृष्णा लेख पाठवला. मी दु:खाने वेडी झाले,मी माझ्या आईची शतश: गुन्हेगार आहे. ती खूप महिने अंथरूणावर होती. तिला बेडसोअर्स झालेले. आम्ही भावंडं तिला औषधे द्यायचो,नर्सपण ठेवलेली. पण तिच्या अंगाला येणा-या दुर्गंधीने आम्ही तिच्या जवळ थांबत नव्हतो.तिला स्पर्शपण नव्हतो करीत. नाकाला रूमाल लावून तिला हवं नको विचारायचो. तिच्या डोळ्यात नैहमी वेदना दिसायची.सतत पाणी वहायचं.हिला आम्ही सगळं काही देऊनच्या देऊनही हिची रड.असंपण आम्ही बडबडायचो.एकदाच मला आणि ताईला ती म्हणालेली,या गं जवळ बसा.मला जवळ घेऊ दे तुम्हाला. पण आम्ही अंग झाडून तिथून  काढता पाय घेतला. त्यानंतर आई गप्पच झाली. डोळेपण उघडीना. आता ती जाणार असं डाॅक्टरांनी पण सांगितलं.तिची सुटका होईल असंच सगळे म्हणत होते.शेवटी दोन दिवसांनी ती गेलीच. या गोष्टीला सहा वर्ष झाली. तुमच्या लेखाने मला मी किती नालायक मुलगी आहे असं वाटलं. माझी आई आमच्या स्पर्शासाठी आसुसली होती  आम्हाला ती शेवटचं कुरवाळू पहात होती आणि आम्हाला तिची फक्त घाण वाटत होती.  आम्ही पण आया झालोत पण तिची भावना नाही ओळखू शकलो. तिचा राग राग कैला, ती कधी जाईल असं म्हणत राहिलो.भयंकर शरम वाटली मला माझी. मी आज तुम्हाला नाही, तुमच्या साक्षीने माझ्या आईला मिठी मारली. ”

अश्रूच्या महापूरातून ती ओसंडत बोलत होती. साॅरी गं आई,माफ कर गं मला  म्हणत मला कवळत होती.

मी सुन्न.

थोड्या वेळाने ती सावरली.

जायला पाहिजे घरी. फक्त नव-यालाच माहीतीय मी आलेले. त्यांनीच पहाटे लांज्यातून येणा-या गोवागाडीत बसवून दिलंय. निघते.
माझा हात हातात घेतला.
मी मलाच आणलंय तुमच्यासाठी. तुमच्या लेखात आहे तसं.

ती थोड्याच वेळासाठी आली होती. मी माझा गृहिणीधर्म कसा निभावला,काय बोलले नाही आठवत.
इतकंच की ती निघून गेल्यावरही मी जागची हलू शकत नव्हते.  तिचा नंबर घेण्याचं भानही उरलं नाही,एवढी जागेवर खिळले होते.
माझ्या लेखाने माझ्या झोळीत जे जे टाकलं त्याची मोजदाद करायला जन्म पुरणार नाही.खरंच कुठे ठेव तरी मी हे संचित ?

— वैशाली पंडित

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..