नवीन लेखन...

मराठी पत्रकारितेतला ‘स्त्रीयोदय’ – नीला उपाध्ये

“१९६० च्या दशकात मराठी माध्यम आणि वृत्तपत्रांची संख्या मर्यादित होती त्यावेळी स्वाभाविकच या क्षेत्रात काम करणार्‍या मंडळीही कमी असणारच. त्याशिवाय पुरूषप्रधान क्षेत्र असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजता येती इतकं स्त्रीयांचा प्रमाण होतं. कदाचित या क्षेत्रात लागणारी धडाडी आणि प्रचंड जिद्द यासारख्या गुणांमुळे महिलांनी या माध्यमाकडे पाठ फिरवली असावी. पण तेव्हासुध्दा काही महिला व मुलींना चाकोरीबाहेरील व्यवसायात कारकीर्द घडवण्यात स्वारस्य वाटत; ज्या महिलांनी निश्चय केला त्या एकतर प्रचंड महत्वाकांक्षी व धाडसी स्वभावाच्या होत्या आणि अश्या महिलांना आपसुकच वेगळ्या वाटेवर आपलं व्यावसायिक जीवन घडवून अतुलनीय यशाची कामगिरी बजावता आली. निला उपाध्ये हे महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील असंच एक नाव जिनं आपल्या अजोड कामगिरीने माध्यम क्षेत्रात महिला म्हणून नवी क्रांती घडवून आणली व भावी पिढीसमोर आदर्श पत्रकार म्हणून प्रतिमा निर्माण केली. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या निला उपाध्ये पहिल्या महिला पत्रकार व पूर्णवेळ बातमीदारी करणार्‍या महाराष्ट्रातल्या प्रथम महिला होण्याचा बहुमान निला उपाध्ये यांना जातो.मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिल्या महिला कार्यवाह आणि उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष पदभार सांभाळला आहे. सामाजिकतंचं भान असल्यामुळे पत्रकारितेसोबतच साहित्य, समीक्षक, ललित, स्त्रीवादी लेखिका म्हणून आपली ख्याती निर्माण केली. नीला उपाध्ये यांचं विशेष गाजलेलं सदर म्हणजे “चित्रपश्चिमा”; राज्य तसंच राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांवर नाव कोरणार्‍या तडफदार , निर्भीड पण तितक्यच मितभाषी असलेल्या पहिल्या महिला बातमीदार व पत्रकार नीला उपाधयेंशी खास बातचीत फक्त मराठीसृष्टी.कॉम च्या ‘महाराष्ट्राच्या दिपशिखा’ या सदरासाठी…”

प्रश्न) तुम्ही ज्याकाळात पत्रकारिता केली तो काळ काणि आजच्या काळातील पत्रकारिता यामध्ये काय फरक जाणवतोय ?
नीला उपाध्ये : फरक तर खुपच पडला आहे कारण तेव्हा तंत्रज्ञानाचा अभाव होता. सर्व मजकूर हाताने लिहून द्यावे लागत. एखाद्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची असल्यास ती रेकॉर्ड करण्याची सोय नव्हती; त्यामुळे संकलन करताना सर्व बातम्या अगदी लक्षपूर्वक ऐकाव्या लागत. त्याशिवाय मी ज्यावेळी या क्षेत्रात आले तेव्हा केवळ दोन-तीन महिलाचं या क्षेत्रात कार्यरत होत्या आणि त्यांच काम म्हणजे “टेबल वर्क” अश्या स्वरुपाचे होते. त्यामुळे पूर्णवेळ बातमीदारी करणारी मी पहिली महिला पत्रकार होते. आज बर्‍याच प्रमाणामधये मुली आपली कारकीर्द घडवण्यासाठी या क्षेत्राची वाट निवडताहेत.हे पाहून निश्चितच एक आनंदाची भावना मनामध्ये आहे.
प्रश्न) पत्रकारिता करताना एक स्त्री म्हणून तुम्हाला कोणत्या अडचणी आणि मर्यादा जाणवल्या ?
नीला उपाध्ये : खरंतर स्त्री म्हणून मला माझ्या सककार्‍यांकडून व वरिष्ठांकडून खुप सन्मानाची आणि सहकार्याची वागणूक मिळाली. त्याशिवाय मी सर्वप्रकारच्या “न्यूज बिट्स” मध्ये कामे केली. मर्यादा मला आल्या म्हणण्यापेक्षा एक स्त्री म्हणून मला जे काम करता आलं ते केल्याचं समाधान आहे. कारण आश्या अनेक बातम्या व प्रश्न आहेत ज्या केवळ स्त्री पत्रकार म्हणून मला उत्तमप्रकारे मांडता आल्या मग त्यामध्ये महिलांचे मुद्दे असतील किंवा शोध पत्रकारितेसारखे .मी अनेक बातम्या मांडल्या व लोकांपर्यंत पोहचवल्या कधीतरी माझ्या बातम्याची नोंद घेतली गेली तेव्हा आपल्या कामाचं चीज झालयं असे वाटे .
प्रश्न) सध्या मुली दिवस-रात्र या क्षेत्रात कामे करताहेत तर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहता ?
नीला उपाध्ये : मी ज्यावेळी काम करत होते तेव्हापण सुरक्षेचा प्रश्न होताच ! मी सुध्दा बातम्यांच्या संकलनासाठी अनेकदा इतर राज्यात दौरे केलेले आहेत. पण आज जे काही चालले आहे तशी परिस्थिती त्यावेळी नक्कीच नव्हती. आज स्त्रीयांवर होणार्‍या शारिरीक व मानसिक अत्याचाराला कारणीभूत आहेत ढासळलेली नितिमत्ता, अशासन आणि सामाजिकतेचा अभाव! पण काही अपवाद वगळता मी एक नक्की सांगू शकते की महाराष्ट्रात पत्रकार त्या तुलनेने खुप सुसक्षित आहेत.मुलींना मी इतकचं सांगेन की अपरात्री घरी परतताना खबरदारीचे जे काही उपाय आहेत त्याची माहिती करून घ्या.तज्ज्ञ मंडळींसोबत चर्चा करा. नको तिथे विनाकारण धाडस दाखवण्याचा प्रयत्न करू नका पण सावधगिरी बाळगा इतकेच सांगेन.
प्रश्न) सध्या या क्षेत्रामध्ये कारकीर्द घडवू पहाणार्‍या मुला-मुलींविषयीचं तुमचं निरीक्षण काय आहे ?
नीला उपाध्ये : एकतर आजची पिढी खुप कमी वाचन करते; वाचनाच्या अभावामुळे लिहिताना अनेक अडचणी येऊ शकतात.कारण शब्दच जर तुम्हाला सुचले नाहीत तर ते लिहिणार काय ? आपल्याला प्रसिध्दी मिळेल अश्या उद्देशाने या माध्यमाकडे वळू नये;आज या क्षेत्रात दाखल होणार्‍या पत्रकाराला असे वाटते की आपल्याला बायलाइन मिळायला हवी. याबाबत मी सांगेन की पत्रकारिता हा व्यवसाय असून त्यासाठी सामाजिक बांधीलकीची आस मनामध्ये असावी लागते त्याची कमतरता आजच्या पिढीत असल्याचं मला ठामपणे वाटते.
प्रश्न) एखादी अशी बातमी न विसरता येण्यासारखी जिचं संकलन तुम्ही केलयं ?
नीला उपाध्ये : अनेक बातम्या आहेत पण त्यातली एक बातमी जिचा उल्लेख आवर्जून करेन ती म्हणजे विधानपरिषदेत लक्षवेधी सुरू होती आणि बलात्काराबाबतचं एक निवेदन वाचून दाखवण्यात येत होतं. तर कायद्याने बालात्कारीक पिढीतेचे खरं नाव वाचुन दाखवायचे नाही असा नियम आहे पण त्यावेळी राज्यमंत्री नवीन असल्यामुळे त्यांना ही बाब त्यांना पण लक्षात आली नाही.आणि सभागृहात चर्चेच्या बदल्यात अनेक आमदार आणि नेतेमंडळींच्या गप्पा सुरु होत्या.पण त्याच्यवेळी ही गोष्ट मी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. जर त्यावेळी महिलेचं खरं नाव वाचण्यापासून मी त्यांना थांबवले नसते तर कदाचित त्या महिलेची विनाकारण बदनामी होण्याची शक्यता होती. विधीमंडळात लक्षपूर्वक केलेल्या संकलानामुळे इंग्रजी वृत्तपत्राने सुध्दा माझ्या कामाची दखल घेतली होती. दुसरी बातमी म्हणजे “ शिवाजीपार्क येथे ख्रिश्चन धर्मीयांची मोठी सभा होती आणि त्यावेळी पोप देखील या कार्यक्रमाला हजर होते तर या बातमीला थोडे कल्पक;आणि हुबेहूब पध्दतीने मांडल्यामुळे वाचकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता; तर अश्या अनेक घटना आहेत ज्याचा ‘बातमी मागची बातमी’ दिल्यामुळे माझे कौतुक झाले होते”
प्रश्न) “ स्त्रीवादी लेखन ”सुध्दा तुम्ही अनेक वर्ष करत होता तर एक स्त्री म्हणून आपण महिलांच्या कोणत्या प्रश्नाला वाचा फोडल्याचं समाधान आहे ?
नीला उपाध्ये : स्त्रीयांवर होणार्‍या अपमानाबद्दल मी नेहमीच आवाज उठवला. एक प्रसंग तुम्हाला सांगते मी मंत्रालय आणि विधीमंडळाचे “बीट” अनेकदा सांभाळले आहे, तर एकदा मला असे दिसून आले की विधीमंडळात ड्युटी वर असणार्‍या महिला पोलीसांना जेवायला देखील बसण्याची सोय नव्हती तिथल्या बाथरुमच्या आवारात बसुन त्या जेवायच्या तर त्याना विचारल्यावर कळले की वेगळी सोय नसल्यामुळे त्यांना अश्याप्रकारे ड्युटी करावी लागतेय आणि ही गोष्ट मला खुप खटकली व तत्काळ मी ही बाब विधान परिषदेचे अध्यक्ष जयंतराव टिळक यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यांनी या घटनेला प्राधान्यक्रम देत लगेचच मागणी मंजूर करुन घेतली.
तसंच एका रेल्वे पोलीसांच्या पत्रकार परिषदेत मी “ महिलांच्या डब्यासमोर पोलीसांचा बाक नसल्याची घटना त्यांच्या नजरेस आणून दिली व प्रत्येक स्थानकात एकतरी रेल्वे पोलीस असावा अशी विनंती केली ” आणि कालांतराने त्याची अंमलबजावणी करण्यात आली. तर अश्या अनेक मुद्यांना वाचा फोडल्याचं समाधान निश्चित आहे.
प्रश्न) आज वयाच्या सत्तरीत देखील या क्षेत्रात अगदी हरहुन्नरीने कार्यरत आहात तर सध्याचा तुमचा दिनक्रम कसा सुरू आहे ?
नीला उपाध्ये : सध्या अनेक मासिक, वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन सुरू आहे. चित्रपटांच्या सेंसॉर बोर्डावर मी सदस्य आहे, सांस्कृतिक क्षेत्रात विविध पदांवर परिक्षक म्हणून काम पहात आहे ,तसंच मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागात समन्वयक विद्याथर्यांना शिकवणं सुरु आहे,आणि दर वर्षाला एकतरी पुस्तक प्रकाशित करायचं असा माझा मानस आहे.
प्रश्न) एक यशस्वी पत्रकार होण्याचे श्रेय तुम्ही कोणाला देता ?
नीला उपाधये :सर्वात आधी माझे गुरु दि.वी गोखले , ताम्हणे आणि माझे पती वसंत उपाध्ये आणि माझ्या सासर्‍यांनी पण खुप सांभाळून घेतले त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचू शकले.

संपादक – निनाद प्रधान

तांत्रिक सहाय्य – सुमित्र माडगूळकर

संकल्पना, निमिर्ती व संकलन – सागर मालाडकर

छायाचित्र संकलन – पुजा प्रधान आणि सागर मालाडकर

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..