नवीन लेखन...

सृजनशील दिग्दर्शक विजय राणे

एन् डी स्टुडिओमधील शनिवार वाड्याचा सेट. रात्रीची शांत वेळ. कुठेही आवाज नाही. लगबग नाही. तणाव नाही. सर्वत्र समाधानयुक्त शांतता. काशीबाईसाहेबांना भेटायला मस्तानी येत आहेत, हा प्रसंग! दोघीही पहिल्यांदाच एकमेकींसमोर!

दिग्दर्शकाचा घनगंभीर गहरा आवाज – “ कॅमेरा रोलिंग साऊंड आणि अॅक्शन!” तेवढ्यात दिग्दर्शक थांबवतात- “अरे, काशीबाईंच्या खोप्यातील केयूरे नीट करा, मागची मशाल मंदावलीय, ती पुन्हा तेववा!!” संवाद सुरू होतात, दिग्दर्शक मध्येच थांबवतात- “ स्मिता. . . ,”

“हो, सर आलं लक्ष्यात.” पुन्हा त्याच आदेशांची देवाण आणि शॉट ओके. मग मस्तानीचा क्लोज अप- “बाईजी . . .” संवाद सुरू. फायनल टेकच्या वेळी दिग्दर्शक विजय राणेंचा आवाज, “ प्रचिती, डोळे मोठे ठेव!!” शॉट ओके.

रात्री साडेनवास पॅक अप. दिवसभराच्या घाईगडबडीनंतर विजय राणे एका बाजूस शांतवतात. त्यांच्या बाजूला प्रॉडक्शन कंट्रोलर अतुल चावरे बसतात. लगेच दुसर्‍या दिवसाच्या लाईन अपची चर्चा सुरू.

दिवसभर शूटिंग करून थकलेल्या अंगद म्हसकर, स्मिता शेवाळे आणि प्रचिती म्हात्रे आपल्या दिग्दर्शकाविषयी बोलायला उत्साहाने तयार!! प्रचिती अत्यंत आदराने बोलू लागते- “माझी ही पहिलीच मालिका. किंबहुना मी कॅमेर्‍्यासमोर पहिल्यांदाच आले. दादांनी (निर्माते नितीन देसाई) व राणे सरांनी माझी निवड केली आणि माझं ट्रेनिंग सुरू झालं. मस्तानी करायचं दडपण होतंच. हॉर्स रायडिंग वगैरेचं ट्रेनिंग सुरू झालं. प्रत्येक वेळी विजय सरांनी माझ्यासमोर कॅमेरा लावून त्याची भिती दूर केली. माझा पहिलाच शॉट होता, आणि विजय सरांनी माझं घाबरलेलं मन जाणलं. त्यांनी मस्तानी पळत पळत येते हा शॉट घेतला, संवाद दिलेच नाहीत. मग हळू हळू शूटिंग सुरू केलं. मला अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. मघाशी तुम्ही ऐकलं ना की, ‘प्रचिती, डोळे मोठे कर’ असं सर म्हणाले, ते एवढ्यासाठी की हसताना किंवा रडताना, माझे डोळे बारीक होतात

आणि मग त्यातील भाव दिसत नाहीत. पहिल्या दिवसापासून आज शेवटच्या दिवसापर्यंत सर न चुकता मला आठवण करून देतात. त्यांना कंटाळा तो नाहीच. कलाकाराला कंफर्टेबल कसं करायचं ते त्यांना विचारावं. ते या क्षेत्रातील माझेच नव्हे तर, अनेकांचे गुरू आहेत. मालिकेच्या प्रारंभी माझे आई-बाबा इथे स्टुडिओत राहिले होते, पण दोनच दिवसांनी ते परत गेले. जाताना म्हणाले, की इथे विजय राणे आहेत, तुझी काळजी नाही.”

स्मिता शेवाळे म्हणाली, “नेहमी पडद्यावर आम्ही दिसत असतो, पण आम्हाला घडवणारी माणसं कधीच रसिकांसमोर येत नाहीत. आज मला राणे सरांबद्दल बोलायला मिळते, हे माझे भाग्य. मी अनेक चित्रपट केले, मालिका केल्या, नाटकात कामं केली. दिग्गजांनी मला दिग्दर्शन केले, पण बाजीराव-मस्तानीच्या निमित्ताने मी इथे येते, तेव्हा किती रिलॅक्स वाटतं सांगू. नितीनदादांनी आमची पूर्ण काळजी घेतली, तर राणे सरांनी आम्हाला सांभाळून घेतलं. त्यांना कलाकारातील सर्व गुण त्याच्यातील कपॅसिटीज ओळखून त्याच्यातील सर्वोत्कृष्ट कसं बाहेर काढायचं याची कला अवगत आहे. कलाकाराला ते मेंटली खूप रिलॅक्स ठेवतात. जर आपण टेक्निकल गोष्टींना तयारीसाठी पूर्ण वेळ देतो, तर तसा वेळ आपण आपल्या कलाकाराला तयार व्हायलाही दिला पाहिजे असा, त्यांचा आग्रह असतो. लाईट, कॅमेरा, सेट, मेक अप या सार्‍यानंतर ते मला विचारतात, ‘तू तयार आहेस का?’ हे फार महत्वाचे. आम्ही कलाकार जोवर तयार नसतो, तोवर ते थांबतात. त्यांच्या मनात आपली प्रत्येक फ्रेम अगदी तयार असते. कोणता शॉट कसा घ्यायचा याचं होमवर्क पक्कं असतं. त्यामुळे आम्हा कलाकारांना त्यांच्याबद्दल विश्वास वाटतो.”

बाजीरावाची भूमिका करणारा अंगद म्हसकर आदरानं विजय राणे यांचा ‘गुरू’ म्हणून उल्लेख करतो. “पण तरीही मला त्यांचा धाक कधी वाटला नाही. ते नेहमी मित्रत्वाच्या नात्याने माझ्याबरोबर वागले. मालिकेमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, विभाग असतात, पण त्यांना एक टीम लीडर लागतो. तो अत्यंत कुशल टीम लीडर, राणे सरांमध्ये आहे. आमच्या सेटवर कधीही कल्ला नसतो, गडबड गोंधळ नसतो. कारण, त्यांना नेमकं काय करायचं हे माहित आहे. मला बाजीराव समजावून देताना त्यांनी बाजीराव ही व्यक्ती आहे, जरी ते लार्जर दॅन लाईफ आहेत, तरीही ते एक माणूस आहेत असंच समजून वाग असा मला सल्ला दिला. त्यामुळेच मी बाजीरावांचं मन समजून घेऊन त्यांना साकारू शकलो.” स्मिता, प्रचिती, अंगद भरभरून बोलत होते. पॅक अप झाल्यावरही आपल्या दिग्दर्शकाबद्दल बोलण्याचा त्यांचा उत्साह संपत नव्हता.

विजय राणे हे अत्यंत शांत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये आत्मविश्वास असतो. शब्द आणि क्षण ते अजिबात वाया घालवत नाहीत. श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी या मालिकेपूर्वी त्यांनी राजा शिवछत्रपती, नस्ती उठाठेव यासारख्या मालिका केल्या आहेत. आपल्या आधीच्या यशस्वी मालिकांबद्दल/ चित्रपटांबद्दल ते फारसे बोलत नाहीत. बाजीराव-मस्तानी मालिकेबद्दल बोलताना ते सांगतात, “ही मालिका मला करायचीच होती. कारण इतिहासाची ही गौरवशाली पानं काहिशा पूर्बग्रहदूषित दृष्टिकोनातून पाहिली जातात. मस्तानी ही कंचनी नव्हती, ती कोठेवाली नव्हती. अहो, मागे मी एका तृतीय पंथीय व्यक्तीची मुलाखत पहात होतो, ती व्यक्ती म्हणाली मला पुढच्या जन्मात मस्तानी होऊन तिच्यासारखा कोठा काढायचा आहे. मी अस्वस्थ झालो. मस्तानीवर हा अन्याय आहे. आणि जेव्हा दादांनी (नितीन देसाई) या मालिकेचा प्रस्ताव ठेवला तेव्हा मी तो लगेच स्वीकारला त्यामागे ही कारणं होती. दादांच्या चंद्रकांत प्रॉडक्शन्सचं पेपरवर्क पक्कं असतं. त्यांच्याकडे १२० जणांची संशोधन करणारी एक टीम आहे. त्यांनी भरपूर संशोधन केलेलं होतं. मालिकेचा आराखडा ठरला होता. लेखक प्रताप गंगावणे यांच्यासोबत बैठकाही झाल्या. दादा, मी आणि गंगावणे अशा आमच्या एकत्र चर्चा खूप झाल्या. बाजीराव हा मद्यपी नाही, बाईलवेडा नाही. तो शूर आहे, पराक्रमी आहे.

तो आयुष्यात एकही लढाई हरला नाही. मस्तानी ही राजा छत्रसाल यांची मुलगी आहे. तिला सन्मान आहे. बंगशपासून मला वाचवा असा छत्रसालाचा निरोप आल्यावर हातातली भाकरही न संपवता बाजीराव मोहिमेवर निघतो व अवघ्या चाळीस दिवसांत त्याच्या मदतीला पोचतो, हा इतिहास आहे. बंगशचीही तशी अपेक्षा नसते. तो पराभूत होतो. अशा पराक्रमी पुरुषास काय द्यावं म्हणून विचार करताना छत्रसाल, त्याला आपली कन्या आणि मोठी जहागीर देतो. तु्म्हाला गंमत माहिती आहे? बाजीरावांचं व मस्तानीचं लग्न खांडा पद्धतीनं झालं होतं. मस्तानीचं त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या तलवारीशी लग्न लागलं होतं. पण छत्रपती शाहू महाराजांशी इमान असणारे बाजीराव पेशवे मस्तानीसह पुण्याला परततात. या मालिकेत आम्ही मानवी नात्यांवर भर दिला. बाजीराव-मस्तानी, बाजीराव-चिमाजी, बाजीराव-छत्रपती, बाजीराव-काशीबाई, बाजीराव-मातोश्री, बाजीराव-अन्य राजकारणी अशा वेगवेगळ्या संबंधांवर आम्ही लक्ष केंद्रित केलं. खरं म्हणजे, बाजीराव-मस्तानी यांच्यातील नात्याचा शोध म्हणजे जनरेशन गॅपचा शोध असं आम्हाला जाणवलं. बाजीराव मस्तानीच्या प्रेमात होते, म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबाचा त्याग केलेला नव्हता, काशीबाईंना मस्तानीच्या आगमनानंतर मुलं झाली होती. बाजीराव मस्तानीकडे अधिक लक्ष कदाचित देत असावेत कारण तिला माहेर नव्हतं, ते खूप दूर होतं. तिला आधार देणं त्यांचं कर्तव्य होतं, हे आम्ही दाखवलं. बाजीरावांच्या आयुष्यात प्रचंड नाट्य होतं. या मालिकेत आम्ही दरबारी राजकारणही मोठ्या प्रमाणात दाखवलं. कारण सभोवताली विपरित परिस्थिती असतानाही बाजीराव त्या परिरस्थितीविरुद्ध उभे राहतात व मोठे होतात. थोर माणसं परिस्थितीशरण नसतात, ते परिस्थितीला शरण आणतात. बाजीराव तसे होते. त्यांच्याजवळ छत्रपती शिवरायांचे स्वराज्य थेट दिल्लीला टेकवण्याची जिद्द होती. पण त्यांना दुर्दैवाने कमी आयुष्य लाभलं. अन्यथा इतिहास काही वेगळा असता. आजवर लिहिला गेलेला इतिहास हा भूमिका घेऊन लिहिला गेला आहे. माझ्या अभ्यासात मला जाणवलं की, इतिहासाला भूमिका नसावी, अभ्यासकाला इतिहासाने ती द्यावी. इतिहास निरपेक्ष असावा, निर्लेप असावा. बाजीरावांकडे पाहताना आपला इतिहास भूमिका घेतो, जी त्यांच्यावर अन्याय करते. दादांनी, मी आणि गंगावणे सरांनी सातत्याने ही भूमिका स्वीकारली.”

या मालिकेने पुन्हा एकदा इतिहास घडवला. ती अतिशय लोकप्रिय झाली. जगभरातून तिच्याविषयी अनुकूल अभिप्राय येतात. मालिकेतील कलाकारांना, दिग्दर्शकांना, मालिकेला पुरस्कार मिळत आहेत. आनंदोत्सव सुरू आहे. विजय राणे सांगत होते, “परवाच थोर लेखक जयसिंगराव पवारांचा फोन आला, मी तुमच्यावर रागावलोय, कारण त्यांना यूरोपच्या टूरमध्ये या मालिकेविषयी कळलं, मी त्यांना काहीच बोललो नव्हतो. खरं सांगू का, मी या सार्‍्यापासून अलिप्त असतो. मी एक्साईट होत नाही. तशी मनाला सवयच लावून घेतली आहे. कारण आपण जरा एक्साईट झालो, की आपलं आपल्या कामावरचं लक्ष उडतं. कितीतरी वेळा गंगावणेसाहेबांचा फोन येतो, ‘तुम्ही ही गोष्ट चांगली दाखवली.’ मी शांतपणे सांगतो, ‘पुढच्या सीनविषयी आपण बोलू या का? तो मला असा असा हवा आहे.’ आज या मालिकेनं मला समाधान दिलं. आमच्या निर्मात्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. दादांचा मी ऋणी आहे. त्यांचे भव्य सेट्स एक्स्पोज करताना आमचं कसब पणाला लागायचं. मस्तानी महालात धावत येतात, त्यावेळी आम्ही आख्खा सेट एक्स्पोज करू शकलो.”

निर्मिती नियंत्रक अतुल चावरे आपल्या दिग्दर्शक मित्राबद्दल बोलतात की, “विजय राणे यांनी प्रचंड मेहनत करून ही मालिका यशस्वी केली.” विजय राणे यांचे काही काळ सहाय्यक दिग्दर्शक असणारे कलाकार राहुल वैद्य यांनी ‘एक अद्भूत व्यक्ती’ म्हणून राणेंचा उल्लेख केला, “नवोदितांसाठी विजय राणे हे एक कलाविद्यापीठ आहे” असं त्यांनी मत मांडलं; तर मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे आपल्या दिग्दर्शकाबद्दल अभिमानानं बोलतात, “हा माध्यम न सोडणारा दिग्दर्शक आहे. मालिका लोकप्रिय होताना दिग्दर्शक प्रेक्षकशरण वा अभिनेताशरण होण्याचा धोका असतो, पण विजय राणे तसे नाहीत.”

आपल्या दिग्दर्शकाबद्दल प्रतिक्रिया देताना नितीन देसाई अत्यंत समाधानाने बोलतात, “विजय राणे हा माझ्या हृदयातील माणूस आहे. तो साधा आहे, त्याच्या गरजा फारशा नाहीत, वरकरणी तो शांत वाटतो, पण तो अंतर्यामी प्रचंड विचारी आहे. राजा शिवछत्रपती मालिकेतील त्याचं कार्य थोर आहे, म्हणूनच या मालिकेकरिता माझ्यासमोर त्याचंच नाव पटकन आलं. त्यानं आमच्या मनातला बाजीराव साकार केला. यानंतर मी महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णपानं, जशी संतपरंपरा, साकारण्याचा प्रयत्न करणार आहे, माझ्या त्या प्रयत्नाचा तो अविभाज्य भाग असणार आहे.”

आपल्याबद्दल एवढी भरभरून स्तुती का केली जाते याचं विजय राणे यांना कुतुहल वाटतं. हे कुतुहलच त्यांच्यातील सृजनशील दिग्दर्शक कायम ठेवतं.

— नीतिन आरेकर,
कर्जत-रायगड
Email – nitinarekar@yahoo.co.in

 

डॉ. नीतिन आरेकर
About डॉ. नीतिन आरेकर 19 Articles
प्रा. नीतिन आरेकर यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून बरंच समीक्षात्मक, संशोधनपर लेखन केलेलं असलं तरीही त्यांची ओळख शब्दांकनकार म्हणून अधिक आहे. श्री. नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो. त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..