सेंट फ्रान्सिस झेविअर यांचा जन्म ७ एप्रिल १५०६ रोजी स्पेनच्या नवा या प्रांतात तत्कालिन राजघराण्यात झाला.
फ्रान्सिस झेविअर यांनी पॅरिसला जाऊन सेंट बार्बेस विद्यापीठातून एम.ए.पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. ज्या विद्यापीठात त्याचं शिक्षण झालं होतं, तिथेच त्याला प्राध्यापकाची नोकरीही मिळाली होती. तथापि, झेव्हियर यांचा अधिक कल अध्यात्माकडे होता. पंधराव्या शतकात युरोपीय देशात विशेषत: पोर्तुगालमध्ये वसाहतवाद आणि व्यापार या बरोबरच धर्मप्रसाराला राज्यकर्ते अधिक प्रोत्साहन देत असत.
पोर्तुगालने १५४० मध्ये व्हॅटिकन सीटीचे पोप यांना आपल्या भारतीय वसाहतीत धर्मप्रसाराचं काम करण्यासाठी दोन धर्मप्रसारक हवे असल्याची विनंती केली. त्यानुसार पोपनी दोन मिशनऱ्यांना भारतात पाठवण्याचं ठरवलं, मात्र ऐनवेळी त्यांपैकी एक आजारी पडल्याने त्यांच्या ऐवजी फ्रान्सिस झेव्हियर यांना भारतात पाठवण्याचं ठरलं. ७ एप्रिल १५४१ रोजी फ्रान्सिस झेव्हियर यांनी ‘सांतियागो’ या बोटीनं गोव्यात येण्यासाठी पोर्तुगालहून प्रस्थान केलं. वाटेत मोझांबिक या तत्कालीन पोर्तुगीज राजवट असलेल्या देशात काही काळ थांबून तिथे धर्मप्रसाराचं काम करून फ्रान्सिस ६ मे १५४२ रोजी गोव्यात पोहचले.
गोव्यात आल्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या विस्ताराचं ‘न भुतो..’ असं कार्य करून धर्मविस्तार केला. त्यामुळेच त्यांना पुढे संतपद (सेंट) हे पद बहाल करण्यात आलं व त्यांना ‘गोंयचो सायब’ हे बिरूदही लागू झालं. १५४७ च्या डिसेंबरमध्ये फ्रान्सिस झेव्हियर धर्मप्रसारासाठी जपानला गेले. १५४८ मध्ये ते पुन्हा गोव्यात आले. एप्रिल १५४९ मध्ये ते पोर्तुगालला गेले. तिथून पुन्हा जपान, चीन आणि अन्य काही देशांचा प्रवास करत १५५२ मध्ये त्यांनी पुन्हा गोव्यात पाय ठेवले. पुन्हा त्याच वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात ते चीनला गेले. धर्मप्रसाराच्या वैशिष्टय़पूर्ण ‘कले’मुळे त्यांनी तिथेही धर्मप्रसाराचं नेत्रदीपक काम केलं, त्यामुळे चीनसारख्या देशातही त्यांना अमाप लोकप्रियता प्राप्त झाली. ‘जिझस ख्रिस्ताचा दूत’ असं त्यांना मानलं जाऊ लागलं. चीनमध्ये असतानाच साथीच्या तापानं गंभीर आजारी पडून शँगच्युन येथे ३ डिसेंबर १५५२ रोजी त्यांचं देहावसान झालं. कुशल धर्मप्रसारक म्हणून जगद्विख्यात झालेल्या झेव्हियर यांची मरणोत्तर कहाणीही मोठी अद्भूत आहे. शँगच्युन या चीनच्या प्रांतात दफन करण्यात आलेलं झेव्हियर यांचं शव त्याच्या मरणानंतर केवळ तीन महिन्यांत फेब्रुवारी १५५२ मध्ये जमीन उकरून बाहेर काढण्यात आलं आणि ते पोर्तुगालमधल्या मोलोको प्रांतातील दफनभूमीत नेऊन दफन करण्यात आलं. तिथून ते पुन्हा बाहेर काढून ११ डिसेंबर १५५३ मध्ये गोव्यात आणून जुनं गोवा येथे दफन करण्यात आलं. तिथून पुन्हा एकदा ते बाहेर काढून २ डिसेंबर १६३७ रोजी हे पार्थिव जुनं गोवा येथील आज ते जिथे ठेवण्यात आलं आहे, त्या ‘बॉँ जिझस’ चर्चमध्ये चांदीच्या शवपेटीत सुरक्षित ठेवण्यात आलं आहे.
इतर दिवशी ‘बॉँ जिझस’ चर्चला भेट देणा-या भाविकांना या पवित्र शवाचं दर्शन दुरूनच घेता येतं. मात्र दर दहा वर्षानी ते पार्थिव हजारो भाविकांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत त्या चर्चच्या समोरच असलेल्या ‘सेंट कॅथ्रेडल’ चर्चमध्ये ठेवण्यात येतं. चाळीस दिवस ते भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतं. या काळात विविध वेळी आणि विविध भाषांतील खास प्रार्थनासभांचंही आयोजन करण्यात येतं. केवळ ४६ वर्षाचं आयुष्य जगलेल्या फ्रान्सिस झेव्हियर यांनी धर्मप्रसाराचं अचाट कार्य केलं. त्यामुळेच चार शतकं उलटल्यावरही त्यांचा महिमा आजही टिकून राहिलेला आहे. सेंट फ्रान्सिसच्या पवित्र शवाचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून श्रद्धाळू भाविक आणि पर्यटकही मोठय़ा संख्येनं येतात. सेंट फ्रान्सिस झेव्हियरला आपल्या अडचणी सोडवण्यासाठी घातलेलं सांकडं पूर्ण होतं, अशी इथे येणा-या भाविकांची प्रगाढ श्रद्धा आहे. त्यातूनच दर दहा वर्षानी लक्षावधी आबाल-वृद्ध, महिला-पुरुष भाविकांचे पाय ‘गोंयच्या सायबा’चं जवळून दर्शन घेण्यासाठी जुन्या गोव्याकडे आपोआप वळतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply