रोख व्यवहार करताना बहुतेकवेळा आपण खूप घाईत असतो. नोटेची किंमत, नोट फाटकी किंवा रंग लागलेली नाही ना आणि ती खोटी नाही ना एवढे आपण पाहतो. त्याही पलीकडे या नोटांमध्ये अनेक गोष्टी दडलेल्या असतात. ओरिगामी कलेत शोभाव्या अशा विविध घड्या, प्रेमविव्हल शब्द, अमूर्त शैलीतील चित्रकला, वॉटरमार्कच्या पांढऱ्या जागी लिहिलेले विविध आकडे, संदेश इत्यादी दृष्य गोष्टी आणि मासळी ते उंची अत्तरापर्यंत विविध वास नोटांमध्ये आढळतात. काळा पैसा किंवा पांढरा पैसा असे अदृष्य प्रकारही नोटांमध्ये असतात पण आताच्या युगात जगातील कुठलीही वस्तू, व्यक्ती, शक्ती, व्यवस्था विकत घेण्याची पैशांची अमर्याद ताकत मात्र चकित करणारी आहे.
भारतीय नोटांना रिझर्व्ह बँकेकडून क्रमांक दिले जातात. नोटेवर मालिका आणि क्रमांक छापले जातात. त्यामुळे बँकेला प्रत्येक नोटेचा हिशेब ठेवता येतो. नोटेवर नोट धारकाला तेवढे पैसे देण्याचे अभिवचन छापलेले असते. एक रुपयाच्या नोटेवर अर्थ सचिवांची तर इतर सर्व नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते.
कधीकधी एखाद्या नोटेवर मालिका क्रमांकानंतर एक चांदणी आढळते. अशीच नोट नेमकी दुर्मिळ आणि म्हणून मौल्यवान ठरते. प्रत्येक नोटेवर क्रमाने क्रमांक छापले जातात. नंतर त्यांची काटेकोर तपासणी होते. या तपासणीत एखादी नोट सदोष आढळल्यास ती काढून टाकून त्या बंडलात अन्य नोट घातली जाते. साहजिकच त्या नोटेचा क्रमांक हा मूळ क्रमाशी विसंगत असतो. पण अशी नंतर घातलेली नोट अधिकृत आणि पूर्णपणे कायदेशीर नोटच असते. मात्र अशा तर्हेने नंतर घातल्या जाणाऱ्या नोटेच्या क्रमांकाआधी चांदणी (STAR) छापली जाते. बंडलाच्या वेष्टनावर, या बंडलामध्ये अशी चांदणीयुक्त नोट असल्याचा उल्लेख केला जातो.
एखादी वस्तू ही विजोड, दोषयुक्त, चुकीची, विद्रूप असेल तर त्याची किंमत जवळजवळ शून्य असते. पण टपाल तिकिटे आणि टपाल सामग्री, नाणी, नोटा अशा गोष्टीत जर काही फरक किंवा चूक असेल तर त्या गोष्टीची किंमत खूपच वाढते. अशा चांदणीयुक्त नोटांना, नोटा-संग्राहकांकडून खूपच मागणी असते. साहजिकच ते अशा नोटा दर्शनी किंमतीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम देऊन विकत घेतात. ebay या साईटवर आपण जर अशा नोटांची किंमत पहिली तर तोंडात बोट घालायची वेळ येते. अशा चांदणीयुक्त नोटांची पद्धत जगात अनेक देशांमध्ये रूढ आहे.
तुमच्याकडे कधी आली होती का अशी किस्मत का सितारा चमकावणारी चांदणीयुक्त नोट? यापुढे नोटांवरील या चांदणीचा शोध नक्की घ्या!
–मकरंद करंदीकर
(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)
Leave a Reply