भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघाच्या (युनो) मुख्यालयात एक दिमाखदार सोहोळा होणार आहे.
युनोमध्ये डॉ. आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदाचा होणार असून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारला जाणार आहे.
युनोमध्ये कल्पना सरोज फौंडेशन आणि फौंडेशन फॉर ह्युमन होरायझन यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी केली जात आहे.
या संदर्भात भारतीय प्रशासनाला युनोच्यावतीने देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील अब्जावधी लोकांचे आयकॉन असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी जगभरातील ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा जपण्यासाठी समाजात काम करणाऱ्या जगभरातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. अशा १२५ जाणांची जगभरातून निवड केली गेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १२५ जणांना त्यांच्या नावाचा ‘डॉ. आंबेडकर रत्न पुरस्कार’ दिला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात सध्या नेलसन मंडेला आणि मार्टिन ल्युथर किंग यांचे पुतळे आहेत. या ठिकाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. ही बाब तमाम भारतीयांसाठी आणि मराठी माणसांसाठी अभिमानाची आहे.
यासाठी कल्पना सरोज यांनी पुढाकार घेतला आहे. युनोच्यावतीने त्यासंदर्भात त्यांना मान्यता दिली गेली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉ. आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाईल.
Leave a Reply