भाग – १ – अ २
प्रथम आपण, इंग्रजी शब्दांचा जो मराठीत शिरकाव झाला आहे, होतो आहे, त्याचा विचार करुं या.
व्यासंगी विद्वान ( आणि कलकत्ता येथील नॅशनल लायब्ररीमधील भूतपूर्व ग्रंथपाल) श्रीयुत श्री. बा. जोशी यांनी आपल्या एका लेखांत सांगितलं आहे की – ‘‘जेव्हां सबंध देश एखादी भाषा शिकत असतो, तेव्हां त्या परभाषेचा एतद्देशीय भाषेवर परिणाम होणें अपरिहार्य असतें. परकीय भाषा बोलतांना आपल्या भाषेतील शब्द तिच्यात शक्यतो न येतील अशी आपण काळजी घेतो, पण मातृभाषेत बोलतांना अशी बंधने नसतात, आपण अधिक मोकळेपणानं बोलत असतो. सहज परभाषेतले शब्द आले तरी त्याची पर्वा बाळगत नाही.’’
‘श्री. बां.’ चं म्हणणं अगदी बरोबर आहे. माझी आणखी एक टिप्पणी अशी की, हल्ली जर भारतीय तरुण इंग्रजी बोलतांना भारतीय भाषांपासून बनवलेल्या कित्येक शब्दांचा मुक्त वापर करतात.
मग इंग्रजी शब्दांचा भारतीय भाषांमध्ये होणारा वापर स्वाभाविकच आहे, नाहीं कां?
मराठीत शिरलेल्या इंग्रजी शब्दांबद्दल एका मित्राशी चर्चा करतांना मी म्हणालो, ‘‘आपल्या भाषेनं परकीय भाषेतले शब्द आपलेसे केले तर हरकत कसली?’’
माझा मित्र खवळून म्हणाला, ‘‘खबरदार असलं भलतं कांही बोललास तर ! तुझी अक्कल ठिकाणावर आहे ना ? असली वृत्ती म्हणजे एक विकृति आहे, मानसिक आजार आहे ! आम्ही कांहीं बाजारात नाही बसलेलों की कुणीही यावं अन गल्लाभरू शब्द आमच्या दप्तरात कोंबावे’’ , वगैरे वगैरे.
रागाच्या भरात माझ्या मित्राच्या लक्षातच आलं नाहीं की त्याच्या स्वतःच्या बोलण्यात किती अमराठी शब्दांचा वापर झाला आहे.
खबरदार, अक्कल, आजार, बाजार, दप्तर, गल्ला हे अरबी-फारसीतले किंवा त्या शब्दांचा अपभ्रंश होऊन बनलेले शब्द आहेत.
असेच – बाबा, किल्ला, तब्येत, ताकद, तोफ, तारीख, शिकार, अब्रू , दवाखाना, चुगली असे शेकडो शब्द मराठीत इतके मिसळून गेले आहेत, की अनेकदा त्यांचा उगम लक्षातही येत नाही.
असे दुसर्या भाषेतून आपलेसे केलेले शब्द कालांतराने आपल्या भाषेत मिसळून जातात, तिचे स्वतःचे होऊन जातात. आणि त्यात गैर काय आहे? भाषेमध्ये नवनवीन कल्पना, नवे विचार, नवे अनुभव मांडायची, स्पष्ट करून सांगायची (to express) ताकद असायलाच हवी. त्यासाठी कालानुसार नवीन शब्द घडवण्याची व परभाषांतून शब्द स्वीकारून आपलं भांडार वाढवायची तयारी असायलाच हवी.
इंग्रजीत तर अशा परभाषेतून आलेल्या शब्दांसाठी Hobson-Jonson हा शब्दकोशच आहे.
परभाषेतून आलेल्या शब्दांचे ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशानुसार ३ वर्ग पडतात आणि त्याचं सुंदर विवेचन श्री. बा. जोशींनी केलेलं आहे.
१) Natural – नैसर्गिक – श्री. बा. जोशींनी अश शब्दांना ‘घरजावई’ असं नांव दिलं आहे. हे शब्द नैसर्गिक प्रक्रियेनं भाषेत मिसळून गेलेले असतात.
२) Alien – परकीय शब्द – श्री. बां. नी या शब्दांना ‘अतिथी’ शब्द असं नांव दिलेलं आहे. ते वापरले गेले तरी त्यांचा भिन्न तोंडवळा लक्षात राहतो. सतत आणि सहजपणे वापरात राहिले तर ते पहिल्या वर्गात चढतात, नाहींतर कालांतराने पाठीमागे पडून तिसर्या वर्गात जातात.
३) Casuals – कारणपरत्वे वापरले जाणारे शब्द – श्री. बा. यांना ‘उपरे / आगंतुक’ शब्द असे संबोधतात. हे भाषेत आज आहेत, उद्या असतीलही, नसतीलही.
ह्या अनुषंगाने १६व्या शतकातील मराठीचा एक नमुना पाहूं या – ‘‘अर्जदास्त अर्जदार बंदगी बंदेनवाज अलेकं सलाम साहेबांचे सेवेसी बंदे शरीराकार जीवाजी शेखदार बुधाजी कारकून परगणे शरीराबाद किल्ला कायापुरी सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झाले . . . ( वगैरे वगैरे ) इणें तमाम परगणा जेरदस्त केला. क्रोधाजी नाईकवाडी याणें तमाम तफरका केला.’’
हें मराठी !! यांत मराठी किती अन् फारसी किती हे आपणच पहा!
गंमत म्हणजे, हा मजकूर दुसर्या तिसर्या कोणी लिहिलेला नसून प्रत्यक्ष एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे. त्यातील आध्यात्मिक अर्थ आपल्या लक्षात आला असेलच.
या उदाहरणावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती ही की त्या काळी गद्याची व पद्याची भाषा वेगळी होती. गद्याची भाषा रोजच्या बोलाचालीची फारसीमिश्रित होती व पद्याची भाषा ( जी आपल्या परिचयाची आहे ) सुबोध मराठी होती. तसंच आजची व्यवहारातली मराठी, इंग्रजीमिश्रित आहे व साहित्यिक मराठी शुद्ध स्वरुपात आहे.
या उदाहरणावरून दुसरा मुद्दा स्पष्ट होतो की त्या काळातले अनेक फारशी शब्द वापरातून गळून पडले व कांहीं शब्दच ‘नैसर्गिक’ म्हणून टिकून राहिले.
**
(पुढे चालू)
— सुभाष स. नाईक
Leave a Reply