भाग – १-ब
तुम्हाला नवल वाटेल की फक्त फारसीतूनच भारतीय भाषांमध्ये शब्द आले आहेत असं नाहीं, तर संस्कृतमधूनही फारसीत अनेक शब्द गेलेले आहेत. या विषयावरील श्री. राजेश कोचर यांचे लेख माझ्या वाचनात आले आहेत. मुंबईचे श्री. प्रकाश वैद्य यांनीही मौलिक संशोधन केलं आहे (आणि थोडंफार मी स्वतःसुद्धां ).
हा थोडासा नमुना बघा –
संस्कृत फारसी
छाया साया
श्वेत सफेद
बुद्ध बुत
शरद सर्द
श्याम स्याह
द्वार दर
सप्ताह हप्ता
बाहू बाज़ू
मास माह
हस्त दस्त
आप आब (पाणी)
फूल गुल
वात बात
भूमि बूमी
सम हम ( हमनाम, हमशकल )
नाम नाम ( बाबरनामा, अकबरनामा )
जानु ज़ानू
शुष्क खुश्क
खर खर ( गाढव )
उदा. ‘‘गावब गुजरात रफ्त
खर बखुरासान शिताफ़्त’’
( औरंगजेबाच्या फौजेची दाणादाण कशी झाली त्याचं हे वर्णन आहे.)
वरील शब्द संस्कृतोद्भव ( अथवा संस्कृतसमान) आहेत हें इराणमधल्या कुणाच्या लक्षातही येणार नाही.
(या शब्दांच्या देवाणघेवाणीचें कारण, आर्ष-संस्कृत व अवेस्तन-इराणी या भाषाभगिनी होत्या, हें असूं शकेल).
अहो, फारसीत काय, जपानीतही भारतीय शब्द आहेत – ‘झेन’ म्हणजे ज्ञान. जपानीत भिक्षुला ‘रोशी’ म्हणतात. ‘रोशी’चा मूळ शब्द ऋषी आहे. हे सांगायलाच नको. असे शब्द परकीय भाषांतून घेतल्यामुळे फारसी किंवा जपानीचं अस्तित्व नाहीसं झालं आहे काय? मध्ययुगात सर्व भारतीय भाषांमध्ये जे फारसी शब्द शिरले त्यामुळे भारतीय भाषांचं अस्तित्व केव्हांच संपुष्टात यायला हवं होतं, पणं तसं झालं नाही.
म्हणून मी असा मुद्दा ठळकपणे मांडू इच्छितो की, संकराने भाषा विकृत होते, हें म्हणणे सर्वार्थानं खरं नाही. उलट, शब्दांचा देवघेवीनं भाषा समृद्ध होते, तिचं भांडार वाढतं. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात घाबरण्यासारखं काय आहे?
आणि म्हणूनच जैमिनीनं आपल्या म्लेंच्छ प्रसिद्धार्थ प्रामाण्याधिकरण सूत्रात सांगितलं आहे की – ‘‘केवळ परकीय म्हणूनच शब्द त्याज्य मानू नयेत’’.
भाषा हे संस्कृतीचं एक अंग आहे. संस्कृती समावेशक असली तर ती टिकून राहते. कूपमंडूक वृत्ती संस्कृतीला संकुचित बनवते, तिची पीछेहाट व्हायला कारणीभूत ठरते. जोपर्यंत आपली संस्कृती लवचिक होती, समावेशक होती, तोपर्यंत तिने शक – कुशाण – हूण सर्वांना सामावून घेतले. एवढेच नव्हे तर ती इंडोचायना, मलेशिया, इंडोनेशिया वगैरे भूभांगांमध्येही पसरली. पण पुढे मध्ययुगात आपली संस्कृती शहामृगप्रवृत्तीनं संकुचित झाली. रोटीबंदी – बेटीबंदी – सिंधुबंदी सारखी बंधन आपण स्वतःवर लादली व त्यामुळे आपली पीछेहाटच झाली.
भाषासुद्धा लवचिक राहिली तरच तिची प्रगती होते.
**
(पुढे चालू)
— सुभाष स. नाईक
Leave a Reply