नवीन लेखन...

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग २ – ब

भाग २ – ब

बहुभाषिकत्‍व

भारतीय भाषांचा विचार करतांना, भारतीयांचं बहुभाषिकत्‍वही विचारात घ्‍यायला हवं.

अगदी २००० वर्षांपूर्वी पाहिलं तरी, संस्‍कृतच्‍या बरोबरच पाली व अर्धमागधी व शौरसेनी, पैशाची, महाराष्‍ट्री ह्या भाषा अस्तित्‍वात होत्‍या.

अनेक लोक व्‍यापारासाठी किंवा तीर्थयात्रेसाठी प्रवास करीत. सिंधु संस्‍कृतीच्‍या लोकांचेही संबंध मध्‍यपूर्व आशिया, आफ्रिका इथल्‍या लोकांशी होते.

नामदेवांनी उत्तरेत तीर्थयात्रा केली ती हिंदीचं ज्ञान असल्‍याशिवाय शक्‍य नव्‍हतीच. नामदेवांचे गुरू ग्रंथसाहिब मधील हिंदी दोहे याचे साक्षीदार आहेत.

चक्रधर स्‍वामी मूळचे गुजरातमधील पण महानुभाव पंथाची स्‍थापना व विस्‍तार त्‍यांनी महाराष्‍ट्रात केला.
शंकराचार्यांनी भारतभर प्रवास केला व चारी कोपर्‍यांत पीठं स्‍थापन केली. रामानंद स्‍वामी व वल्‍लभाचार्य दक्षिणेतून काशीकडे यात्रा करीत व त्‍यांचा शिष्‍यवर्ग विशेषकरून उत्तरेत होता.

अशी अनेक उदाहरणं देतां येतील आणि हे केवळ अपवाद समजूं नका. आजही अनेक भारतीयांना २/३ भाषा बोलता येतात किंबहुधा समजतात तरी. युरोपमध्‍येही असंच आहे. इंग्रजीचा वापर करतो म्‍हणून कोणी युरोपीय किंवा जपानी माणूस तिचा आपली मातृभाषा म्‍हणून स्‍वीकार करील कां? मग आम्‍ही भारतीयच आपली मातृभाषा कशी टाकून देऊ?

उगीच नाही माधव ज्‍यूलीयन म्‍हणून गेले –

‘‘जरी पंचखंडातही मान्‍यता घे
स्‍वसत्ता बळें श्रीमती इंग्रजी
भिकारीण आई जहाली म्‍हणूनी
कुशीचा तिच्‍या तीस केंवी त्‍यजी?’’

 Link Language – भिन्न भाषिकांमधील दुवा

भारतात इंग्रजीचं मुख्‍य स्‍थान आज काय आहे व काय राहील? इंग्रजीचं स्‍थान आहे भिन्नभाषिकांनां सांधणारा दुवा म्‍हणून. आपण इंग्रजी शिकतो तें आपल्‍याला देशी व विदेशी परभाषिकांशी व्‍यवहार करता यावेत म्‍हणून.

इसवी सनापूर्वीच्‍या ६व्‍या शतकापासून भारतात प्राकृत भाषा दिसून येतात. त्‍या आधीपासूनच अस्तित्‍वात असल्‍याच पाहिजेत. (प्राकृत म्‍हणजे नैसर्गिक व संस्‍कृत म्‍हणजे संस्‍करण केलेली, असाच त्‍यांच्‍या नावाचा अर्थ आहे. अर्थात्, पाणिनीच्या काळीं या भाषेला संस्कृत ही संज्ञा नव्हती). अगदी ऋग्‍वेदकालीन ऋचा पाहिल्‍या तरी ही गोष्‍ट दिसून येते. त्यात, ‘ळ’ व ‘ल’ या दोन्‍हींचा वापर आढळतो. वर्ण ६३ किंवा ६४ मानले जातात असाही उल्‍लेख दिसतो. ‘ळ’ चा उपयोग सार्‍याच वैदिक ऋषींनी केलेला नाहीं.

संस्‍कृत घरगुती बोलाचालीची व दैनंदिन व्‍यवहाराची भाषा होती की नाहीं, व असल्‍यास कुठल्‍या काळी होती ( उदा. वैदिक काळीं ) , हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण, गेली २ – २॥ हजार वर्षे संस्‍कृत एक दुवा सांधणारी भाषा (संपर्क-भाषा) म्‍हणून वापरली जात होती, हे निश्चित. तिला प्रतिष्‍ठा लाभली व तिच्‍यात साहित्‍यसृजन सुद्धा झाले. पण ह्या सगळ्याचं मुख्‍य कारण हेंच की ह्या विस्‍तृत खंडप्राय भूभागावरील अनेक लोक ही भाषा समजू शकत होते.
हीच गोष्‍ट चीनमध्‍यें मॅंडरिन भाषेची आहे. हीच गोष्‍ट युरोपमध्‍ये लॅटिनची होती. आधुनिक युरोपीय भाषा गेली १००० वर्षें अस्तित्‍वात असल्‍या तरी, आणि रिनेसाँच्‍या काळात त्‍यांची खूप प्रगती झाली, तरीही १९व्‍या शतकापर्यंत लॅटिन युरोपची दुवा-भाषा (संपर्क भाषा) म्‍हणून अस्तित्‍वात होती.

दुवा म्‍हणून वापरली जाणारी भाषा जर लोकभाषा म्‍हणून – मातृभाषा म्‍हणून – एखादा जनसमूह बोलत नसेल ; तर , तिची दुवा म्‍हणून आवश्‍यकता न राहिल्‍यास, ती अस्‍तंगत होते. लॅटिनचं हेंच झालं. भारतातही इंग्रजी दुवा-भाषेचं काम करूं लागल्‍यावर संस्‍कृतची दुवा-भाषा म्‍हणून आवश्‍यकता संपुष्‍टात आली.

दाई कधी आईची जागा घेऊं शकत नाहीं. त्‍याचप्रमाणें, मातृभाषा विकसित असतांना दुवा-भाषा तिचं स्‍थान घेऊं शकणार नाहीं.

विज्ञानाचा आधार घेऊन पाहिलं असतां असं दिसतं की कदाचित उद्या ‘क्‍लॉनिंग’चं तंत्र विकसित झालं, ( आणि, त्याची कांहीं सुरुवात झालेलीच आहे ), तर , प्रत्‍यक्ष आईच्‍या गर्भात वाढ न होतांही मूल जन्‍मू शकेल. पण त्‍यामुळे आईच्‍या मायेची, जवळिकीची गरज कशी पूर्ण होणार? ‘आई’ हा केवळ एक भौतिक घटकंच नाही, तर त्‍यात मानसिक घटकांचाही फार मोठा सहभाग आहे. तसंच मातृभाषेचंही आहे.

भाषावार प्रांतरचनेचे फायदे-तोटे याची चर्चा आज आपल्‍याला करायची नाही. पण त्‍यामुळे भारतीय भाषाभाषिकांची स्‍वभाषाविषयक अस्मिता जागी झाली, व भारतीय भाषांच्‍या विकासाला मदत झाली, हें निर्विवाद. अशा स्थितीत, इंग्रजी आमच्‍या मातृभाषेचं उच्‍चाटण कशी करुं शकेल?

या विषयी चार्लस् बार्बर हा भाषाशास्‍त्रज्ञ काय म्‍हणतो पाहा – ‘‘विविध भागातील सुशिक्षित भाषिकांमधील व्‍यवहारासाठी इंग्रजी हेच प्रमुख माध्‍यम आहे. राज्‍यव्‍यवहार व व्‍यापारासाठी बहुतांशी तिचाच वापर होतो. मध्‍ययुगीन युरोपममधें लॅटिन जी भूमिका बजावीत होती, तशीच भूमिका अजून बराच काळ इंग्रजी बजावील. पण अशी स्थिती प्रदीर्घ काळापर्यंत चालूं राहूं शकणार नाहीं. असे देश अखेरीस शिक्षण व व्‍यवहारात इंग्रजीऐवजी एक किंवा अधिक स्‍वदेशी भाषांचा उपयोग करू लागतील.’’

चार्लस् बार्बरचं विवेचन बर्‍याच अंशी हिंदीच्‍या स्‍वरुपात खरं ठरतं आहे, हें आपण पाहातच आहोत.
**
(पुढे चालू)

— सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..