
पूर्वीच्या काळात नाडीपरीक्षेवरून रोगनिदान केले जात असे. हृदयाचे ठोके ऐकून वैद्यकीय तपासणी करण्याची पद्धत नंतर रूढ झाली.
इ.स. १८०० सुरुवातीच्या काळात फ्रान्समध्ये रेने लॅनेक नावाचा एक डॉक्टर होता. तो हृदयाचे स्पंदन ऐकून रोगनिदान करीत असे. त्यासाठी तो रुग्णाच्या छातीला कान लावून हृदयाचा लब-डब हा आवाज ऐकत असे. एकदा त्याच्याकडे एक तरुण स्त्री आली. आता त्याची चांगलीच पंचाईत झाली. तिच्या छातीला कान कसा लावणार? मग त्याने काही कापडाचे तुकडे तिच्या छातीवर टाकून तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. पण आवाजच येईना. शेवटी त्याने पुठ्याची नळी करून तिच्या मदतीने तिच्या हृदयाची धडकन काय सांगते हे पाहून निदान केले. त्यामुळे स्टेथोस्कोपचा शोध हा लॅनेक यानेच लावला. त्याने लाकडी नळीला इयरपीस लावून स्टेथोस्कोप बनवला. फक्त नंतर त्यात अनेक तांत्रिक बदल झाले.
अर्थात छातीला कान लावला तरी मधल्या भागात हवा राहात असल्याने आवाज नीट ऐकू येत नाही, त्यामुळेही असे साधन गरजेचे होते. ग्रीक भाषेत स्टेथॉस म्हणजे छाती व स्कोप म्हणजे तपासणी. यातून स्टेथोस्कोप हा शब्द तयार झाला. स्टेथोस्कोपमध्ये रुग्णाच्या छातीवर डमरूसारखा जो भाग लावला जातो त्यात एका बाजूला डायफ्रॅगम (पडदा), तर दुसऱ्या बाजूला बेल नावाचा भाग असतो. त्याला पुढे एक रबरी नळी जोडलेली असते. त्यातून आवाज प्रवास करतो. या नळीच्या शेवटी दोन फाटे असतात व त्याला दोन स्टीलच्या नळ्या असतात. त्या नळ्यांना इयरपीस असतात. या नळ्या डॉक्टर कानात अडकवतात, तेव्हा त्यांना हृदयाचे ठोके स्पष्टपणे ऐकू येतात.
छातीला लावलेला बेल नावाचा जो भाग असतो तो अगदी बारीक आवाजही पकडतो व पडदा मोठे आवाज पकडतो. हृदयात काही बिघाड असेल तर त्याची पूर्वसूचना यात मिळत असते. आता स्टेथोस्कोप हे अॅकॉस्टिक व इलेक्ट्रॉनिक अशा दोन प्रकारांत मिळतात. इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोपमध्ये ॲम्प्लीफायर असतो. त्यामुळे त्यात आवाज बराच मोठा ऐकू येतो.
आता अर्भकांची तपासणी करण्यासाठीही असा स्टेथोस्कोप वापरता येतो. स्टेथोस्कोपमध्ये केवळ हृदयाचा आवाज ऐकू येतो असे नाही, तर फुफ्फुसातील आवाजही कळतात. त्यामुळे त्याची उपयुक्तता जास्त असते. स्टेथोस्कोप स्वच्छ राखणे महत्त्वाचे असते. कारण त्याच्या नेहमीच्या हाताळण्याने त्यावर स्टेफिलोकॉकससारखे जीवाणू राहू शकतात. त्यामुळे तो वेळोवेळी स्वच्छ रूमालाने पुसून घेणे गरजेचे असते.
Leave a Reply