नवीन लेखन...

स्टीवर्ड

नायजेरियात कार्गो लोड करून जहाज निघाले होते. दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन मध्ये फ्रेश व्हेजीटेबल, प्रोविजन आणि इंधन भरून जहाज ऑस्ट्रेलियन पोर्ट मध्ये जाणार होते. सुमारे पस्तीस एक दिवसांचे अंतर होते, केप टाऊनला पोहचायला सात ते आठ दिवस लागणार होते. जहाजाचे लोडिंग किनाऱ्यापासून पन्नास किलोमीटर वर समुद्रात असलेल्या ऑईल फिल्ड मध्ये झाले होते. नायजेरियातील ऑईल कंपनीचे तीन अधिकारी आणि सहा सात कर्मचारी लोडींग पूर्ण होईपर्यंत जहाजावर होते. सगळेच्या सगळे नायजेरियन नागरिक होते. त्यांचा रंग जहाजावर लोड केलेल्या क्रूड ऑईल सारखा तुळ तुळीत काळा होता. त्यांचा चमकणारा काळा रंग आणि चेहऱ्याकडे पाहिल्यावर दिसणारे त्यांचे पांढरे शुभ्र दात बघून आश्चर्य वाटायचं. काहींच्या डोक्यावर मेंढी सारखे कुरळे केस तर काहींच्या डोक्यावर नूडल्स सारखे वेटोळे असलेले केस बघून हे लोक केस तरी कसे विंचरत असावेत असा प्रश्न पडायचा. त्यांच्या भाषेचा अक्सेंट आणि टोन ऐकून ते जे बोलतील ते ऐकताना गम्मत वाटायची. अमिताभ बच्चनचा शोले, शाहरुखचा दिलवाले दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे यासारखे पिक्चर त्यांनी पाहिले होते आणि त्याबद्दल ते स्वतःहून सांगत होते. जहाजावर असलेल्या हिंदी पिक्चर च्या डीवीडी पण मागून घेत होते. घरी त्यांच्या बायका पोरांना हिंदी पिक्चर चे नाचगाणी बघायला खूप आवडतात असे ते सांगत होते. चाळीस तासांचे लोडींग पूर्ण करून जहाज निघाले होते.

समुद्र एकदम शांत होता, हलका मंद वारा आणि निरभ्र निळे आकाश यामुळे पाणी सुद्धा अत्यंत नितळ आणि निळे दिसत होते. जहाज निळ्या पाण्याला कापत वेगाने निघाले होते. संध्याकाळी सहा नंतर एक एक करून सगळे अधिकारी जेवायला यायला लागले , येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर मेस रूम मध्ये आल्या आल्या आठ्या पडायला लागल्या. मेस रूम मध्ये आज टेबल वर जेवण मांडले नव्हते, आत गॅली मध्ये जाऊन प्रत्येकाला प्लेट मध्ये वाढून घ्यावे लागत होते. जहाजावर एकच स्टीवर्ड असतो जो जेवण बनवायला चीफ कूकला मदत करतो, अधिकाऱ्यांचे केबिन साफ करणे आणि दोन्ही वेळेचे जेवण सर्व्ह सुद्धा करणे ही त्याची एकट्याची कामे. स्टीवर्ड चार वाजेपर्यंत कूकला मदत करत होता पण नंतर डोके दुखी अनावर झाली म्हणून केबिन मध्ये निघून गेला असल्याची माहिती कूक ने कॅप्टन सह सर्वांना दिली. रात्री आठ वाजता स्टीवर्ड सेकंड मेट कडे पेन किलर मागायला गेला असताना सेकंड मेट ने सहज त्याला हात लावला तर त्याचे अंग गरम वाटले.
रात्री तापा साठी गोळ्या घेऊन झोपायला गेलेला स्टीवर्ड सकाळी कामावर आला नाही म्हणून कूक ने चीफ मेट शी बोलून एक ट्रेनी सी मन मदत करण्यासाठी मागून घेतला. चीफ मेट ने कॅप्टन च्या कानावर ही गोष्ट घातली. कॅप्टन ने स्टीवर्ड ला केबिन मध्ये फोन करून तब्येतीची विचारणा केली असता त्याने डोकं दुखतंय आणि मळमळते आहे असे सांगितले तसेच अंगावर लालसर पुरळ उठत असल्याचे सांगितले. कॅप्टन ने सेकंड मेट ला विचारून कोण कोणत्या गोळ्या दिल्या याबद्दल खात्री करून घेतली. जहाजावर सेकंड मेट कडे मेडीसिन लॉकर तसेच आजारी पडणाऱ्याला गोळ्या औषधे देण्याची जबाबदारी असते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ उलटून गेली तरी स्टीवर्ड चा ताप उतरत नव्हता तसेच त्याच्या अंगावर उठणारे पुरळ सुद्धा चिंतेचा विषय बनला होता. स्टीवर्ड काही खायला प्यायला मागत नव्हता. आता त्याच्या चेहरा आणि एकूणच सगळ्या हालचाली थकल्या सारख्या वाटत होत्या.
नायजेरिया मधून निघाल्यावर तिसऱ्या दिवशी कॅप्टन ने कंपनीला स्टीवर्ड बद्दल फोन करून कळवले ,केप टाऊन ला आणखी चार दिवसांनी पोहचे पर्यंत जहाजावर असलेल्या गोळ्या औषधांनी उपचार करायला कंपनीकडून सांगितले गेले होते.
तिसऱ्या दिवशी स्टीवर्ड ची अवस्था आणखीनच खराब झाली, त्याचे डोळे लाल झाले, अंगावर पुरळ जाऊन मोठ मोठ्या फोड्या दिसायला लागल्या होत्या. खाणे पिणे बंद असल्याने त्याला हालचाल करायला होत नव्हती, केबिन मधून काढून त्याला जहाजाच्या हॉस्पिटल रूम मध्ये नेण्यात आले. सेकंड मेट ने त्याला सलाईन लावण्याचा प्रयत्न केला पण सेकंड मेटला त्याच्या शिरेत व्हेन फ्लो ची सुई घुसविण्याची हिम्मत होईना म्हणून शेवटी चीफ ऑफिसर ने त्याला बाजूला करून सलाईन लावून दिली.
स्टीवर्ड बद्दल आता जहाजावर उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. हा ताप नसून वेगळाच कुठला तरी आजार आहे , त्याला कसा काय झाला, आता पुढे काय होईल असे ज्याचा तो तर्क वितर्क करू लागला होता.
चौथ्या दिवशी सकाळी स्टीवर्ड च्या डोळ्यातून आणि अंगातून रक्त येते आहे असे वाटल्याने कॅप्टन ला बोलावण्यात आले. स्टीवर्ड वेदनेने विव्हळत होता, त्याला विव्हळत असताना बघून चीफ कूक ला रडू अनावर झाले आणि तो मोठमोठ्याने रडायला लागला. ते दोघेही मागील कित्येक वर्ष कंपनीत एका जहाजावर एकामागोमाग काही दिवसांच्या अंतराने जॉईन करून एकत्र काम करत असल्याने एकमेकांचे चांगले मित्र देखील होते. कुकला तिथून जायला सांगितले, कॅप्टन आणि चीफ इंजिनियर आणि सेकंड मेट सोडून इतर सगळ्यांना हॉस्पिटल बाहेरून आप आपल्या कामावर जायला सांगितले गेले. कॅप्टन आणि चीफ इंजिनियर दोघेही पुन्हा एकदा कंपनी ऑफिस ला फोन करायला गेले, सेटेलाईट फोन वरून फोन लावल्यावर कंपनी कडून उत्तर आले जहाज केप टाऊन ला पोचल्याबरोबर स्टीवर्ड ला हॉस्पिटल मध्ये नेण्याची व्यवस्था केली जाईल. स्टीवर्ड केप टाऊन पर्यंत जगू शकेल की नाही याची खात्री देता येत नाही म्हणून कॅप्टन ने कळवले. शेवटी त्याच रात्री स्टीवर्ड मरण पावला, संपूर्ण बेड वर रक्त लागले होते. त्याच्या निष्प्राण देहाला एका मोठ्या प्लास्टिक मध्ये गुंडाळले आणि त्याला जहाजाच्या मीट रूम मध्ये -१२°c तापमानात एका बाजूला ठेवण्यात आले. चीफ कूक ला या घटनेने मोठा धक्का बसला होता. दुसऱ्या दिवशी एका गुजराती मोटरमन ने सगळ्यांसाठी जेवण बनवले चीफ कूक काही खाण्याच्या मनस्थितीत नव्हताच. इतर सगळ्यांनी सुद्धा कसेबसे जेवण उरकून घेतले होते. प्रत्येक जण या अकल्पित घटनेने भांबावला होता. आणखीन दोन दिवसांनी जहाज केप टाऊन ला पोचणार होते पण काल रात्री पासून सेकंड मेट ने सुद्धा डोके दुखत असल्याचे सांगितले होते, चीफ कूक सुद्धा अंगात कणकण आहे म्हणून बोलत होता. पुढल्या दिवशी दोघांनाही ताप भरला.
स्टीवर्ड नंतर कूक आणि सेकंड मेट हेच दोघं जण जास्त वेळा स्टीवर्ड जवळ ये जा करत होते त्यांना ताप भरल्यानंतर कॅप्टन ने लगेच दोघांनाही जहाजाच्या हॉस्पिटल रूम मध्ये पाठवून दिले. त्या दोघांना खाणे पिणे देण्याची जबाबदारी एका ए बी वर सोपवली पण त्याला सुध्दा मास्क आणि ग्लोव्हज तसेच डीस्पोजेबल बॉयलर सुट घालायला सांगितले.
कॅप्टन ने नायजेरियात जहाजावर आलेल्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्याबद्दल ऑईल टर्मिनल वर फोन द्वारे चौकशी केली असता जहाजावर आलेल्या नायजेरियन पैकी एका अधिकाऱ्याचा तापाने मृत्यू झाल्याची महत्वाची माहिती कॅप्टन ला मिळाली. सेकंड मेट आणि चीफ कूक दोघेही आता आपले काय होईल या चिंतेने रडकुंडीला आले होते. सगळे खलाशी आणि अधिकारी मनातून खूप हादरले होते तरीपण आपापले काम करत होते, कूक जेवण बनवायला नसल्याने जे मिळेल ते खात होते. मीट रूम मध्ये स्टीवर्ड चे प्रेत असल्याने चिकन, मटण आणि बिफ सोडून फक्त फिश रूम मध्ये असलेले फिश आणि फ्रोजन व्हेजिटेबल यापैकी जे बनवता येईल ते गुजराती मोटरमन त्याच्या परीने बनवत होता अधून मधून थर्ड इंजिनीयर आणि थर्ड मेट सुद्धा दाल फ्राय किंवा पुलाव सारखे पदार्थ बनवत होते. सेकंड मेट आणि चीफ कूक ला दूध किंवा फ्रूट सलाड पाठवले जात होते पण ते खातात किंवा नाही खात ते बघायला जायला पण कोणाची हिम्मत होत नव्हती.
जहाज केप टाऊन ला पोचल्यावर स्टीवर्ड चे प्रेत न्यायला काॅफिन आणि दुसऱ्या दोघांना न्यायला स्त्रेचर एका लहानशा स्पीड बोट मधून आणले होते. हॉस्पिटल मधून जय्यत तयारीनिशी डॉक्टर आणि त्याची टीम आली होती, सर्वांनी खास मेडिकल सूट घातले होते , त्यांचे डोळे तेवढे मेडिकल सूट मधून दिसत होते. नवीन सेकंड ऑफिसर आणि कूक तसेच स्टीवर्ड कंपनीने एका दिवसात सगळे अरेंज करून पाठवले होते. जहाज केप टाऊन मधून आठ तासात इंधन आणि प्रोविजन भरून बाहेर पडले.
परंतु केप टाऊन जवळ आल्यावर चीफ इंजिनियर ने त्याच्या मोबाईल ला आलेले नेटवर्क पाहून डाटा ऑन केला होता. जहाज केप टाऊन सोडून निघाल्यावर दोन तासांनी चीफ इंजिनियर ने व्हॉटसअप वर आलेले मेसेज पाहिले आणि त्याला दरदरून घाम फुटला होता. कोणाला सांगू की नको अशा द्विधा मनःस्थिती मध्ये तो होता. त्याने कॅप्टन ला केबिन मध्ये फोन करून त्याला भेटायला येतो असे सांगितले. केबिन मध्ये कॅप्टन गंभीर अवस्थेत बसला होता, चीफ इंजिनियर ने कॅप्टन ला त्याच्या मोबाईल मध्ये असलेले मेसेज दाखवले. कॅप्टन म्हणाला मी सुद्धा घरी फोन केला तेव्हा घरच्यांकडून आताच ही गोष्ट समजली. चीफ इंजिनियर कॅप्टन ला म्हणाला सर ई बोला नावाच्या व्हायरस ने संपूर्ण जगात हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे.
अमेरिकेत पण लागण झालीय, नायजेरिया आणि आफ्रिका खंडातील बहुतेक देशांत या व्हायरस मुळे हजारो लोक मागील आठ दिवसात मरण पावले आहेत. एकदा याची लागण झाली की मृत्यू अटळ आहे. आपला स्टीवर्ड तर गेलाच पण सेकंड मेट आणि चीफ कूक पण इथेच साऊथ आफ्रिकेत मरणार. आता जहाजावर आपण असणारे तीस जणांपैकी कोणालाही स्टीवर्ड ,सेकंड मेट आणि चीफ कूक यांच्यामुळे लागण झाली नसेल कशावरून?? मीट रूम मध्ये तीन दिवस स्टीवर्ड चे प्रेत जहाजासोबत प्रवास करत होते, ई बोला व्हायरस मुळे मृत्यू झाला असे समजले तर त्याचे प्रेत भारतात नेऊन तरी देतील का आणि जरी पोचले तरी त्याच्या घरचे ताब्यात तरी घेतली का? सेकंड मेट आणि चीफ कुकचे काय होईल ? ते जगतील की मरतील? येणाऱ्या बावीस दिवसात आपले काय होईल?? आपण ऑस्ट्रेलियाला जिवंत पोहचू की ई बोला व्हायरसला बळी पडू?? चीफ इंजिनियर प्रश्न विचारत होता पण कॅप्टन मात्र पोर्ट होल बाहेरील अथांग समुद्राकडे शून्य नजरेने बघत होता.
आज चीन सह संपूर्ण जगात कोरोना व्हायरस ने जी दहशत माजवली आहे तशाच प्रकारची दहशत मागील काही वर्षांपूर्वी आफ्रिकन देशांसह अमेरिका आणि युरोप मध्ये ई बोला व्हायरस ने माजवली होती. ई बोला व्हायरस झपाट्याने वाढत असताना आमचे जहाज नायजेरिया मध्ये चालले होते पण इंजिन मध्ये मोठा ब्रेक डाऊन झाल्याने जहाज कॅमेरून देशात वळवले, कॅमेरूनमध्ये दुरुस्ती साठी महिनाभर खोळंबून राहिले. कॅमेरून मध्ये सुद्धा ई बोला व्हायरस चे हजारो रुग्ण आढळून आल्याने. जहाज दुरुस्त होऊन बाहेर पडे पर्यंत महिनाभर आम्ही सगळे जीव मुठीत धरून एक एक दिवस मोजत होतो.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech), DIM.
कोन, भिवंडी,ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..