मानवी शरीरावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला रेझर असे म्हणतात. या रेझरचा वापर अगदी पुरातन काळापासून केला जात होता पण ते फारसे प्रगत नव्हते.
इतिहासपूर्व काळात शार्कचे दात, शंख व फ्लिंट यांचा उपयोग रेझरसारखा केला जात असे. इजिप्तमधील उत्खननात सोने व तांब्याचे रेझर सापडले होते. रोममध्ये अगदी पुरातन काळात ल्युसियस तरक्विनस प्रिस्कस या राजाने पहिल्यांदा रेझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला.
अठराव्या शतकात जीन जॅकस पेरेट या फ्रेंच व्यक्तीने पहिले रेझर तयार केले. त्याने सुताराचा रंधा लाकडावर कसा घासला जातो व त्यामुळे पृष्ठभाग कसा गुळगुळीत होतो याचा अभ्यास केला होता. त्यानंतरच्या काळात इंग्लंडमध्ये शेफिल्ड येथे सजावट केलेली हँडल्स असलेले रेझर तयार करण्यात आले. बेंजामिन हंटसमन याने पहिल्यांदा कठीण असे स्टीलचे ब्लेड तयार केले.
विसाव्या शतकाच्या अगोदर सरळ रेझरमुळे त्वचा नेहमी कापली जात असे, त्यामुळे ती फार सुरक्षित होती असे म्हणता येणार नाही. किंग कॅम्प जिलेट या अमेरिकी व्यक्तीने रेझरच्या क्षेत्रात क्रांती केली. तो सेल्समन होता व ज्या वस्तू तो विकत असे त्यात काही उपयोगी सुधारणा करण्याचा त्याला नादच होता. क्राऊन कॉर्क अँड सील कंपनीच्या मालकाने त्याला असा सल्ला दिला, की आम्ही बाटलीला बूच शोधून काढले तसा काहीतरी शोध तू लाव व वापरून फेकून देता येईल असे काहीतरी बनव.
सरळ रेझरमुळे त्या वेळी जिलेट वैतागलेला होता, मग जिलेटने सुरक्षित असे डिस्पोझेबल ब्लेड व रेझर शोधून काढले. जिलेटला या कामात विल्यम निकरसन या एमआयटीत शिकलेल्या संशोधकाने मोठी मदत केली होती. जिलेटने या रेझरच्या कल्पनेवर कोट्यवधी रुपये कमावले तरी सुरुवातीला तो मार्केटिंगसाठी हे रेझर फुकट देत असे. १९२९ मध्ये शेअर बाजार कोसळला त्यात जिलेटचे होत्याचे नव्हते झाले. कंपनीतील बोर्डरूम बॅटलमध्येही तो अडचणीत आला व १९३२ मध्ये त्याचे निधन झाले.
आता नवीन मॉडेल्समध्ये तीन, चार, पाच ब्लेड असलेले रेझर मिळतात त्यामुळे अतिशय गुळगुळीत दाढी होते. ‘मॅच ३’ सारख्या रेझरमध्ये तर ब्लेड हे अगदी जवळून त्वचेवर फिरत जाते. कार्बन ब्लेडमध्ये टंगस्टन व कार्बन संयुग वापरतात तर स्टेनलेस स्टील ब्लेडमध्ये कार्बन, सिलिकॉन, मँगेनीज, क्रोमियम, मॉलिब्डेनम, लोखंड याचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण वापरतात.
Leave a Reply