नवीन लेखन...

घरातली नळगळती थांबवा

नळ का गळतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी नळ कसा काम करतो हे समजून घ्यायला लागेल. आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की सहसा फिरकीचा नळ गळतो. जिथून पाणी बाहेर येते ती तोटी आणि तोटीपर्यंत पाणी आणून सोडणारा वरच्या टाकीला जोडलेला पाईप, यांच्यामध्ये नळ बसवलेला असतो.

फिरकीच्या नळाचे तीन प्रमुख भाग लक्षात घेऊया. वरचा दर्शनी, म्हणजे जो आपण नेहमी वापरतो तो भाग; आपल्याला न दिसणारा नळाच्या दांड्याच्या खालच्या भागात असलेला स्क्रूसारखा भाग आणि त्याच्याखाली असलेली रबरी किंवा मऊ प्लास्टिकची चकती म्हणजेच वॉशर! आपण नळ फिरवून बंद करतो तेव्हा हा वॉशर, पाईप आणि तोटी यांना जोडणाऱ्या सांध्यावर दाबला जातो. लवचिक असल्यामुळे तो या सांध्यावर अशा पध्दतीने विसावतो की पाईपमधलं पाणी तोटीपर्यंत जाऊ शकत नाही. आपण पाणी सोडण्यासाठी नळ फिरवतो तेव्हा नळ वर उचलला जातो. नळाच्या दांड्याबरोबर वॉशरही वर उचलला जातो आणि पाईपमधल्या पाण्याला तोटीकडे जाण्याची वाट मोकळी करुन देतो. नळ बंद करतांना वॉशर सतत दाबला जाऊन सैल पडतो. मग तो पाईप आणि तोटीच्या सांध्यावर नीट बसत नाही. हळूहळू नळ गळायला सुरूवात होते. मग आपण जास्तच जोराने फिरकी फिरवायला लागतो. परिणामी वॉशर आणखी सैल होतो आणि मग गळणारं पाणी थांबवणं आपल्या आवाक्याबाहेर जातं.. आपण प्लंबरचा धावा करायला लागतो.

समजा, नुकताच नळ गळायला सुरूवात झाली असतांना आपण स्वतःच नळावरचा स्क्रू काढून नळ काढला आणि त्याचा सैल झालेला वॉशर काढून त्या जागी दुसरा वॉशर बसवला तर? असं करता यायला हरकत नाही. फक्त दोन महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे नळ काढून वॉशर बदलत असतांना घराला जोडणारा पाण्याचा मुख्य नळ बंद करावा लागेल आणि बाजारातून आधीच नवीन वॉशर आणून ठेवावा लागेल.

कोणत्या प्रकारचा नळ गळण्याची शक्यता कमी असते?

बऱ्याच नळांमध्ये वॉशरचा वापर केलेला असतो. बऱ्याच वापराअंती वॉशर सैल पडतो आणि नळ गळायला लागतो. यावर काय उपाय? यावर उपाय म्हणजे वॉशर नसलेले नळ वापरणं!

काही नळांमध्ये वॉशरच्याऐवजी तरफेचा वापर केलेला असतो. आता तरफ म्हणजे काय असाही प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. तरफ हे रोजच्या व्यवहारात वापरलं | जाणारं साधं यंत्र आहे. याचा उल्लेख मागच्या काही लेखांमध्ये झालेलाही आहे. तरीही थोडक्यात सांगायचं, तर तरफ हे यंत्र आपण रोज वापरतो. उदाहरणार्थ तराजू, कात्री, चिमटा अशा प्रकारची साधनं ! तरफेमध्ये एखाद्या आधाराने बलाचा वापर करत काम केलं जातं. तराजूमध्ये मधल्या दांड्याचा आधार घेत एका बाजूला वजनाचं बल वापरत दुसऱ्या बाजूला भाजी तोलण्याचं काम केलं जातं. किंवा कात्री वापरतांना मधल्या टेकूच्या (आधाराच्या) एका बाजूला बोटांचं बल लावत दुसऱ्या बाजूने कापण्याचं काम होतं! कधी कधी तरफेचा आधाराचा किंवा टेकूचा भाग तरफेच्या एका टोकाला असतो. चिमट्यासारख्या तरफेच्या एका टोकाला आधार असतो, मधल्या भागात आपण हाताने बल लावतो आणि दुसऱ्या टोकाला वस्तू उचलण्याचं काम घडतं. काही नळांमध्ये तरफ वापरलेली असते. तरफ असलेल्या नळाचा दट्ट्या आपण वर उचलतो. नळाचा दट्ट्या वर उचलला गेला की. पाठचा भाग खाली ढकलला जातो. असं घडताना नळाचा मागचा भाग, नळाच्या आत मध्ये असलेली कळ पुढे सरकवतो. त्यामुळे नळाची तोटी आणि नळापर्यंत येऊन जोडला जाणारा पाईप एकमेकांना जोडले जातात. तोटीतून पाणी बाहेर पडतं. परत नळाचा दट्ट्या खाली केला की, कळ मागे सरकते. त्यामुळे तोटी आणि पाईप यांना जोडण्यासाठी तयार झालेला छोट्याशा पुलासारखा भागही मागे सरकला जातो आणि नळातून वाहणारं पाणी थांबतं. अशा प्रकारच्या नळामध्ये, वॉशरसारखा सैल पडणारा कोणताही पदार्थ नसल्यामुळे, नळ गळण्याची शक्यता बरीचशी दुरापास्त असते. तेव्हा तरफेचे नळ जरी थोडे महाग असले तरी पाणी वाचवण्याच्या दृष्टीने तेच वापरणे केव्हाही हितावह !

— डॉ. मानसी राजाध्यक्ष

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..