पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट सांगताना केरसी लॉर्ड दत्ता डावजेकर यांच्या बद्दल सांगत असत. ही आहे १९७१ची गोष्ट. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक वाद्ये भारतीय बाजारात सहज मिळत नव्हती. अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे. अशावेळी आपणच सिंथेसायझर बनवला तर? असा विचार केरसी यांच्या मनात आला. या विचार येता क्षणीच त्यांच्या समोर पहिले नाव आले ते दत्ता डावजेकरांचे. कारण संगीत आणि इलेक्ट्रॉनिक वाद्य या दोन्ही विषयांचे सखोल ज्ञान व त्यावर हुकमत असणारे डीडी एकटेच होते. त्यावेळी डीडी गिरगावात तर केरसी लॉर्ड गँट रोडला राहत. मग केरसींनी डीडींना गाठले. काय काय इलेक्ट्रॉनिक सामग्री लागेल , याची दोघांनी यादीच केली. डीडींनी ऑपेरा हाऊसच्या माकेर्टमधून सारी सामग्री आणली. डीडी कामाला लागले आणि सहाव्याच दिवशी भारतातल्या पहिल्या देशी सिंथेसायझरचा जन्म झाला.
ही आगळी जन्मकथा सांगून केरसी म्हणाले की डीडींनी बनविलेला सिंथेसायझर घेऊन आम्ही ‘ पंचमदां ‘ कडे गेलो. तो सिंथेसायझर पाहून आरडी खूषच झाले. तो डीडींनी बनवला आहे , म्हटल्यावर तर त्यांनी आदराने मस्तक झुकवले. तेव्हा हे अफलातून वाद्य बनवण्यासाठी डीडींनी केवळ पाचशे रुपये खर्च केला. डीडींचा स्पर्श झालेल्या या वाद्याचा वापर नंतर त्यांनी निदान तीनशे गीतांच्या संगीतात तरी केला.
आता तर इलेक्ट्रॉनिक वाद्यांची प्रचंड मांदियाळी तयार झाली आहे. त्यांचे आकार , त्यांची कार्यक्षमता आणि सर्वच प्रकारच्या संगीतात अशा वाद्यांचा होणारा वापर हे सारे आमूलाग्र बदलून गेले आहे. तरी एका महान संगीतकाराने तयार केलेले हे पहिलेवहिले वाद्य म्हणजे चित्रपटसंगीताच्या इतिहासातले पिंपळपान आहे. डीडींनी तयार केलेला हा ३६ वर्षांपूवीचा सिंथेसायझर केरसी लॉर्ड यांच्या संग्रहात मोलाच्या जागी होता.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply