अश्विनी ये ना, अश्विनी ये ना, sssssssss
“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.”
कसले listen to the beats, इथे खाली बसलं तर वर उठायची पंचाईत . ती कसरत केली तर हि सव्वाशे किलोची धोंड(तिला सांगू नका हा) येऊन गळ्यात हात घालणार आणि मग उभं रहायचं, आता मला सांगा हे मजबूत दोरखंड, नाही नाही दोरखंड हि चुकीची उपमा आहे, मुसळ हि योग्य उपमा आहे तर हि दोन मुसळ गळ्यात पडल्यावर काय बिशाद उभं राहायची? आणि ह्या झिपऱ्याला काय जातंय सांगायला ऐसा करो नी वैसा करो, स्वतःची पँट स्वस्थान सोडून गंतव्य करतेय ती सांभाळ आधी.
हि नको ती पीडा मागे लागली ती माझ्या मेव्हण्याच्या एकुलत्या एक चिरंजीवांच्या लग्नाच्या निमित्ताने, मेव्हण्याच्या मुलाचं लग्न ते पण पंजाबी कुडीशी आणि त्यात डेस्टिनेशन वेडिंग, आमच्या सौ. चा आणि आमच्या दिव्याचा नी पणतीचा उत्साह नुसता फसफसून नव्हे तर खाली पडून घरंगळू लागला होता. गेले चार महिने घरात एकच चर्चा, एकच ध्यास एकच श्वास. दादाचं वेडिंग, लग्न नव्हे हो, लग्न कस मिडल क्लास वाटत कुठल्या तरी हॉल मध्ये केल्यासारखे , इती जुई म्हणजे आमची सौ.
साकेत ने जेव्हा घरात जाहीर केलं की तो त्याच्याच ऑफिस मधल्या दिलप्रित कौरशी लग्न करणार आहे तेव्हा आमच्या मेव्हण्याच्या घरात तणावाचं वातावरण तयार झालं, प्रतिष्ठा , अनुशासन वगैरे गप्पा झाल्या, त्या ओघाओघानेच येतातच अश्या स्फोटानंतर. मग थोडेसे रुसवे फुगवे, थोड्याशा धमक्या वगैरेचे फटाके उडाले. मग सरतेशेवटी चि.साकेत आमच्या घरी आले दिलप्रितला घेऊन.
“ काका ,आता यातून तुम्हीच मार्ग काढू शकता, प्रितच्या घरचे तयार आहेत ,त्यांना काही ऑब्जेकशन नाही आहे,आईच काही नाही ती तयार होईल पण बाबांना तुम्हीच सांगा. प्लिज काका माझं एव्हढ काम करा.”
आता मला कुणालाही नाही म्हणायला तस जमत नाही आणि त्यात हा साकेत म्हणजे माझा आवडता भाचा,त्याला कसं नाही म्हणणार आणि प्रीत पण छान होती अगदी गोड . शेवटी मेव्हण्याला जरा चार कान गोष्टी सांगितल्या, त्याच्या लग्ना वेळच्या काही गोष्टींची त्याला पुन्हा आठवण करून दिली. मग तो तयार झाला. माझा भाव मात्र दोन्हीकडे वधारला. दिलप्रितच घर बघायला गुरुदासपूरला गेलो तेव्हा तिथे माझी काय खातिरदारी विचारू नका. काय ते लस्सीचे ग्लास, काय त्या मिठाया काय ते हे, काय ते ते. मला अगदी नवाब झाल्यासारखं वाटतं होतं, येताना विमानात बसलो तेव्हा तर मला फारच उच्चकोटीचे आपण कुणीतरी आहोत अस वाटत होत तेव्हढ्यात आमचं जुई नावाचं सव्वाशे किलोच पोत बोलतं झालं,
“अहो, पोटावरच बटण लावा, कसं ध्यान दिसताय “
नवऱ्याचा अपमान करायची एक संधी बायको कधी सोडत नसते आणि इथे तर आजूबाजूला हवाई सुंदऱ्या बागडत होत्या, असा चान्स ती कसा सोडेल?
लग्न ठरलं, सगाई झाली म्हणजे आपला साखरपुडा हो. केक कापले गेले, गळ्यामिठ्या झाल्या, तोंडचे चंबू किंवा तत्सम प्रकार करून फोटो काढून झाले. ह्या सगळ्यात आमच्या हिला जो उत्साह चढला होता ना की एक एक दिवस जसं लग्न जवळ येत होत तस तस माझ्या खिश्यावरच नी मनावरचं दडपण वाढतच होत. बोलूही शकत नव्हतो, फुफाजी होतो ना मी. तिकडे पंजाबी लोकात फुफाजी हे मोठं जबरदस्त प्रकरण असत असं एकंदरीत माझ्या लक्षात आलं होतं,त्यात हा फुफा तर मांडवली करणारा म्हणजे काय बोलूच नका. लग्न तिकडे गुरुदासपुरला होणार होत, सगळ्यांच्या एकवेळ विमानाचा खर्च मुलीकडचे करणार आणि एकवेळचा मेव्हणा. लग्नाची खरेदी हा जो काही अगम्य प्रकार हल्लीच्या लग्नात होतो तोही पार पडला. खरेदी करणे महत्वाचं , आपल्याला शोभो न शोभो हि गोष्ट अलाहिदा. उभ्या आयुष्यात ज्याने पांढरा, फिका निळा, फिका पिवळा ह्या शिवाय कोणतेही रंग अंगाला लावले नव्हते त्या मला ह्या माणसांनी मेहंदीच्या दिवशी हिरवा, नंतर गडद पिवळा, शेंदरी, लाल अश्या विविध रंगांनी अगदी पोळ्याच्या बैलासारखा सजवला होता.
आरती, भजन, आणि नाट्यसंगीत ह्या सांस्कृतिक आणि सांगीतिक प्रकारांनी ज्याची कलाविष्काराशी ओळख होती त्याला अश्विनी ये ना या गाण्यावर नाचवणे म्हणजे काय असेल तुम्हीच ठरवा.कितीदा मी विरोध केला की हे अस मला जमणार नाही पण नाही जुईच्या उत्साहाच्या धबधब्यापुढे माझा विरोध क्षीण पडला आणि हा सजवलेला पोळ्याचा बैल आता नाचणार होता. समी सर नावाचा हाडाची काड नी *****च तुणतुणं टाईप माणूस आम्हा सगळ्यांना नृत्य शिकवण्यासाठी रुजू झाला.
“सर, ऐका ना , ह्यांच्या बरोबर हा परफॉर्मन्स झाला ना की मला एक सोलो पण करायचाय, आप गाईड करोगे ना? प्लिज?”
आमच्या हिला एव्हढं मंजुळ बोलता येत? हिच्या नरड्यातून एव्हढे मंजुळ स्वर येतात हे मी विसरूनच गेलो होतो कारण मला नेहमी तारस्वर नाहीतर “कायये?” असा खेकस स्वर ऐकायची सवय.
“Don’t worry mam, आपमे नॅचरल ग्रेस है, आप को आयेगा “
आतातर मी बसलेल्या खुर्चीवरून एका साइडला पडायच्या बेतात होतो , हि आणि ग्रेस, ह्या दोन शब्दा चा दूर दूरपर्यंत काही संबंध आधीही नव्हता आणि आता तर नाहीच नाही.
“आप ना मॅडम, आपको जो अच्छा लगे वो song choose करो, मै आप को सिखा देगा ,ये सब लिस्ट है सोलो साँग्ज की, song के हिसाब से रेट रहते है|”
आता कसा हा पोपट बोलायला लागला मुद्द्याच. आमच्या बयेला हे कळलं असत तर कशाला हवं होतं? आता मात्र मी विरोध करायचा म्हणून पुढे सरसावलो.
“ऐकलस का ग, हे बघ दोन दोन गाण्यावर नाचशील आणि मग मेन इव्हेंट म्हणजे वेडिंगला एका कोपऱ्यात बसायला लागेल,पाय दुखायला लागले तर,मी आपल सुचवतोय बाकी काही प्रश्न नाही.”
“ अय्या खरचं हो,बर झाल तुम्ही हे सांगितलेत ते माझ्या लक्षात आलेच नाही, माझी एव्हढी 12000ची पैठणी आणि नंतरची कांजीवरम फुकट जाईल नाही?”
“आणि त्या वरचे ते मॅचींग दागिने घेतलेस ते पण” मी माझ्या छातीतल्या कळा आठवून बोललो.
“तुम्हाला न मेलं कसलं कौतुकच नाही,दागिने घेतले तेव्हाचा चेहरा आठवतोय मला. “
“देखो सर हम एक हि song पे dance करेंगे” इती ही.
सर माझ्याकडे डोळे वटारून बघत होता, मी पण त्याला काही बोटांच्या हालचाली करून दाखवल्या.
शेवटी बऱ्याचदा उठक बैठक करत, गिरक्या घेत, कवायती करत एकदाच ते नृत्य बसलं.
लग्नाचा आठवडा आला आमचं वऱ्हाड गुरुदासपूरला पोचले, काय ते आगत स्वागत , अहाहा खरचं प्रितच्या घरच्यांनी कुठली ददात ठेवली नव्हती. एव्हढा पाहुणचार तर माझ्या सासरच्यांनी पण केला नव्हता. एकदाचा तो संगीताच्या इव्हेंटचा दिवस उजाडला, सकाळ पासूनच माझ्या मनात धाकधूक होत होती, बाकी काही नाही हे आमचं धुड अंगावर पडलं तर?तेव्हढ्यात आमच्या वंशवृक्षावरील आमची कळी नाचत नाचत आली, पुढे न आलेले केस बोटं न वाकवता काना मागे केल्यासारखे करण्याची जी स्टाईल आहे ना हाल्लीची त्या प्रमाणे करत बोलती झाली,
”बाबा, आपण एक गम्मत करू, तुम्ही जेव्हा नाचत खाली बसता ना knees वर तेव्हा तुम्ही आईला सरप्राइज द्यायचं, तुमच्या कोटाच्या खिश्यातून रेड रोज काढून मम्मीच्या हातात द्यायचं नी l love you बोलायचं”आम्ही ते दोन मिनिटं song बंद करू. नी मग पुन्हा चालू करू.”
“अग काय हे, छे ,छे ,एव्हढ्या माणसांच्यात अस काही बोलायचं, कसं दिसत ते, लोकं म्हणतील म्हातारचळ लागलाय, नको नको”
“ अहो बाबा नको काय? इथे कोण ओळखतय आपल्याला आणि अस केलत ना तर तुमचा भाव आणखी वाढेल, आणि संगीतच हिट आयटेम ठरेल तुमचा डान्स, बाबा प्लिज ना”
आता माझी चिमणी असं म्हणतेय म्हटल्यावर नाही म्हणताच येत नाही. रात्र झाली संगीत सुरू झाल आमचा नंबर आला आणि मी स्टेजवर दमदार एन्ट्री घेतली अगदी अशोक सराफ सारखी
अश्विनी ये ना, येना, प्रिये जगु कसा तुझ्या विना मी राणी ग “
आणि आमची सौ. मंचावर अवतीर्ण झाली काय सांगू महाराजा एव्हढी भारी दिसत होती ना, वा. गाणं मध्यावर आल आणि आमचं ठरल्या प्रमाणे मी खाली बसलो, हि लाडे लाडे जवळ आली गळ्यात हात टाकणार तोच तिकडे गाणं बंद झालं, मी खिश्यातुन लाल गुलाबाचे फुल काढलं आणि हिच्यासमोर धरल आणि म्हणालो,
”अग हे घे तुला”,
आणि माझं लक्ष स्टेजच्या बाजूला गेलं, आमची कन्यका मला खाऊ का गिळू अस बघत होती .लगेच जुईकडे पाहिलं ,सगळ बळ एकवटल आणि म्हटल,
“my darling jui, I love you “
इतका वेळ काय ह्यांचं बावळटासारख चाललंय अश्या नजरेने मला बघणारी जुई अश्शी लाजली आहे ना, मार डाला, अगदी. लग्नाच्या पहिल्या पहिल्या महिन्यात ती अशी लाजायची , मधे सगळ्या संसाराच्या जंजाळात विसरली होती बहुतेक. नंतरच गाणं आणि वेडिंग आणि एकंदरीत गुरुदासपूरच आमचं वास्तव्य अगदी वेगळ्या धुंदीत गेलं, विशेष म्हणजे पटियाला पेग न घेताही हा फुफा जमिनीच्या वर दोन बोटं तरंगत होता, माझ्या लाडक्या सौ. सोबत.
–सौ. शिल्पा मिनेश गाडगीळ
Leave a Reply