कुसुम अभ्यंकर यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९३६ रोजी पुणे येथे झाला.
कुसुम अभ्यंकर यांचे माहेरचे नाव कुसुम दामले. रत्नागिरीतील डॉ.अभ्यंकर यांच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यावर डॉ.अभ्यंकर यांच्या वैद्यकीय व्यवसायाला पूरक म्हणून कुसुम अभ्यंकर यांनी नर्सिंगचा कोर्स केला. पुढे त्या डॉक्टरांना त्यांच्या व्यवसायात मदत करू लागल्या. परंतु मुळातून शिक्षणाकडे ओढा असल्यामुळे रत्नागिरीतील गोगटे महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषय घेऊन एम.ए.ही पदवी मिळवली. काही काळ गोगटे महाविद्यालयात अध्यापन केले. शिवाय हिंदी साहित्यरत्न ही पदवीही मिळवली.
१९७० ते १९८४ या काळात त्यांच्या लेखनाला बहर आला. त्या आपल्या लालित्यपूर्ण, प्रवाही शब्दकळेने आणि लेखनातल्या सखोल जीवनदर्शनाने थोड्या अवधीत लोकप्रिय झाल्या. त्यांची तेहेतीस पुस्तके प्रकाशित झाली. त्यांतील बहुतांश कादंबर्याय नायिकाप्रधान आहेत. पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था, पारंपरिक नीतिमूल्यांची चौकट, बाईपणामुळे येणार्या मर्यादा यांमध्ये दडपून गेलेल्या स्त्रियांचे चित्रण त्यातून आहे. या नायिका तडफदार आहेत. स्वाभिमानी, करारी, समजूतदार, सेवाभावी आहेत. तशाच स्वप्नाळूही आहेत. स्त्रीची ही विविध रूपे कुसुम अभ्यंकरांनी उठावदारपणे सादर केली आहेत. रंजनप्रधान कथांच्या साच्यात बसणार्या या कादंबर्यां पेक्षा वेगळ्या धाटणीचे कादंबरीलेखनही त्यांनी केले. ओघवती भाषा आणि कादंबरीच्या तंत्राची उत्तम समज यांमुळे त्यांच्या कादंबर्या् लोकप्रिय झाल्या आहेत. कुसुम अभ्यंकर यांची अतृप्त मी, गोधडी, जातो मी दूर देशी, कशी मोहिनी घातली, परत येऊ नको, परीस, दोन दिसांची रंगत संगत, कठपुतळी, नीना मीना, सोनबावरी, सूड, विकेशी, अशी पुस्तकं व ‘विघ्नहर्ता’, ‘झुरते मी अंतरी’ (१९७५), ‘अश्विनी’, ‘स्पर्श’ (१९७५), ‘धर्मात्मा’ (१९७७), ‘आघात’ (१९७५), ‘कॅरियर’ (१९७८) अशा काही वेगळ्या विषयांवरील कादंबर्याा आहेत. ‘लाल बंगली’ या त्यांच्या रहस्यमय कादंबरीवर आधारित नाटकही १९८४ साली रंगभूमीवर आले.
कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते.
कुसुम अभ्यंकर यांचे ५ एप्रिल १९८४ रोजी निधन झालं.
Leave a Reply