आयुष्यात आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं .
काही स्वप्नं पाहिलेली असतात .
काही ध्येयं ठरवलेली असतात .
त्या अनुषंगाने आपण धडपडत असतो . प्रयत्न करीत असतो .
जगावेगळं काहीतरी करण्याची उर्मी आपल्याला स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातून सुरू होतो प्रवास .
आपलं वागणं , आपलं बोलणं , आपली दिनचर्या आणि एकूणच आपलं भावविश्व त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं झेपावत असतं . प्रवास करीत असतं .
हा प्रवास दमवणारा असतो .
आजूबाजूचं सगळं विश्व एका बाजूला आणि ध्येयाच्या पूर्णत्वासाठी निघालेला एका बाजूला , असं अंतर पडत जातं .
आणि मग केव्हातरी जाणवून जातं , ज्या ध्येयाच्या पाठी आपण लागलो होतो ते केव्हाच पाठी पडलं .
आणि मग एका नव्या जाणिवेने आपलं विश्व अधिकच समृद्ध आणि सुंदर झालं आहे .
हा विचार मांडणारी एक शॉर्टफिल्म नुकतीच पाहण्यात आली .
मॅक्स प्लेअर या ओटीटी वर स्ट्रेंजर इन द सिटी या नावाची आगळीवेगळी शॉर्टफिल्म प्रकाशित झाली आहे .
मणीपाल ( कर्नाटक) येथील काही तरुणांनी खूप वेगळा प्रगल्भ विचार देणारी , ही शॉर्टफिल्म बनवली आहे .
आयुष्यात , कॉर्पोरेट जॉबपेक्षा सुहासला काहीतरी वेगळं करायचं आहे. या ध्येयाने प्रेरित झालेल्या सुहासला एका शहरात प्रवेश केल्यानंतर कोणत्या अनुभवांना सामोरं जावं लागतं , याची अनोखी मांडणी म्हणजे , स्ट्रेंजर इन द सिटी ही शॉर्टफिल्म .
अखंड बडबड करत राहणारा आणि स्वप्नपूर्ती करण्यासाठी पैशाची गरज महत्वाची असते हे सांगणारा केरळी कॅब ड्रायव्हर .
पर्यटनाचा नकाशा हातात घेऊन फिरणारी , हॉटेल मध्ये सुहासच्या शेजारच्याच रूम मध्ये राहणारी आणि तरीही त्याची तिची भेट न होणारी , पण अधून मधून त्याला दिसणारी अनामिक तरुणी .
या दोघांची ध्येयं वेगवेगळी आहेत .
त्यांच्याबद्दलचं त्याचं कुतूहल त्याला आहे .
या दोघांमुळे सुहासला त्याच्या ध्येयाबद्दलची जाणीव होत राहते .
अशी मोजकीच पात्रं घेऊन फिल्म तयार केली आहे .
सतत दिसत राहणारा समुद्र .
चहाची टपरी .
डान्सबार .
जत्रेतील टायगर डान्स.
आणि हे सर्व पाहूनही विचलित न होणाऱ्या सुहासला त्या अधूनमधून दिसणाऱ्या तरुणीमुळं आणि केरळी ड्रायव्हरमुळं ,कुठल्यातरी एका क्षणी काहीतरी जाणवून जातं …
आणि त्याचा प्रवास परतीच्या दिशेनं सुरू होतो .
त्याला नेमकं काय जाणवतं, ही उत्सुकता असेल तर स्ट्रेंजर इन द सिटी ही शॉर्टफिल्म पहायलाच हवी .
मणीपाल मधल्या तरुणांचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी कथानक ज्या पध्द्तीने त्यांनी सादर केले आहे ते पाहता त्यांनी व्यावसायिक दर्जा ठेवण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे .
दिग्दर्शन , संगीत , संगीत संयोजन ,लोकेशन्स , संवाद , संयत अभिनय अशा सर्वच स्तरावर त्यांची प्रगल्भता दिसून येते .
मणीपाल , उडुपी येथील बीचेस , मंगलोर येथील काही लोकेशन्स याचा अप्रतिम वापर करून त्यांनी कथानकाला एक वेगळं अवकाश प्राप्त करून दिलं आहे.
प्रतिभावान तरुणाई काय करू शकते , याचा सुखद अनुभव या शॉर्टफिल्म मधून मिळू शकतो .
पाहायलाच हवी ही शॉर्टफिल्म. सोबत लिंक दिली आहेच.
— डॉ. श्रीकृष्ण जोशी.
९४२३८७५८०६
रत्नागिरी.
Leave a Reply