मित्रहो,
नमस्कार,
स्त्री ही मुळात जननी आहे. तिला आदिमायाही म्हटले आहे. तिची अनेक रूपे आहेत, अनेक नाती आहेत. स्त्रीत्व म्हणजे, पावित्र्य, चारित्र्य, वास्तल्य, प्रेमभाव, त्याग, मृदुलता यांची पावन गंगोत्रीच आहे.
प्राचीन ग्रंथ वांगमयात, धर्मग्रंथातून स्त्रीरूपाचे वर्णन केलेले आढळते.
“अहिल्या, द्रौपदी, सीता ।।
तारा, मंदोदरी तथा ।।
पंचकं ना स्मरेन्नीत्यं ।।
महापातकनाशिनी: ।। “
या श्लोकातून स्त्रीत्वाच्या महत्ततेची जाणीव होते.
आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीत ( भारतीय संस्कृतीत ) स्त्रीला आदिमाया आदिशक्ती मानले आहे, ती विश्वाची जननी
आहे!
प्रत्यक्षात भगवंत देखील तिच्याविना भिकारी आहे. असं म्हटले जाते यातूनच स्त्रीचे महत्व आणि तिची समर्थता प्रत्ययास येते.
प्राचीन धर्मग्रंथातून, साहित्य संपदेतुन स्त्रीत्वाची अनंत रूपे आपलयाला पहावयास मिळतात. त्यातून स्त्री कधीच अबला नव्हती तर ती सबला होती. तसेच इतिहासात स्त्रियांच्या अनेक शौर्यगाथाही आपल्या निदर्शनास येतात. हे पुरुषप्रधान संस्कृतीला नाकारून चालणार नाही.
तेंव्हा केवळ महिला दिनाचे औचित्य साधून केवळ एक दिवसासाठी स्त्रियांचे सत्कार सोहळे या युगात करून चालणार नाही. हेही तितकेच खरे. आता स्त्री आणि पुरूष हा भेद मानता कामा नये.
कारण आता आजची स्त्री ही जागतिक स्तरावरील प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची मोहोर लावून सक्षम आणि समर्थ पणे उभी आहे हे वास्तव समाजातील प्रतिबिंबित असा आरसा आहे.
आजची स्त्री महिला सार्वभौमी सुशिक्षीत, अभ्यासू, असून सामाजिक, कौटुंबिक, नवनवीन आव्हानांना सामोरी जाणारी, सुसंस्कृत शक्ती आहे. आपण आज पाहिलं तर या स्त्रीनं जगातील सर्वच क्षेत्रे पादाक्रान्त केलेली दिसून येतात.
याचाच अर्थ ती आत्मनिर्भर झाली असून तिच्यातील वैचारिक आणि तात्विक, तसेच आधुनिक विचारसरणीतून स्त्रीत्वाचा व्यक्तिविकास केलेला आहे हे निदर्शनास येते.
प्राचीन ऐतिहासिक काळात देखील स्त्रिया सुशिक्षित असून सर्व शास्त्रात पारंगत होत्या. सर्वांची नावे किंवा दाखले देणे इथे अशक्य आहे. थोडक्यात आजच्या काळात स्त्रीची प्रगती अधिक सबल आणि समोर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला धैर्याने, विवेकबुद्धीने सामोरी जाण्याची जिद्द बाळगून आहे. हेच महत्वाचे आहे.
इती लेखन सीमा
— वि.ग.सातपुते.
(साहित्यिक, भावकवी)
9766544908
पुणे.
Leave a Reply