नवरात्रातले दिवे अखंडपणे घरोघरी असतील. मंदिरांमधून घरांमधून देवीची उपासना सुरू असेल. नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा सण, कधी कालीमातेच्या भयंकर, रणकर्कश रूपात, कधी शारदेच्या साहित्य-संगीत-ज्ञान-विज्ञानात रत झालेल्या रूपात, तर कधी समृद्धीचं, शांतीचं, मांगल्याचं आणि स्थैर्याचं वरदान देणाऱ्या शांत – तेजस्वी महालक्ष्मीच्या रूपात या शक्तीचं पूजन होईल.
नवरात्रातले पहिले तीन दिवस कालीमातेच्या पूजेचे. ही संहाराची देवता. तिनं दैत्यांचा नाश केला. दैत्य म्हणजे दुर्गुणी – विध्वंसक वृत्तीच्या व्यक्ती आपल्या मनात, व्यक्तिमत्त्वातही अनेक दुर्गुण असतात. क्रोध, मत्सर, लोभ, द्वेष, आळस असे कित्येक… हे आपल्याला व्यवहारातही अपयशी करतात. याचा संहार करणं, हे आपल्यातलेच दुर्गुण कठोरपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कालीची पूजा.
त्यानंतरचे तीन दिवस शारदेच्या, सरस्वतीच्या पूजेचे. दुर्गुण नष्ट केल्यावर त्या जागी सद्गुण आणण्याचे हे दिवस. मान मिळवणं आणि सद्गुण मिळवणं म्हणजे शारदेची पूजा. एकदा आपल्यामधले दोष नष्ट झाले आणि त्या जागी सदगुण आले की, मानसिक स्थैर्य, समृद्धी, सुख- यश येतंच. हे महालक्ष्मीचं रूप. शांत तेजस्वी आणि वैभव देणारी महालक्ष्मी प्रसन्न व्हायची असेल तर आधी काली आणि शारदेची उपासना आवश्यक. हे ज्याला करता येतं, त्यालाच यशाचं सोनंसुद्धा लुटता येतं. यश मिळविण्याच्या पायऱ्या या अशा आहेत.
स्त्रीमध्ये हे सारे गुण असतात. जीवनातलं मांगल्य, स्थैर्य जपण्यासाठी स्त्री प्रसंगी कितीही कठोर होऊ शकते. इतिहासात अशा रणरागिणींचं दर्शन आपल्याला घडतंच. मुलांची उपासमार न पाहवून राणा प्रताप अकबराशी तह करायला तयार झाला, तेव्हा त्याचा क्षणिक मोह दूर करून त्याला युद्धाची प्रेरणा दिली त्याच्या पत्नीनंच. अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मी या तर आपल्या नित्य परिचयातल्या लढाऊ स्त्रिया. पण स्त्रीची कठोरता हाही तिच्या मातृभावाचा, कोमलतेचा आविष्कार स्त्रियांनी राज्य चालवलं तेही कुशलतेनं. राज्यात स्थिरता, न्याय, समानता राहील, समृद्धी येईल अशा पद्धतीची राज्यव्यवस्था त्यांनी निर्माण केली. सामान्य माणसांचाही जिव्हाळ्यानं विचार केला. कोणतीही युद्धनीतिनिपुण स्त्री युद्ध संपल्यावर जुलमी हुकूमशहा बनली नाही. हा तिच्यातल्या महालक्ष्मीचा आविष्कार पालन-पोषण-संगोपन आणि संवर्धन हे त्या लक्ष्मीचं कार्य.
अगदी रोजच्या व्यवहारातही सामान्य स्त्रीसुद्धा या दोन्ही भूमिका पार पाडत असते. मुलांचं, कुटुंबाचं संगोपन, संवर्धन करते तेव्हा ती लक्ष्मी असते; तर मुलांना वाईट गोष्टींपासून वाचवण्यासाठी प्रसंगी त्यांना शिक्षा देते तेव्हा ती दुर्गाही असते.
म्हणून तर उत्तम बंगल्यातही गृहिणी नसेल तर त्याला घरपण’ येत नाही, उलट स्त्रीनं झोपडीत मांडलेल्या तीन दगडांनीही लगेच त्याला घरपण मिळतं. ज्ञानाची, साहित्य-संगीत वगैरे कलांची देवी हीदेखील स्त्रीरूपच आहे.
स्त्रीच जीवनात सौंदर्य निर्माण करते. सामान्य स्त्रियांनी जात्यावर बसून दळताना, मुलाला जोजवताना जी गाणी गाइली त्या गाण्यांनी म्हणजेच ओव्यांनी लोकसाहित्यात आपलं एक स्थान निर्माण केलं.
आज ठिकठिकाणी देवीची रूपं पाहताना मनात विचार येतो स्त्रीच्या कठोर, शांत आणि तेजस्वी रूपात पूजा करणाऱ्या या समाजात खऱ्या स्त्रीचं स्थान आहे तरी कोणतं? कन्येच्या रूपात तिचं आनंदानं स्वागत होत नाही.
पत्नीच्या रूपात तिला बरोबरीचं स्थान मिळत नाही. गृहिणी म्हणून तिनं केलेल्या कामाची कदर होत नाही आणि आई म्हणून तिला फक्त राबवून घेतलं जातं.
ज्ञानाची देवता म्हणून शारदेची पूजा करायची. प्रत्यक्षात मात्र शिक्षण देताना मुलाला झुकतं माप द्यायचं. हे इतकं अंगवळणी पडलंय की यातली विसंगती कुणाला जाणवतच नाही.
भारतीय संस्कृतीला स्त्रीचं हे हीन स्थान अभिप्रेत होतं का? कधीच नाही. या संस्कृतीच्या सुवर्णकालात म्हणजे वेदकालात स्त्री स्वतंत्र, स्वयंसिद्ध आणि आदरणीय होती. स्वतःच्या तेजानं तेवत होती. काळानं, परकीय आक्रमणानं आणि पुरुषांनी लिहिलेल्या धर्मकल्पनांनी तिच्या व्यक्तित्त्वावर काजळी चढली.
ही काजळी काढून तिचं मूळ स्वरूप तिला दिलं तरच या नऊ दिवसांच्या देवी पूजनाला अर्थ आहे. घरची ज्योत म्लान असेल, विझू – विझू होत असेल, तर अखंड तेवणाऱ्या नंदादीपाला काय अर्थ आहे?
Leave a Reply