भारतासह जगभरात ठिकठिकाणी दरवर्षी आंतरराष्ट्रीय ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जागतिक स्तरावर स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कामगिरींचा उत्सव साजरा केला जातो. सध्याच्या मार्केटिंगच्या जमान्यात तर महिला दिनाचा प्रचार नामांकित ब्रँडच्या वस्तू खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. इतकेच नाही तर वृत्त चित्र वाहिन्यांवर महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम पुरस्कृत केले जातात आणि आपल्या अर्धांगिनीला या दिवसानिमित्त भेटवस्तू देण्याचे आवाहन जाहिरातींद्वारे केलेले पाहायला मिळते. सध्या बोल-बाला असलेल्या विविध प्रकारच्या सामजिक आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रसार माध्यमांद्वारे आपल्या महिला सहकारी, मैत्रिणी तसेच स्त्री नातेवाईक यांना फुले, शुभेच्छा किंवा एखादी भेटवस्तू देऊन पुरुष वर्गसुद्धा महिला दिन साजरा करतो.
तळागाळातील कष्टकरी स्त्रियांसोबत कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था संघटना महिलांना त्यांचे हक्क, अधिकार, कायदे याविषयी चर्चासत्रे, मेळावे आयोजित करून महिला सक्षमीकरणाचे धडे देत असतात. तर सरकारही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना या दिवशी सन्मान चिन्हे देऊन त्याच्या कार्याची दखल घेत असते. अलीकडच्या काळात मात्र महिलादिनाचे ऐतिहासिक महत्व कमी होऊन उत्सवीकरण झालेले आढळून येते. त्यासाठी मागे वळून पहिले तर आजच्या या उत्सवी महिला दिनाची बीजे ही १९०८ सालच्या न्यूयॉर्क शहरातील महिलांच्या ऐतिहासिक लढ्यात पाहायला मिळतात. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या या स्त्रियांनी बाल मजुरी थांबवावी, पगारवाढ आणि कामाचे तास कमी असावेत तसेच मतदान करण्याचा अधिकार या मागणीसाठी सुमारे १५००० महिलांनी न्यूयॉर्कमध्ये मोर्चा काढला होता. त्या प्रदर्शनकारी महिलावर सरकारने रणगाडे चालवून मोर्चा मोडून काढण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये शेकडो महिला जखमी झाल्या तर काही जणींचे प्राणही कामी आले.
१९१० मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगेन येथे भरलेल्या कामगाराच्या जागतिक महिला परिषदेमध्ये त्यावेळी सुमारे सतरा देशातील शंभर महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या या परिषदेत जर्मनीच्या श्रीमती क्लारा झेटकिन यांनी ८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि तेव्हापासून स्त्रीत्वाच्या जागतिक उत्सवाची ही परंपरा व नंतर ती जगभरात पसरू लागली. १९७५ मध्ये राष्ट्रसंघाने महिलादिन साजरा करण्यास सुरुवात केली त्यामुळे जगातील अनेक देशाच्या सरकारांवर महिलांसाठी कायदे करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
भारतातसुद्धा अनेक महिला संघटनांनी आपल्या देशातील हुंडाबळी, कौटुंबिक हिंसा, बलात्कार, ॲसिड हल्ले अशा घटनांविरोधी लढा देऊन या दिनाची महती वाढवली.
विशेषतः महिलांनी आपल्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्यांचे स्मरण करून त्यानिमित्ताने सर्वच स्तरातील महिलांचे कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक प्रश्न ऐरणीवर आणले.
त्यामुळेच आज आपल्याला सर्वच क्षेत्रात महिला स्वकर्तृत्वाने तळपताना आणि आपल्या विशेष कौशल्याची छाप पाडताना दिसतात. आपल्या देशात राजकारणासारख्या क्षेत्रात स्त्रियांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी मिळते त्यामध्येसुद्धा स्त्रिया ठसा उमटवीत पुढे जात आहेत हे लक्षात येते.
उदाहरणच द्यायचे झाले तर २०१६-१७ दरम्यान यूएन विमेन इंडियातर्फे पंचायतमधील महिलांचे योगदान या विषयीचे काही राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बुबनाळ’ या गावचा समावेश केला होता कारण या गावातील ग्रामस्थांनी आणि पुढाऱ्यांनी आरक्षणाच्या पलीकडे जाऊन ग्रामपंचायतीचा १००% कारभार महिलांच्या ताब्यात दिला होता. या ग्रामपंचायतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही गेलो असता असे समजले की, तेथील सर्व समाजातील नेतृत्वशील महिलांनी आपल्या गावाच्या विकासाचा ध्यास घेतला होता आणि त्या आपल्या परीने आपल्या गावाच्या प्रगतीस हातभार लावत होत्या. त्यांच्या भ्रष्टाचार विरहित कारभारामुळेच गावाने त्यांना सातत्याने बिनविरोध निवडून दिले होते तसेच विकास कामात सातत्य कर्तृत्वामुळे राखण्याच्या त्यांच्या त्यांच्या योगदानाची नोंद राष्ट्रसंघाच्या अभ्यासात केली गेली.
यंदाच्या वर्षी राष्ट्र संघाने (Gender महिलादिनाचा विषय Equality today for Sustainable tommorow) ‘आजची लिंगभाव समानता शाश्वत उद्यासाठी जाहीर केला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिन ८ मार्च २०२२ तर्फे ‘ब्रेक द बायस’ म्हणजेच ‘पक्षपात खंडित करा’ असे अभियान जाहीर करण्यात आले आहे. आपण सर्वच जण बहुतेक वेळा अनेक ठिकाणी आपल्या लिंग, रंग, वंश, धर्म, इत्यादी कारणाने पक्षपात अनुभवत असतो किवा आपल्या समोर घडताना पाहतो. त्यामध्ये बऱ्याचदा पूर्वग्रह दुषित व्यक्तीच्या रोषाला बळी पडून अनेकांना आपल्या प्राणांस मुकावे लागले आहे .त्यामुळे विविध क्षेत्रात अनुभवास येणाऱ्या पक्षपाताला खंडित केले तरच आपल्याला समानतेच्या जगाची कल्पना करता येईल असा या मागील विश्वास आहे.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४ ते १८ मध्ये सर्व समानतेची नागरिकांना हमी देण्यात आली आहे. कायद्यासमोर सर्वजणसमान असून सर्वाना कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा व्यक्त करतील अशी सर्व पदे रद्द करण्यात आली आहेत. मात्र शैक्षणिक सैन्यदले आणि शासनाने मान्य पदव्या याला अपवाद आहेत. सर्व नागरिकांना आपला धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्माचे ठिकाण यामुळे होणाऱ्या भेदभावापासून संरक्षण लाभले आहे. तसेच यामध्ये संधीची समानतादेखील अधोरेखित केली आहे. परंतु, भारतीय समाजातील अनेक जाती, उपजाती, आदिवासी, भटके विमुक्त आणि सर्वच स्तरातील उपेक्षित महिलांना व इतर लैंगिक प्रेरणा असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या समूहांना संरक्षण मिळण्यासाठी विशेष कायदे तयार करण्याची तरतूदही आपल्या राज्य घटनेत केली आहे. त्यानुसार महिलांसाठी ‘कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण अधिनियम २००५, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ असे कायदे पारित करण्यात आले आहेत व त्यासाठी सरकारने यंत्रणाही उभी केली आहे.अशाच प्रकारे लहानमुले, ज्येष्ठ नागरिक, आदिवासी, अनुसूचित जाती जमाती वर होणाऱ्या अन्याय व अत्याचार विरोधी प्रतिबंधक कायदे अस्तित्वात आले आहेत जेणेकरून त्यांच्या मानवी हक्कांचे व हिताचे संरक्षण होईल.
या कायद्यामुळे कोणालाही शंका येईल कि, या सर्व प्रकरणात प्रतिवादी असलेल्या व्यक्तीच्या समान हक्काची पायमल्ली तर होणार नाही ना? पण याचे उत्तर नाही असे आहे कारण न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सर्व तक्रारी अर्जांची शहानिशा केली जाते व तालुका स्तरीय न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयामार्फत प्रकरणांची सुनावणी होऊन कायद्यांचा दुरुपयोग तर होत नाही ना याची खातरजमा केली जाते.यासोबतच न्याय निवाड्यासाठी महिला आयोग, बालहक्क आयोग, मानवी हक्क आयोग, न्यायाधिकरण इत्यादी माध्यमातूनही दाद मागण्याची सोय केली आहे.
समानता हि फक्त पुस्तकातून किवा प्रचारातून येत नाही आपण आपले विचार आणि कृती यांना रोज आणि नेहमीच जबाबदार आहोत याची जाणीव ठेऊन आपण आपल्या समाजात रोजच्या प्रवासात, कामाच्या ठिकाणी, शाळा, महाविद्यालये, इत्यादी ठिकाणी स्त्री पुरुष समानता तसेच लिंगभाव समानता म्हणजेच सर्वच स्तरातील उपेक्षित समाज, स्त्रिया व इतर लैगिक प्रेरणा असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या समूहांना पूर्वग्रह दुषित पक्षपाती वागणूक मिळत असेल तर ती थांबण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून हा ‘पक्षपात खंडित करा’ (Break the bais) विषय निवडण्यात आला आहे. यामध्ये लिंग समभावावर आधारित, पक्षपात, पूर्वग्रह विरहीत तसेच वैविध्य पूर्ण, न्याय्य व सर्वसमावेशी जगाची कल्पना केली आहे. तसेच आपल्यातील वेगळेपणाचा आदर करून ते साजरे करणे अपेक्षित आहे. आपण सर्व मिळून एक तपणे स्त्रियांची समानता स्थापित करू शकतो या आशावादासह यावर्षीच्या महिलादिनी व त्यानंतरही ‘पक्षपात खंडित करा’ हे अभियान चालूच राहील याची आपण सर्वांनी जबाबदारी घ्यावी तरच स्त्री पुरुष समानतेच्या दिशेने वाटचाल करता येईल.
– अॅड. असुंता पारधे
व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार
Leave a Reply